अलीकडेच जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांनी खळबळजनक वक्तव्य केले आहे. हे वक्तव्य जगभर चर्चेचा विषय बनलं आहे. एका आंतरराष्ट्रीय मुलाखतीत त्यांनी थेट कबूल केलं की, “पाकिस्तान गेली तीस वर्षे दहशतवादी संघटनांना आर्थिक मदत आणि विविध प्रकारचा पाठिंबा देत आलं आहे.”
पाकिस्तानने दहशतवाद पसरवण्याची कबुली दिली
ब्रिटनच्या स्काय न्यूज वाहिनीवरील यल्दा हकीम यांच्या मुलाखतीत ख्वाजा आसिफ यांनी म्हटलं की, “आम्ही जवळपास 30 वर्षांपासून अमेरिका आणि पाश्चात्य देशांसाठी हे ‘गंदे काम’ करत आहोत.” या वाक्याचा अर्थ असा की, पाकिस्तानने शीतयुद्ध काळात आणि त्यानंतर 9/11 च्या घटनेनंतर अमेरिकेच्या धोरणांतर्गत अनेकदा दहशतवादी गटांना हातभार लावला.
पाकिस्तानच्या कबुलीचा अर्थ काय?
या कबुलीचा थेट अर्थ असा होतो की, दहशतवादाला पाठीशी घालणाऱ्या देशांमध्ये पाकिस्तान अग्रस्थानी राहिलाय. भारताने आणि अन्य अनेक देशांनी यापूर्वीही संयुक्त राष्ट्रांमध्ये आणि विविध आंतरराष्ट्रीय मंचांवर याच बाबीवर पाकिस्तानविरोधात ठाम भूमिका घेतली होती. आता पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांनी स्वतःच ही गोष्ट कबूल केल्यामुळे त्यांच्यावर आंतरराष्ट्रीय दबाव आणला जाऊ शकतो.
लष्कर-ए-तोयबा बद्दलही दिली प्रतिक्रिया
ख्वाजा आसिफ यांनी त्यांच्या मुलाखतीत लष्कर-ए-तोयबा या कुख्यात दहशतवादी संघटनेचा उल्लेख करत सांगितलं की, “लष्करचा पाकिस्तानशी पूर्वी संबंध होता, परंतु आता ही संघटना संपलेली आहे.” त्यांनी हेही म्हटलं की, “लष्करचा काही काळ पाकिस्तानशी संबंध होता याचा अर्थ असा नाही की आम्ही त्यांना थेट मदत करत होतो.”
‘ऑल आउट वॉर’ चा उल्लेख
भारतासोबत ‘ऑल आउट वॉर’ची शक्यता दर्शवणारे ख्वाजा आसिफ यांनी यावेळी थोडं मवाळ भाषेत बोलताना, पाकिस्तानचा आताचा हेतू शांतीचा असल्याचे संकेत दिले. पण त्यांच्या वक्तव्यातील विसंगती आणि स्वीकृती यामुळे आंतरराष्ट्रीय समुदायाकडून प्रश्न उपस्थित होण्याची शक्यता आहे.
ख्वाजा आसिफ यांच्या वक्तव्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर एक मोठा मुद्दा निर्माण केला आहे. भारताने अनेक वेळा पाकिस्तानवर दहशतवाद्यांना पाठीशी घालण्याचे आरोप केले होते. आता या आरोपांना थेट पाकिस्तानकडूनच दुजोरा मिळाल्याने, पाकिस्तानची जागतिक प्रतिमा आणखी डागाळली आहे.
हे वक्तव्य केवळ एका देशाच्या आंतरराष्ट्रीय संबंधांवर परिणाम करत नाही, तर दहशतवादाविरोधातील जागतिक लढ्याच्या पार्श्वभूमीवरही गंभीर ठरणार आहे.