भारतात एक असं बेट आहे जिथे आजही वेळ थांबली आहे. तिथे न इंटरनेट पोहोचलंय, न मोबाईल सिग्नल. विज्ञानाच्या झगमगाटानं व्यापलेल्या या जगात, इथले लोक अजूनही आदिमानवांसारखं जीवन जगतात. नॉर्थ सेंटिनल बेट! भारतातलं एक असं रहस्यमय बेट, जिथे जाल तर संपाल!!! हे बेट केवळ नकाशावरचं एक ठिकाण नाही, तर ते एक गूढ, आकर्षण आणि आदिम स्वातंत्र्याचं प्रतीक आहे. या बेटावर राहतात ‘सेंटिनली’ – एक अशी जमात जी हजारो वर्षांपासून बाहेरच्या जगाशी कोणताही संपर्क टाळत आली आहे. आजच्या आधुनिक काळातसुद्धा या लोकांनी स्वतःचा वेगळेपणा आणि आपली जीवनशैली अबाधित ठेवली आहे. आणि हेच त्यांना जगातली सर्वात ‘अस्पर्शित’ जमात ठरवतं.
कोण आहेत सेंटिनली?
नॉर्थ सेंटिनल बेट हे अंदमानच्या पश्चिम किनाऱ्यापासून साधारण 36 किमी आणि भारताच्या मुख्य भूमीपासून जवळपास 1200 किमी अंतरावर बंगालच्या उपसागरात वसलेलं एक छोटं बेट. अंदमान निकोबार द्वीपसमूहातले हे एक बेट आहे, पण त्याची कथा इतरांपेक्षा फारच वेगळी आहे. इथे राहणाऱ्या सेंटिनली जमातीचं मानववंशशास्त्रीय स्थान हजारो वर्षांपूर्वीच्या आफ्रिकेतील मानवांच्या स्थलांतराशी जोडलेलं आहे. अभ्यासकांच्या मते त्यांचे पूर्वज 30,000 वर्षांपूर्वी इथं आले असावेत. ही जमात अजूनही फळं, कंदमुळे, शिकार आणि मासेमारीवर जगते. त्यांच्या हातात अजूनही भाले, धनुष्यबाण असतात आणि त्यांची भाषा कोणालाही समजलेली नाही.
त्यांचं जग आपल्यापेक्षा वेगळं नाही, तर पूर्णपणे भिन्न आहे – तिथं ना सरकार आहे, ना नियम, ना तंत्रज्ञान, ना बाजारपेठ. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे, ते त्यांच्या जगात बाहेरच्यांना अजिबात शिरकाव करू देत नाहीत.
का आहे हे बेट ‘नो-एंट्री’ झोन?
नॉर्थ सेंटिनल बेटाबाबत भारत सरकारनं कठोर धोरण पाळलं आहे. कुणालाही या बेटावर जायची परवानगी नाही. यामागे दोन महत्त्वाची कारणं आहेत – एक म्हणजे, सेंटिनलींना बाहेरच्या लोकांचा धोकादायक अनुभव असलेला आहे आणि दुसरं म्हणजे, बाहेरून गेलेल्या व्यक्तीकडून त्यांना संसर्गजन्य रोगांचा धोका होऊ शकतो. अनेक मोहिमा या बेटावर पाठवण्यात आल्या. त्यात काहीवेळा आदिवासींनी स्वागत केलं, पण अनेकदा त्यांनी शस्त्र उगारले. 2004 च्या त्सुनामीनंतर नौदलाच्या हेलिकॉप्टरवर बाण सोडल्याची घटना याचं उत्तम उदाहरण आहे.
एका परदेशी प्रवाशाची चूक आणि पुन्हा चर्चेत आलेलं बेट
अलीकडेच मिखाइल व्हिक्टोरोविच पॉलिकोव्ह नावाच्या एका परदेशी युट्युबरनं या बेटावर परवानगीशिवाय प्रवेश केला. त्यानं व्हिडीओ बनवण्यासाठी नारळं आणि सोडा कॅन सोडले आणि जाताना त्या अनुभवाचा प्रचार केला. पण त्याच्या या कृतीमुळे तो अटकेत गेला आणि पुन्हा एकदा सेंटिनली जमात चर्चेत आली.
ब्रिटिशांचे अपघात आणि भारतीय अभ्यासकांचे प्रयत्न
19व्या शतकात ब्रिटीश अधिकाऱ्यांनी या बेटावर प्रवेश करण्याचा प्रयत्न केला होता. त्यांनी काही आदिवासींना जबरदस्तीने पोर्ट ब्लेअरमध्ये नेलं, पण त्यात दोन वयस्कर व्यक्तींचा मृत्यू झाला. त्यानंतर जेव्हा उरलेली मुलं परत पाठवण्यात आली, तेव्हापासून सेंटिनली लोकांचा बाहेरच्यांबाबतचा अविश्वास अधिक वाढला. 1960-90 दरम्यान भारत सरकारच्या मानववंशशास्त्र विभागानं आणि टी. एन. पंडित यांसारख्या संशोधकांनी भेटवस्तू देत संवाद साधण्याचे प्रयत्न केले. एकदोन वेळा सेंटिनलींनी संवादाला प्रतिसाद दिला, पण त्यांच्या सीमारेषा तेव्हाही त्यांनी बांधल्याच होत्या. “त्यांच्या जगात पाऊल टाकणं हे त्यांना बेटा बाहेरील लोकांचं आक्रमणच वाटते,” असं तज्ञांचे म्हणणे आहे.
संरक्षण की आक्रमण?
सेंटिनली आक्रमक आहेत का? की ते फक्त स्वतःचं रक्षण करत आहेत? या प्रश्नाचं उत्तर इतिहासात दडलंय. जेव्हा-जेव्हा बाहेरचं जग त्यांच्या सीमेत घुसलं, तेव्हा त्यांनी शस्त्र उगारले. पण त्यांनी कधीही आसपासच्या बेटांवर हल्ला केला नाही. ते स्वतःच्या जागेवर, स्वतःच्या पद्धतीनं शांततेनं राहतात.
एक गूढ, पण जिवंत ठेवलं गेलेलं स्वातंत्र्य
आजच्या काळात, जिथे जग एकमेकांशी जोडलेलं आहे, तिथं नॉर्थ सेंटिनल बेट हे जगापासून पूर्णतः तुटलेलं आणि तरीही टिकून राहिलेलं एक उदाहरण आहे. ही जमात ‘विकास’ म्हणवून आपण जे गमावतो ते सावरून बसलेली आहे – माणूसपण, निसर्गाशी नातं, आणि एक स्वतंत्र जीवन. नॉर्थ सेंटिनल हे केवळ एक बेट नाही, तर ते मानवी स्वातंत्र्याचं, आदिकालीन संस्कृतीचं जिवंत प्रतीक आहे. सेंटिनली हे आदिवासी नाहीत, ते एक शिकवण आहेत – की कधी कधी प्रगतीपेक्षा माणूसपण जपणं जास्त मौल्यवान असतं.
कदाचित आपण त्यांच्यापासून दूर राहणं, हाच त्यांच्याशी असलेला आपला आदर ठरेल.