Rahul Gandhi Votechori

Rahul Gandhi:राहुल गांधींच्या वोटचोरी आरोपांचा पर्दाफाश! जाणून घेऊया पूर्ण सत्य

News Trending

BJP vs Congress Vote theft : लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बुधवारी नवी दिल्लीतील पत्रकार परिषदेतून भाजपाला पुन्हा एकदा लक्ष्य केले. गेल्या वर्षीच्या हरियाणा लोकसभा निवडणुकीत भाजपाने निवडणूक आयोगाच्या संगनमताने मतांची चोरी केल्याचा आरोप राहुल यांनी केला. राज्यातील दोन कोटी मतदारांपैकी २५ लाख मतदार बनावट असल्याचा दावा करताना त्यांनी काही उदाहरणेही दिली. पलवड जिल्ह्यातल्या होडल विधानसभा मतदारसंघातील एका घरात ६६ आणि दुसऱ्या घरात ५०१ मतदार कसे, असा प्रश्नही राहुल यांनी उपस्थित केला. सोनीपत जिल्ह्यातील राय मतदारसंघात एका ब्राझिलियन मॉडेलचे छायाचित्र वापरून १० मतदान केंद्रांवर २२ वेळा मतदान केल्याचे राहुल यांनी म्हटले. दी इंडियन एक्स्प्रेसने या दोन्ही ठिकाणांचा दौरा करून पडताळणी केली असता वेगळेच चित्र समोर आले आहे.

मतचोरी झालीच नाही?
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेल्या होडल मतदारसंघातील त्या दोन्ही पत्त्यावर प्रत्यक्षात अनेक कुटुंब राहत असल्याचे समोर आले आहे. त्यापैकी अनेकांनी आपण विधानसभा निवडणुकीत मतदान केल्याचे दी इंडियन एक्स्प्रेसला सांगितले. सोनीपत जिल्ह्यातील राय येथे ब्राझिलियन मॉडेलचा फोटो वापरलेल्या ओळपत्रावर मतदान करणाऱ्या चार महिलांबरोबरही इंडियन एक्स्प्रेसने संवाद साधला. या चारही महिलांनी कोणत्याही अडचणीशिवाय आपण विधानसभा निवडणुकीत मतदान केल्याची कबुली दिली. विशेष म्हणजे- राहुल गांधी यांनी हा मुद्दा उपस्थित करेपर्यंत त्यांना मतदार यादीतील चुकीच्या फोटोबाबत कल्पनाही नव्हती.

होडल मतदारसंघातील वास्तव काय?
“होडल विधानसभा मतदारसंघात भाजपाच्या जिल्हा उपाध्यक्षांच्या घरात ६६ मतदार दाखवण्यात आले आहेत; तर दुसऱ्या एका घरात ५०१ मतदार नोंदवलेले असून ते घरच सापडले नाही,” असा आरोप राहुल गांधींनी पत्रकार परिषदेत केला होता. मात्र पडताळणीत वेगळे वास्तव समोर आले. गुधराणा गावातील घर क्रमांक १५० हे भाजपाचे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष उमेश गुधराणा (४०) यांच्या नावावर आहे. राहुल गांधींनी ज्या मतदारांचा उल्लेख केला होता, त्यापैकी बरेच मतदार त्यांच्या कुटुंबातील सदस्य असल्याचे स्पष्ट झाले आहे.

उमेश यांचे काका राजपाल गुधराणा म्हणाले, “माझे वडील आणि त्यांचे तीन भाऊ सुमारे ८० वर्षांपूर्वी या गावात राहायला आले होते. आमच्याकडे सुमारे १० एकर जमीन होती. जसजसे कुटुंब वाढत गेले, तसतसे त्यातील पाच एकर जागेवर प्रत्येकांनी वैयक्तिक घरे बांधली. एकाच जमिनीवर घरे असल्याने प्रत्येक घरासाठी १५० हाच घरक्रमांक वापरला जातो. आमच्या कुटुंबातील चार पिढ्या एकत्रच राहत असल्याने मतचोरीचा प्रश्नच उद्भवत नाही.”

राहुल गांधी यांनी उल्लेख केलेल्या घर क्रमांक २६५ या पत्त्यावर राहत असलेल्या राम सोरौत यांनी सांगितले की, आमच्या कुटुंबात एकूण आठ सदस्य आहेत. सुरुवातीला माझ्या पणजोबांकडे २५ ते ३० एकर शेतजमीन होती. कालांतराने त्यातील बरीच जमीन आम्ही विकली आणि त्यावर अनेकांनी घरे बांधली. सध्याच्या घडीला या जमिनीवर सुमारे २०० घरे आणि तीन खाजगी शाळा आहेत. जमिनीचे तुकडे झाले असले तरीही सर्व मतदारांच्या ओळखपत्रावर ‘घर क्रमांक २६५’ असेच लिहिले आहे. या कुटुंबाशी संबंधित नसलेल्या श्यामवती सिंग या मतदारांनीही सांगितले की, त्यांनी २०१३ मध्ये येथे जमीन खरेदी केली आणि तेव्हापासून याच पत्त्यावरून त्या मतदान करीत आहेत. होडल विधानसभा मतदारसंघात भाजपाने दोन हजार ५९५ मताधिक्याने काँग्रेसचा पराभव केला होता.

Leave a Reply