महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाने सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक दिवंगत नितीन देसाई यांनी उभारलेला कर्जत येथील ‘एनडी स्टुडिओ’ परिचालनासाठी ताब्यात घेतला आहे. या संदर्भातील दायित्व पूर्तता सोहळा मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत विधानभवन येथे संपन्न झाला. या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘एनडी’स आर्ट वर्ल्ड’ या संस्थेस १३० कोटी रुपयांचा धनादेश देऊन हस्तांतरणाची प्रक्रिया अधिकृत केली. या कार्यक्रमास राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उममुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार उपस्थित होते.
एनडी स्टुडिओची वैशिष्ट्ये आणि भविष्यातील योजना
• ४७ एकरचा विस्तीर्ण परिसर: येथे चित्रपट, वेब सिरीज, जाहिरातींचे चित्रीकरण तसेच पर्यटन, समारंभ, फोटोशूट, मेळावे आणि प्रशिक्षण यासारख्या उपक्रमांसाठी उत्तम सुविधा.
• वास्तूंच्या प्रतिकृती आणि भव्य सेट: ऐतिहासिक, पौराणिक तसेच आधुनिक थीमवरील भव्य सेट उपलब्ध, जे हिंदी आणि मराठी चित्रपटांसाठी उपयुक्त ठरणार.
• महसूल वाढीसाठी उपक्रम: चित्रीकरण, पर्यटक आकर्षित करणे आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन यामुळे महसूल वाढीला गती मिळणार.
विशेष कृती पथकाची स्थापना
• प्रशासकीय आणि विकासात्मक कामांसाठी विशेष कृती पथक स्थापन:
• सह व्यवस्थापकीय संचालक, विशेष कार्यकारी अधिकारी, मुख्य प्रशासकीय अधिकारी, मुख्य लेखावित्तधिकारी, व्यवस्थापक (कलागारे), उप अभियंते (स्थापत्य आणि विद्युत) आदी सदस्य म्हणून काम पाहणार.
• वित्तीय, विधी, आयटी, मनुष्यबळ आदी क्षेत्रातील तज्ज्ञ सल्लागारांचा समावेश.
शासनाच्या निर्णयामुळे चित्रपटसृष्टीला चालना
• शासनाने स्टुडिओच्या नियमित प्रशासन, सुरक्षा, महसूल वाढ आणि लेखा व्यवहारांची जबाबदारी सांस्कृतिक महामंडळाच्या नियंत्रणाखाली ठेवली आहे.
• सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने स्टुडिओला भेट दिली आणि व्यवस्थापन अधिकाऱ्यांशी चर्चा केली.
• मुंबईतील गोरेगाव फिल्मसिटी अंतर्गत स्टुडिओची देखरेख आणि व्यवस्थापन होणार.
एनडी स्टुडिओच्या भविष्यासाठी सकारात्मक दिशा
कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्या दुर्दैवी निधनानंतर ‘एनडी स्टुडिओ’च्या भवितव्याबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले होते. मात्र, शासनाच्या या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे स्टुडिओचे व्यवस्थापन अधिक सशक्त होणार असून, महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाला चालना मिळणार आहे. आगामी काळात मोठ्या प्रमाणावर चित्रपट आणि मनोरंजन उद्योगाला या स्टुडिओच्या माध्यमातून चालना मिळेल इतके नक्की.