Nashik Crime:महिन्याभरापूर्वी झालेल्या भांडणाचा राग, लैंगिक अत्याचार आणि दगडाने ठेचून हत्या

महिन्याभरापूर्वी झालेल्या भांडणाचा राग, लैंगिक अत्याचार आणि दगडाने ठेचून हत्या

नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात एक अत्यंत दुःखद आणि भयानक घटना घडली. या घटनेने संपूर्ण परिसरात शोक आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. तीन वर्षांच्या एका चिमुकलीचा संशयास्पदरित्या मृतदेह आढळल्याने गावात आणि जिल्ह्यात एक असह्य दुःखाची लाट उसळली.

सकाळपासून खेळणारी ही चिमुकली गावात सापडेना म्हणून तिच्या कुटुंबियांनी शोधाशोध सुरू केली. दोन ते अडीच तासांनंतरही तिचा शोध लागला नाही. त्यानंतर कुटुंबियांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. रात्री गावकऱ्यांनी शोध घेतला असता, गावाच्या खेटून असलेल्या मोबाईल टॉवरजवळ तिचा छिन्नविछ्छन अवस्थेतील चेहरा असणारा मृतदेह आढळला.

गावातीलच २४ वर्षीय विजय संजय खैरनार या नराधमाने या चिमुकलीवर आधी लैंगिक अत्याचार केला आणि नंतर डोके दगडाने ठेचून तिची हत्या केली. आरोपी आणि मुलीच्या वडिलांमध्ये महिनाभरापूर्वी भांडण झाले होते. या भांडणाचा राग मनात धरुन या नराधमाने अल्पवयीन मुलीसोबत अमानुष प्रकार केला. पोलिसांनी तात्काळ आरोपीला अटक केली आहे.

या घटनेमुळे नाशिकमध्ये संतापाचे वातावरण आहे. गावकऱ्यांनी आरोपीवर तातडीने फास्टट्रॅक कोर्टात खटला चालवून कठोरातील कठोर अशी फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे. या घटनेने समाजात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. अशा अमानुष कृत्यांना शिक्षा न मिळाल्यास समाजात अन्यायाचे वातावरण निर्माण होते.

आज डोंगराळे गाव शोकसागरात बुडालं आहे. आपण सगळे फक्त एवढीच प्रार्थना करू शकतो, की त्या चिमुकलीला न्याय मिळावा, आणि यापुढे कोणत्याही लेकीसोबत असा अमानुष प्रकार होऊ नये.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *