मूळचा सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील असलेला सिकंदर शेख हा कोल्हापूरच्या गंगावेश तालमीत घडलेला एक गुणी पैलवान आहे.: तो आंतरराष्ट्रीय दर्जाचा कुस्तीपटू म्हणून ओळखला जातो.सिकंदर शेख हा २०२४ चा ‘महाराष्ट्र केसरी’ विजेता आहे. यापूर्वी, २०२३ च्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील माती गटातील अंतिम लढतीत पंचांच्या निर्णयामुळे वाद निर्माण झाला होता, ज्यामुळे सोशल मीडियावर सिकंदरला जनतेचा मोठा पाठिंबा मिळाला होता. मात्र तोच महाराष्ट्र केसरी वादात सापडलाय. सिकंदर शेखला पंजाब पोलिसांनी अवैध शस्त्र तस्करीच्या आरोपाखाली अटक केली.पंजाबमधील मोहाली येथे ही कारवाई करण्यात आली. सिकंदर शेखवर हरियाणा आणि राजस्थानमधील कुख्यात ‘पपला गुर्जर’ टोळीशी संबंध असल्याचा आणि त्यांना अवैध शस्त्रांचा पुरवठा केल्याचा गंभीर आरोप पंजाब पोलिसांनी लावला आहे.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, सिकंदर उत्तर प्रदेशातून शस्त्रे आणून पंजाब आणि आसपासच्या परिसरात पुरवत होता.सिकंदरने स्वतःच्या प्रतिमेचा वापर शस्त्र विक्रीसाठी केला होता, असेही पोलिसांनी नमूद केले आहे.मोहाली येथील खरड पोलीस ठाण्याच्या हद्दीत ‘आर्म्स ॲक्ट’ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींकडून पाच अवैध पिस्तुलं, काडतुसे आणि दोन आलिशान गाड्या जप्त केल्या.
सिकंदरचे वडील रशीद शेख यांनी पंजाब पोलिसांचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. “माझ्या मुलाला या प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न होत आहे,” असे त्यांनी म्हटले आहे. एका गरीब परिस्थितीत जीवन जगत असताना त्यांचा मुलगा असा गुन्हा करू शकत नाही, असे त्यांचे ठाम मत आहे.महाराष्ट्र केसरी उपविजेता राजेंद्र लोणारी यांच्यासह अनेक कुस्तीपटूंनी हा ‘सुनियोजित कट’ असल्याचा संशय व्यक्त केला आहे. ‘हिंद केसरी’ स्पर्धेतून सिकंदरला बाद करण्यासाठी हे षडयंत्र रचले गेले असावे, असे मत अनेकांनी मांडले आहे.राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या प्रकरणात पंजाबच्या मुख्यमंत्री भगवंत मान यांच्याशी बोलून सिकंदरच्या कुटुंबाला मदत करण्याची विनंती केली होती.
या प्रयत्नानंतर आणि कायदेशीर प्रक्रियेनंतर सिकंदर शेखला जामीन मंजूर झाला आहे, तर त्याच्यासोबत अटक झालेल्या इतर आरोपींना जामीन मिळालेला नाही.
महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखची अवैध शस्त्र तस्करी प्रकरणात झालेली अटक, तो आंतरराष्ट्रीय दर्जाचा पैलवान असल्याने अधिकच चर्चेचा विषय ठरली. कुस्तीच्या रिंगणातून बाहेर पडून अशा गंभीर गुन्ह्यांमध्ये नाव आल्याने त्याच्या कारकिर्दीवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकरणाची पुढील चौकशी आणि न्यायालयीन कार्यवाही काय दिशा घेते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
