माणसाच्या आयुष्याचे अनुक्रमे बालपण, तारुण्य आणि म्हातारपण असे तीन टप्पे असतात. या प्रत्येक टप्प्यातील अनुभवांतून माणूस सर्वार्थाने समृद्ध होत जातो. नाती-गोती, चांगले-वाईट प्रसंग, संघर्ष, प्रथा-परंपरा, सण-समारंभ, सामाजिक व्यवहार आणि नैसर्गिक बदल या सर्वांचा अनुभव घेत तो जगण्याकडून खरी शहाणपणाची शिकवण मिळवत असतो. त्यांच्याकडे शाळा-कॉलेजची पदवी नसली तरी, जन्मापासून वृद्धावस्थेपर्यंतच्या प्रवासात आयुष्याचीच ‘PhD’ मिळवणारे हेच लोक खऱ्या अर्थाने अव्वल ठरलेले असतात.
आपल्या सभोवतीची वृद्ध माणसे आपल्याला नकळतपणे अनेक महत्त्वाच्या गोष्टी शिकवत असतात. आपल्या जगण्याचा पाया भक्कम करण्यात त्यांचा मोठा वाटा असतो. तेच वेळोवेळी आपल्याला समज, संयम, संस्कार आणि संघर्षाची ताकद देत असतात. म्हणूनच, जरा हृदयावर हात ठेवून स्वतःला विचारा… हेच वृद्धत्व जर उद्याच्या जगातून पूर्णपणे नाहीसं झालं तर? मग माणसाचं जीवनचक्र अपूर्णच राहणार नाही का?
आजच्या आधुनिक जीवनपद्धतीमुळे हे वास्तव काळासारखे जवळ येताना दिसते. अनियमित आहार, रासायनिक पदार्थांचे अतिसेवन, दिवसेंदिवस वाढत चाललेलं फास्ट-फूडचं व्यसन, मेहनतीचा अभाव आणि त्यातून निर्माण होणारे विविध आजार… त्या आजारांवर घेतल्या जाणाऱ्या उपचारांसाठीची औषधे आणि त्यामुळे शरीरात होणारे दुष्परिणाम… या सर्व गोष्टींमुळे माणसांचे आयुष्य सतत घटत चालले आहे. आजकाल पन्नाशीच्या पुढे निरोगीपणे जगणारी पिढी फार विरळच दिसून येते. त्यामुळे पुढील पिढीच्या नशिबात म्हातारपण असेल की नाही, याबद्दलही शंका निर्माण होते.
कधीकाळी सहजपणे अठरा-वीस वर्षे नातवंडांसोबत खेळात रमणारी माणसं हल्ली क्वचितच पन्नाशी ओलांडतात. तारुण्यातच आजारपणाने खंगून जातात. जगण्यासाठी विविध प्रकारचा संघर्ष करताना दिसतात. हे कशामुळे? कोणामुळे? याला जबाबदार कोण? आपणच ना?
पुढच्या पिढीच्या आयुष्यात “म्हातारपण” हा टप्पा असेल की नाही हा सारखा प्रश्न उद्भवतो. त्यांना आजी-आजोबा अनुभवायला मिळतील का? वृद्धत्वातील त्यांचे अनुभव, त्यांची माया, त्यांचे शहाणपण आपल्या आयुष्यातून कायमचे गायब होईल का? आपण ज्या वृद्ध आजी आजोबांच्या मायेने वाढलो, अनुभवाने मोठे झालो, त्यांच्या मऊ उबदार अंगाखांद्यावर खेळलो ते सुरंगी क्षण दुर्भाग्यवश पुढल्या पिढीला अनुभवायला मिळतील की नाही हे आता ठामपणे सांगता येणार नाही.
ही भीती फक्त वैयक्तिक नाही, ती संपूर्ण समाजाच्या अस्तित्वाशी निगडित आहे. कारण म्हातारपण हरवलं तर अनुभव हरवतील, संस्कृती हरवेल, शहाणपण हरवेल आणि जगण्याची खरी दिशा हरवेल. प्रगल्भ बुद्धिमत्तेचे, अनुभवसंपन्न असे चालते-बोलते विद्यापीठच नष्ट होऊन जाईल. म्हणूनच, आजच्या धावपळीच्या युगात एकदा स्वतःला विचारा… आपण आपल्या जीवनाच्या शेवटच्या टप्प्याचं अस्तित्व जपू शकू का? की तो टप्पा उद्याच्या पिढीसाठी केवळ आठवणीतील एखादी गोष्ट ठरेल?
