Lalbaugcha Raja : लालबागच्या राजाचं विसर्जन ३६ तासांनी? भरती–ओहोटीचं चुकलेलं गणित की गुजराती-कोळी वाद?

News Trending

Lalbaugcha Raja Ganesh Visarjan : लालबागचा राजा म्हणजे समस्त गणेशभक्तांचं श्रद्धास्थान! येथे भाविक केवळ दर्शनासाठीच नव्हे तर दूरवरूनही आपल्या इच्छा पूर्ण करण्याच्या आशेने येतात. लालबागच्या राजाचं पहिलं दर्शन असो किंवा विसर्जन सोहळा सर्व भाविकांसाठी आस्थेचा विषय असतो. हा विसर्जन सोहळा सुरळीत पार पडावा यासाठी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी ५ सप्टेंबरपासूनच दर्शन बंद केलेलं.

साधारणतः २२ तास लालबागच्या राजाच्या विसर्जनाला लागतातच. पण, यावर्षी ३६ तास झाले तरी लालबागच्या राजाचं विसर्जन होऊ शकलं नाही. अनेक भाविक आमचं काही चुकलं असेल तर माफी मागत होते. आणि इतिहासात प्रथमच राजाचा पाट जड झाल्यामुळे सगळ्यांमध्येच चिंता निर्माण झालेली. लालबागच्या राजाचे विसर्जन निर्धारित वेळेत न झाल्याने उलटसुलट प्रश्न उपस्थित होत आहेत. का लांबलं लालबागच्या राजाचं विसर्जन? कोळी गुजराती वाद नेमका काय आहे, हे आपण जाणून घेऊया…

यंदाच्या विसर्जनात ‘गुजराती तराफा’ हा मुद्दा चर्चेत आला. गिरगाव चौपाटीचे अनुभवी नाखवा हिरालाल वाडकर यांनी सांगितलं की, अनेक वर्षांपासून लालबागच्या राजाचं विसर्जन त्यांनी पारंपरिक पद्धतीने केलं आहे. मात्र, यावेळी मंडळाने गुजरातहून लाखो रुपये खर्चून अत्याधुनिक स्वयंचलित तराफा आणला.

भरती–ओहोटीचं अचूक ज्ञान नसल्याने आणि अनुभवाचा अभाव असल्याने बाप्पाला तराफ्यावर बसवणं शक्य झालं नाही. मुंबईतील इतर गणेशमूर्तींचं विसर्जन कोळी समाजाने यशस्वीरीत्या केल्याचं उदाहरण देत त्यांनी संताप व्यक्त केला. कोळी समाजाने १९३४ मध्ये पहिला गणपती बसवला होता आणि आज त्यांनाच विसर्जन प्रक्रियेतून दूर ठेवणं हा अपमान असल्याचं त्यांचं मत आहे.

विसर्जन उशिरा होण्यामागे नियोजनाचा अभाव हे प्रमुख कारण मानलं जात आहे. लालबागचा राजा सकाळी साडेसात वाजता गिरगाव चौपाटीवर पोहोचला, तेव्हा ओहोटीची वेळ संपून समुद्र खवळलेला होता. सकाळी ५:१६ वाजताची ओहोटीची वेळ विसर्जनासाठी योग्य होती, परंतु त्या वेळी मूर्ती चौपाटीवर पोहोचली नव्हती. सकाळी ११:४४ वाजता भरतीमुळे ४.४३ मीटर उंचीच्या लाटा उसळत होत्या, त्यामुळे मूर्ती अर्धी पाण्यात होती आणि ती तराफ्यावर चढवणं धोकादायक होतं. भरती शांत होण्यासाठी सायंकाळी सहा वाजेपर्यंत वाट पाहावी लागली.

सायंकाळी सात-साडेसातच्या दरम्यान मूर्ती ट्रॉलीतून तराफ्यावर ठेवण्यात आली आणि रात्री आठ-साडेआठ वाजता तराफा समुद्रात निघाला. अखेर तब्बल ३६ तासांच्या प्रतीक्षेनंतर लालबागच्या राजाचं विसर्जन पार पडलं. भरती–ओहोटीची वेळ न पाळणं, मिरवणुकीच्या वेळेत विलंब होणं, तसेच नव्या तराफ्याच्या वापरात तांत्रिक तयारीचा अभाव ही यंदाच्या विलंबामागील मुख्य कारणं ठरली.

कोळी समाजाने या संपूर्ण प्रकारावर नाराजी व्यक्त करत, विसर्जन ही केवळ धार्मिक परंपरा नसून त्यांच्या सांस्कृतिक ओळखीचा भाग असल्याचं स्पष्ट केलं. त्यांनी पुढील वर्षी पुन्हा पारंपरिक पद्धतीने आणि त्यांच्या सहभागानेच विसर्जन व्हावं, अशी मागणीही केली आहे.

Leave a Reply