मराठमोळी कंटेट क्रिएटर, कोकण परी ‘कोकण हार्टेड गर्ल’ म्हणजेच अंकिता वालावलकर लवकरच Bigg Boss हिंदीच्या 19 व्या पर्वात दमदार वाईल्ड कार्ड इंट्री करणार आहे. याबाबत तिने आपल्या इन्स्टाग्राम अकांऊटवर व्हिडीओ शेअर करत माहिती दिली आहे.
बिग बॉस 19 चे पर्व सुरू होऊन आता दोन आठवड्यांचा कालावधी उलटला. या घरात रोज होणारे वाद तर चर्चेत असतातचं, पण त्याबरोबरच इथे नवी नाती देखील बनतात. कधी कधी असलेली नाती बदलतात. या घरातील नाट्यमय वातावरण अनेकांना आवडते. आठवड्यातून एकदा बॉलीवूडचा भाईजान सलमान खान स्पर्धकांची शाळा घेताना दिसतो. त्याचे ‘विकेंड का वार’ हा नेहमीच चर्चेचा विषय ठरतो. आठवड्याभरातील घडामोडींचा आढावा या दिवशी घेतला जातो.
या आठवड्यात अमाल मलिक, अवेज दरबारज, मृदुल तिवारी, कुनिता सदानंद आणि तान्या मित्तल हे स्पर्धक नॉमिनेट झाले होते. तसेच या आठवड्यात एका नव्या स्पर्धकाची वाईल्ड कार्ड एन्ट्री होणार असल्याचे वृत्त देखील समोर आले होते. अशातचं मराठी बिग बॉसचे पाचवे पर्व गाजवलेली अंकिता हिने आपल्या इन्स्टाग्राम अकांऊटवरून बिग बॉसमध्ये सहभागी होत असल्याचा व्हिडीओ शेअर केला.
अंकिताचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. यामध्ये ती, “नमस्कार मंडळी, जसं की तुम्हाला माहिती आहे, बिग बॉस हिंदीच्या घरात आज माझी वाइल्ड कार्ड एन्ट्री होतेय आणि यासाठी मी खूप उस्तुक आहे. बिग बॉस मराठीच्या वेळेस मी स्वत: बिग बॉस पाहिले नव्हते. पण आता, माझ्या गाठीशी अनुभवसुद्धा आहे. त्यामुळेच या प्रवासासाठी मी खूप उत्सुक आहे. बिग बॉस मराठीच्या घरात असतानाही तुम्ही मला खूप प्रेम दिलंत, आशीर्वाद दिलेत. यापुढे देखील तुमचं प्रेम आणि आशीर्वाद माझ्यासोबत राहु द्या”, असे म्हणताना दिसली.
मात्र पुढे खरा ट्विस्ट पाहायला मिळाला. तुमचं प्रेम आणि आशीर्वाद मला ट्रॉफीपर्यंत… असे म्हणेपर्यंत, तिला तिचा नवरा कुणाल आणि बहिण तिला झोपेतून उठवताना दिसत आहेत. म्हणजेच अंकिता बिग बॉस हिंदीचे गोड स्वप्न पाहत असतानाचं तिचा नवरा आणि बहिणीने तिला उठवले. अंकिताचा हा प्रँक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे. अनेकांनी तर व्हिडीओ अर्धाच पाहत उत्सुकतेने हॉटस्टार देखील डाऊनलोड केले. व्हिडीओवर कमेंट्सचा पाऊस पडत आहे.
