Leopard Attacks:गावकऱ्यांच्या गळ्यात खिळे असणारा पट्टा

Leopard Attacks in Pimparkhed village.

Pimparkhed village leopard incident: आपल्या महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातून सध्या एक असा फोटो व्हायरल होत आहे,हा फोटो आहे जुन्नर तालुक्यातील, जिथे महिलांच्या गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा दिसतोय.हे कोणतं दैवी कवच किंवा यात्रेतील प्रथा नाही, तर ही आहे जीव वाचवण्याची धडपड! ही आहे बिबट्याच्या दहशतीखाली जगणाऱ्या गावकऱ्यांची ‘भीती’ आणि ‘बचाव’ करण्याची अनोखी शक्कल.

या महिलांनी आपल्या गळ्यात टोकदार खिळे असलेले पट्टे घालायला सुरुवात केली आहे. हा पट्टा जाड रबराच्या किंवा लोखंडी पट्टीचा असून त्यावर छोटे-छोटे टोकदार खिळे बसवण्यात आले आहेत.

यामागचा विचार अगदी साधा आहे: बिबट्याने जर मानेवर हल्ला केला, तर हे टोकदार खिळे त्याला जोरदार इजा करतील आणि तो हल्ला सोडून देईल.

एका व्हायरल होणाऱ्या महिलेने सांगितलयं की”आमच्यासमोर कुत्र्याला बिबट्याने ओढून नेलं, पण त्याच्या गळ्यात हा पट्टा होता म्हणून त्याचा जीव वाचला. तेव्हापासून आम्हाला हि गवत कापताना, खुरपताना जीव वाचवण्यासाठी हा घालावा लागतोय.”

पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातल्या पिंपरखेड गावात गेल्या काही आठवड्यांपासून एक भयावह संकट घोंगावत होते. १२ ऑक्टोबर २०२५ पासून एका नरभक्षक बिबट्याने सतत हल्ले करून लोकांची झोप हराम केली होती. अवघ्या वीस दिवसांमध्ये या बिबट्याने तिघांचा जीव घेतला. परिणामी संपूर्ण परिसरात भीतीचं आणि अस्वस्थतेचं वातावरण पसरलं.

तिघांचा बळी

या नरभक्षक बिबट्याच्या हल्ल्यात ५ वर्षीय शिवन्या बोंबे, ८२ वर्षीय भागुबाई जाधव आणि १३ वर्षीय रोहन बोंबे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. विशेष म्हणजे, शेतात किंवा घराजवळ असतानाच या निरागस बळींना बिबट्याने लक्ष्य केलं. रोहनवर झालेल्या हल्ल्यानंतर ग्रामस्थांचा संयम सुटला आणि तीव्र संताप उसळला. निदर्शन, रास्ता रोको आणि वन विभागाच्या गाड्यांची जाळपोळ असे प्रकार घडले. पुणे-नाशिक महामार्ग वीस तास ठप्प ठेवण्यात आला होता.

वन विभागाचे प्रयत्न आणि मोहिम

या वेळी राज्याच्या वनविभागाने तातडीने कृती आखली. प्रधान मुख्य वनसंरक्षक, पुणे यांनी अधिकृत परवानगी घेऊन बिबट्याला जेरबंद किंवा ठार करण्याचे आदेश दिले. दहशत माजवणाऱ्या या बिबट्याचा माग काढण्यासाठी शार्प शूटर, पशुवैद्य आणि रेस्क्यू टीमची मदत घेण्यात आली. या बिबट्यावर डार्ट मारण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, पण तो अपयशी ठरला. बिबट्या चवताळला आणि थेट शार्प शूटरवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. अखेर, ४ नोव्हेंबरच्या रात्री साडे दहाच्या सुमारास त्याच्यावर गोळी झाडण्यात आली आणि तो जागीच ठार झाला. या मोहिमेनंतर ग्रामस्थांना दिलासा मिळाला.

संपूर्ण मोहिमेत बिबट्याचे पगमार्क, ड्रोनद्वारे टिपलेली दृश्ये आणि अन्य तज्ज्ञांच्या निरीक्षणावरून हा तोच नरभक्षक आहे, याची खात्री पटली. अंदाजे ५–६ वर्षे वयाचा हा नर बिबट गावकऱ्यांसह संपूर्ण परिसराला चांगलाच धडा मिळून गेला. शवविच्छेदनासाठी त्याचे शव माणिकडोह येथील निवारा केंद्रात हलवण्यात आले.

या भीषण अनुभवामुळे पिंपरखेडच्या ग्रामस्थांनी जीवघेणी भीती अनुभवली. शालेय मुलं, महिला, शेतकरी… सगळ्यांच्याच आयुष्यावर या नरभक्षकाने गडद छाया आणली होती. सरकार आणि प्रशासनाने ज्या प्रमाणात वेगाने प्रतिक्रिया दिली, अशी अपेक्षा मात्र पुढेही ठेवली आहे.

पिंपरखेडच्या या घटनाक्रमाने महाराष्ट्रातील वन्यजनावरे आणि मानवी संघर्षाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आणला आहे. प्रशासनाच्या सावध आणि तातडीच्या कारवाईमुळे आणखी जीवितहानी टळली, हे मात्र नक्की.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *