बॉलिवूडचा बहुप्रतीक्षित चित्रपट ‘Jolly LLB – 3’ लवकरच सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे, मात्र त्याआधीच तो वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. अक्षय कुमार आणि अर्शद वारसी यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. ट्रेलर बद्दल प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता असतानाच, चित्रपट कायद्याच्या कचाट्यात सापडला आहे. ट्रेलरमधील काही दृश्यांमध्ये न्यायव्यवस्थेचा अपमान केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
काय आहे प्रकरण?
सुभाष कपूर दिग्दर्शित या चित्रपटावर वकिली व्यवसायाचे चुकीचे चित्रण केल्याचा आणि न्याय व्यवस्थेची खिल्ली उडवल्याचा आरोप करण्यात आला आहे. या चित्रपटातील एका दृश्यामध्ये न्यायाधीशांसाठी ‘मामू’ हा शब्द वापरल्याचा आक्षेप घेण्यात आला आहे. या कारणावरून कोर्टाने कठोर भूमिका घेतली आहे. पुण्यातील वकील वाजद खान, भारत बिडकर आणि गणेश म्हास्के यांनी या चित्रपटाविरोधात याचिका दाखल केली आहे. याचिकाकर्त्यांनी न्यायव्यवस्थेचा अपमान केल्याचा आरोप करत ‘जॉली एलएलबी-3’ वर बंदी घालण्याची मागणी केली आहे.
कोर्टाचे आदेश
पुणे सिव्हिल कोर्टाने या प्रकरणाचा विचार करून अभिनेता अक्षय कुमार आणि अर्शद वारसी यांना 28 ऑगस्ट रोजी कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. त्यांना आपली बाजू स्पष्ट करण्यास सांगण्यात आले असून, याचिकेवरील पुढील सुनावणी दरम्यान चित्रपटाचे भवितव्य ठरणार आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे निर्माते आणि कलाकारांपुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे. वाद सुटला नाही तर रिलीजवर संकट येऊ शकते. मात्र बॉलिवूड चाहत्यांना आता 28 ऑगस्टच्या सुनावणीची उत्सुकतेने वाट पाहावी लागणार आहे.
‘जॉली एलएलबी-3’ हा 2013 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘जॉली एलएलबी’ आणि 2017 च्या ‘जॉली एलएलबी-2’ या यशस्वी चित्रपटांचा सिक्वेल आहे. या भागात अक्षय कुमार आणि अर्शद वारसी समोरासमोर आल्याचे दाखवले गेले असून, प्रेक्षकांसाठी हे विशेष आकर्षण ठरणार आहे. या चित्रपटात सौरभ शुक्ला, हुमा कुरेशी, अमृता राव, अन्नू कपूर, बोमन इराणी यांसारखे दिग्गज कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. आलोक जैन आणि अजित अंधेरे यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. 19 सप्टेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
