गेल्या काही दिवसांत अमेरिकेत लागोपाठ तीन हत्या झाल्या. डोनाल्ड ट्रम्प यांचे निकटवर्तीय चार्ली कर्क, युक्रेनची नागरिक इरिना जरुत्स्का आणि भारतीय चंद्रा मौली नाग मल्लैया (50). कर्क आणि इरिना या हत्याकांडाला अमेरिकेत माध्यमांनी डोक्यावर घेतले, पण नागमल्लैया यांच्या मृत्यूबाबत फारशी कुठे वाच्यता करण्यात आली नाही. एका क्षणात एक कुटुंब उद्ध्वस्त झाल्याने अमेरिकेतील भारतीय समाजाच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह उभ राहिलं आहे. मात्र आता राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी याबाबत वक्तव्य केले आहे.
अमेरिकेतील टेक्सास येथे भारतीय वंशाचे हॉटेल व्यवस्थापक चंद्रा मौली नागमल्लैया (50) यांची त्यांची पत्नी आणि मुलाच्या डोळ्यांसमोरच हत्या केली. वॉशिंग मशीनवरून उद्भवलेल्या किरकोळ वादातून ही हत्या झाली होती. धक्कादायक बाब म्हणजे, आरोपीने चंद्रामौली यांचा शिरच्छेद करून त्यांचे डोके फुटबॉलसारखे उडवून नंतर कचऱ्याच्या डब्ब्यात फेकले.
या हत्येमागील आरोपी कोबोस मार्टिनेझ (37) हा मुळचा क्युबा येथील आहे. कोबोस आणि चंद्रामौली यांच्यामध्ये वॉशिंग मशीनवरू किरकोळ वाद झाला होता. चंद्रा मौली यांनी कोबोस सोबत स्पॅनिशमध्ये संवाद न साधता, दुसऱ्या कर्मचाऱ्याकरवी त्याला तुटलेल्या वॉशिंग मशीनचा वापर करू नको, असे सांगितले. पण ही गोष्ट थेट न सांगता भाषांतर करून सांगितल्याचा कोबोसला राग आला. यावरून त्याने वाद घालण्यास सुरूवात केली.
सदर घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. यामध्ये आरोपी मोटेलच्या कॉरिडॉरमध्ये चंद्रामौली यांचा पाठलाग करताना दिसत आहे. यावेळी त्यांची पत्नी आणि मुलगा त्याला थांबवण्याचा प्रयत्न करत होते. मात्र कोबोस त्यांच्यावर देखील चाकू उभारून त्यांना लांब करत होता. वारंवार मॅशेटीने (मोठ्या चाकू) हल्ला करत राहिला. काही वेळाने त्यांच्या खिशातील मोबाईल आणि की-कार्ड काढून घेत पुन्हा त्यांचे धड शरीरापासून वेगळे होई पर्यंत हल्ला करत राहिला. धड वेगळे होताच त्याने लाथ मारून ते दोन चार वेळा फुटबॉलसारखे तुडवले त्यानंतर उचलून घेऊन कचऱ्याच्या डब्ब्यात फेकले.
चंद्रा मौली नागमल्लैया, हे मूळचे कर्नाटकातील होते. मागील पाच वर्षांपासून डल्लास शहरातील साम्युएल बुलेव्हार्डवरील डाउनटाउन सूट्स मोटेल मध्ये व्यवस्थापक म्हणून कार्यरत होते. त्यांच्या पश्चात पत्नी निशा आणि 18 वर्षीय मुलगा गौरव आहे. कुटुंबासाठी उभारण्यात आलेल्या फंडरेझरने जवळपास 3 कोटी रूपये जमा केले आहेत.
या हत्येवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आठवडाभरा नंतर यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी आपल्या ट्रुथ सोशल वरील पोस्टमध्ये स्पष्टपणे लिहिले आहे की, क्युबातून आलेल्या एका बेकायदेशीर स्थलांतरित गुन्हेगाराने चंद्रा नगमाल्ले यांचा जीव घेतला. हा व्यक्ती अमेरिकेत असायलाच नको होता. योर्दानिस कोबोस-मार्टिनेझ (३७, क्युबा) याचा गुन्हेगारी इतिहास गंभीर आहे. यापूर्वीच त्याच्यावर मुलांवरील लैंगिक अत्याचार, वाहन चोरी (ग्रँड थेफ्ट ऑटो) आणि तुरुंगवास यांसारखे गंभीर आरोप झाले होते. पण क्युबा सरकारने त्याला आपल्या देशात परत घेण्यास नकार दिल्याने, जो बायडन प्रशासनाने त्याला अमेरिकेतच सोडून दिले, आणि आज त्याच गुन्हेगाराने एका निरपराध भारतीयाचा बळी घेतला, असे मत ट्रम्प यांनी व्यक्त केले.
