भारतीय बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टा अलीकडेच दुसऱ्या बाळाला जन्म दिला. स्वत: च्या बाळासोबतचं तिने इतर बाळांसाठी देखील मातृत्वाचे पाऊल टाकले आहे. ज्वालाने सरकारी रुग्णालयात तब्बल 30 लिटर आईचे दूध दान केले आहे. याबाबत ज्वालाने तिच्या सोशल मीडियावर माहिती दिली.
या पोस्टमध्ये तिने आईच्या दुधाचे महत्व अधोरेखित करत लिहिले आहे की, ” आईचे दूध हे जीवनदायी आहे. हे दूध अकाली जन्मलेल्या आणि आजारी बाळांसाठी जीवनदायी ठरणार आहे. जर तुम्ही दान करू शकत असाल तर नक्की करा. याबाबत जास्तीत जास्त महिलांपर्यंत माहिती पोहचवा आणि गरजू व्यक्तींना मदत करा.” असे लिहिले आहे.
आईचे दूध हे विशेषत: अकाली जन्मलेली मुलं, कमी वजनाची मुलं, अनाथ , ज्या मुलांची आई जन्म देताच मृत्यू पावते किंवा ज्या बाळांच्या आईला दूधाचे प्रमाण कमी असते. अशा वेळी मिल्क बँक महत्वाची भूमिका निभावतात. ज्या महिलांमध्ये दूधाचे प्रमाण जास्त असते, तसेच आपल्या बाळाला दूध पाजल्यानंतर ही शिल्लक राहते. अशा महिला उर्वरित दूध जमा करून गरजू नवजात बालकांसाठी दान करू शकतात. हे दूध पाश्चराईज करून पोहचविले जाते. आईचं दूध पाश्चराइज करून -20 सेल्सियस तापमानावर डीप फ्रीज केले जाते.
2017 पासून दिल्लीमध्ये अशा प्रकारच्या सरकारी मिल्क बँक सुरू झाल्या असून, लेडी हार्डिंग मेडिकल कॉलेज, एम्स आणि आता सफदरगंज हॉस्पिटलमध्ये या सुविधा उपलब्ध आहेत. या ठिकाणाहून पुढे गरजू बाळांसाठी दूध पाठविण्यात येते.
लेडी हार्डिंग मेडिकल कॉलेजच्या नवजात शिशुरोग विभागाच्या संचालिका डॉ. सुष्मा नांगिया यांनी ” दूध दान करण्यापूर्वी त्या महिलेची काटेकोर तपासणी केली जाते. यामध्ये तिचे आरोग्य, संसर्गजन्य आजारांची तपासणी आणि इतर वैद्यकीय तपासण्यानंतरच दूध दान करण्याकरीता ती पात्र आहे अथवा नाही हे ठरविले जाते” असे त्यांनी सांगितले.
ज्वाला गुट्टाचा हा निर्णय निश्चितच प्रेरणादायी आहे. निरोगी सशक्त आईने अशा प्रकारे दूध दान केल्यास, असंख्य निरागस जीवांना नवे आयुष्य मिळू शकेल. हे ज्वालाने आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे.
