प्रेमात आणि युद्धात सगळं माफ असत असं म्हटलं जातं. मात्र भारतात क्रिकेट या दोन्हीपेक्षा मोठं मानलं जातं. विशेषत: पाकिस्तानविरूद्ध खेळताना. क्रिकेट विश्वातील सर्वात हायव्होलटेज ड्रामा म्हणजे भारत – पाकिस्तान मॅच. भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना म्हटलं की भारत पाकिस्तान व्यतिरिक्त जगभरातील चाहत्यांमध्ये एक वेगळाच उत्साह संचारतो. यंदाच्या आशिया कपमधील हा हायव्होलटेज ड्रामा 14 सप्टेंबर रोजी दुबईतील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाणार आहे. पण या सामन्यामुळे प्रचंड वाद निर्माण झाले आहेत.
या सामन्याची तिकीट विक्री 29 ऑगस्टपासून सुरू झाली. मात्र दहा दिवस उलटूनही जवळपास 50 टक्के तिकीटे अद्याप उपलब्ध आहेत. भारत-पाकिस्तान सामना म्हटलं की तिकीट पटापट विकली जातात. वेबसाईटवर मिळेनाशी झाल्यास, चाहते ब्लॅकमध्ये तिकीटं मिळवतात. पण यंदाचे चित्र थोडे वेगळे आहे. या सामन्याची तिकीटे काही केल्या विकली जात नाही आहेत. 2023 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या वेळी तिकीटं 4 मिनिटांत खपली गेली होती. मात्र यंदा 8 हजारांपासून ते प्रीमियम सिट्स सुमारे 4 लाखांपर्यंतच्या सीट्स उपलब्ध असूनही तिकीटे विकली जात नाही आहेत.
जम्मू-काश्मिरमधील पहलगाम येथील हल्ल्यानंतर भारत पाकिस्तान या सामन्यावर बॉयकॉटची मागणी केली जात आहे, आणि आता या मागणीने जोर धरला आहे. अनेक माजी खेळाडू आणि तज्ञांनी सामन्यावर बहिष्काराची मागणी केली. कदाचित यामुळेच तिकीट विक्रीवर परिणाम झाला असल्याचे म्हटले जात आहे. बीसीसीआयने (BCCI) भारत – पाक सामना फक्त आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्येच होईल असे स्पष्ट केले आहे. मात्र क्रिकेट चाहत्यांना हे फारसे रुचलेले दिसत नाहीय.
मे महिन्यात झालेल्या “ऑपरेशन सिंदूर” नंतर क्रिकेटला युद्धाच्या सावल्या झटकता येणार नाहीत, असा अनेकांनी मत व्यक्त केले आहे. पहलगाम हल्ल्यात 26 भारतीय नागरिक शहीद झाल्यानंतर भारताने पाकिस्तान व पाकिस्तान-व्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर केलेल्या कारवाईनंतर दोन्ही देशांमध्ये तणाव वाढला होता.
जुलै महिन्यात सामना जाहीर होताच देशभरातून तीव्र विरोध झाला. आता सामन्याच्या काही दिवस आधी सोशल मीडियावर #BoycottIndvsPak हा हॅशटॅग जोरात ट्रेंड होत आहे. निवृत्त जवान, अभिनेते, ज्येष्ठ पत्रकार आणि माजी क्रिकेटपटू हरभजन सिंगसारखे खेळाडूही या सामन्याच्या बहिष्कारासाठी पुढे आले आहेत.
चार विधी विद्यार्थ्यांनी सर्वोच्च न्यायालयात हा सामना रद्द करण्यासाठी सार्वजनिक हित याचिका दाखल केली होती, मात्र न्यायालयाने ती फेटाळून लावत स्पष्ट केले – “काय एवढी घाई आहे? सामना आहे, होऊ द्या.” तरीही जनभावना ढळलेल्या नाहीत. अनेक भारतीयांसाठी पाकिस्तानविरुद्ध टीम इंडियाला प्रोत्साहन देणे म्हणजे पहलगाम हल्ला आणि नंतर पाकिस्तानने घडवून आणलेल्या युद्धाकडे बीसीसीआय डोळेझाक करत असल्याचे चाहत्यांनी म्हटले आहे.
