शेवटच्या क्षणी बदलली विमानाची दिशा… आणि वाचवले असंख्य जीव!

२ एप्रिल २०२५ ची रात्र. गुजरातमधील जामनगरपासून १२ किमी अंतरावर असलेल्या सुवर्णा गावाजवळ आकाशातून अचानक एक आवाज घुमला. काही क्षणांत जमिनीला हादरा बसला आणि आगीचे लोळ उसळले. हे कुठलं सामान्य अपघात नव्हतं — भारतीय हवाई दलाचे जॅग्वार लढाऊ विमान कोसळले होते.

विमानात होते फ्लाइट लेफ्टनंट सिद्धार्थ यादव, वय फक्त २८. पण धैर्य, शौर्य आणि देशप्रेमाचं ओझं त्याच्या खांद्यावर मोठं होतं.
सिद्धार्थ यादव आणि त्यांचे सहवैमानिक रात्रीच्या मोहिमेसाठी निघाले होते. उड्डाणादरम्यान विमानात तांत्रिक बिघाड झाला. पण घाबरून न जाता या दोघांनीही इजेक्शन प्रक्रियेची तयारी केली. पण त्याआधी… सिद्धार्थने निर्णय घेतला — हे जळतं विमान लोकवस्तीत जाऊ नये!
त्यांनी विमानाची दिशा बदलली, आणि शेवटच्या क्षणाला स्वतःचा जीव गमावून शेकडो जिवांचे प्राण वाचवले.
सहवैमानिकावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पण सिद्धार्थने कर्तव्य बजावत देशासाठी आपले प्राण अर्पण केले.

सिद्धार्थ यादव यांचं बालपण हरियाणातील रेवाडीत गेलं. त्यांचे वडील सुजित यादव हवाई दलात होते, आजोबा ब्रिटिशकालीन पायलट ट्रेनिंग ग्रुपमध्ये. देशभक्ती त्यांच्या नसानसांत होती. २०१६ मध्ये एनडीएची परीक्षा पास करून त्यांनी लढाऊ वैमानिक होण्यासाठी कठोर प्रशिक्षण घेतलं. दोन वर्षांत फ्लाइट लेफ्टनंट पद मिळवून देशाच्या संरक्षणासाठी तयार झाले.

तो केवळ फक्त जवान नव्हता, तर एक स्वप्नवत मुलगा, एक भावी नवरा, आणि कुटुंबाचा आधार होता. फक्त १० दिवसांपूर्वीच त्याचा साखरपुडा झाला होता. नोव्हेंबरमध्ये लग्न ठरलेलं होतं… पण नियतीचं नियोजन वेगळंच होतं.

त्याचे वडिल म्हणाले “तो माझा एकुलता एक मुलगा होता. पण देशासाठी त्यानं जीव दिला… याचा आम्हाला अभिमान आहे.”

या तरुण पायलटने स्वतःच्या प्राणाची आहुती देऊन शेकडो लोकांचे प्राण वाचवले.

तो गेला… पण आपल्या सर्वांना एक प्रेरणा देऊन गेला.
ही केवळ दुर्घटना नाही, ही वीरगाथा आहे.
एका जवानाची… देशावर निस्सीम प्रेम करणाऱ्या तरुणाची !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *