sammoo-village

Diwali 2025:शेकडो वर्षांपूर्वीची ‘तो’ एक शाप आणि गाव अजूनही साजरी करत नाही दिवाळी

Trending

Sammoo Village Diwali Curse: दिवाळीचा सण म्हणजे सगळीकडे उत्साहाचं वातावरण असतं. कुटुंबियांसमवेत प्रत्येकजण हा सण आपापल्या परीने साजरा करण्याचा प्रयत्न करत असतो. पण भारतात असं एक गाव आहे, जिथे गेल्या शेकडो वर्षांपासून प्रत्येक दिवाळीत अंधार असतो. या गावातली मंडळी दिवाळीच्या दिवशी घरात बसून असतात. एवढंच काय, कुणीही फटाके वाजवत नाही वा कोणती रोषणाई केली जात नाही. फारतर गावातल्या लोकांना घरात दिवा लावण्याची परवानगी असते. पण गावाचे रस्ते मात्र सामसूम असतात. आणि या सगळ्यासाठी कारणीभूत आहे ती या गावात काही शे वर्षांपूर्वी घडलेली एक घटना!

या गावाचं नाव आहे सामू. हिमाचल प्रदेशच्या हमीरपूर जिल्ह्यात हे गाव आहे. जिल्ह्याच्या मुख्यालयापासून साधारणपणे २५ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या या गावात एरवी सारंकाही सुरळीत चालू असतं. सगळे सण-उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. पण दिवाळीचा एकमेव सण गावात कुणीही साजरा करत नाही. कुणीही फटाके वाजवायचे नाहीत, उत्सव करायचा नाही, आनंद साजरा करायचा नाही अशी सक्त ताकीदच गावकऱ्यांना दिली जाते. कारण गावाला जवळपास ३ ते ४ शतकांपूर्वी एक शाप मिळाल्याची दंतकथा या गावात सांगितली जाते.

महिलेचा संताप, गावाला शाप!
पीटीआयनं दिलेल्या वृत्तानुसार, गावकऱ्यांमध्ये फार पूर्वी गावात राहणाऱ्या एका गर्भवती महिलेची आख्यायिका सर्वमान्य असून त्यामुळेच गावात ऐन दिवाळीच्या दिवशी सामसूम असते. गावच्या उपसरपंच वीणा देवी यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही गर्भवती महिला तिच्या पतीच्या चितेवर सती गेली होती. पण सती जाण्यापूर्वी या महिलेनं गावाला एक शाप दिला होता. त्यामुळेच गाव गेल्या शेकडो वर्षांपासून दिवाळी साजरी न करण्याची प्रथा नेमाने पाळत आहे. या प्रथेमध्ये कुठेही चूक झाली तर त्याचे विपरीत परिणाम होतात, अशीही ग्रामस्थांची श्रद्धा आहे.

ही गर्भवती महिला दिवाळीच्या दिवशी घरात सणाची तयारी करत होती. त्याचवेळी तिच्या पतीचा मृतदेह तिच्या घरी आणण्यात आला. तिचा पती तेव्हाच्या स्थानिक राजाकडे सैनिक म्हणून काम करत होता. आपल्या शहीद पतीचा मृतदेह पाहून सदर महिलेला भावना अनावर झाल्या. पतीच्या चितेवर सती जाण्याचा निर्णय महिलेनं घेतला. पण सती जाण्याआधी तिने गावाला शाप दिला. या गावात कधीच उत्साहात दिवाळीचा सण साजरा होऊ शकत नाही, असं म्हणत ती महिला पतीच्या चितेवर सती गेली.

Leave a Reply