गणेशोत्सव काळात कोकणात जाणाऱ्या भाविकांची प्रचंड गर्दी लक्षात घेता कोकण रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी नेहमीच नावीन्यपूर्ण सेवा आणत असते. त्यापैकीच एक म्हणजे Roll-on/Roll-off (Ro-Ro) सेवा. सणासुदीला कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना ट्रॅफिककोंडीचा सामना करावा लागतो. ट्रॅफिकपासून सुटका म्हणून कोकण रेल्वेने Ro-Ro सेवा सुरू केली आहे. यंदा गणपती उत्सवादरम्यान हा प्रयोग अमलात आणला जाणार आहे. याला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याने गणेशोत्सव 2025 साठी कोकण रेल्वेने नोंदणीसाठी अधिक लवचिक वेळ दिला आहे. याची घोषणा आज कोकण रेल्वेने प्रसिद्धीपत्रकाद्वारे चाकरमान्यांना खुशखबर दिली आहे.
23 ऑगस्ट 2025 रोजी कोलाडहून सुरू होणाऱ्या पहिल्या Ro-Ro सेवेकरिता नोंदणीची अंतिम तारीख 22 ऑगस्ट 2025 पर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे या पहिल्या सेवेचा लाभ घ्यायचा असेल तर प्रवाशांना शेवटच्या क्षणापर्यंत नोंदणीची संधी उपलब्ध होणार आहे.
पुढील प्रवासासाठी 3 दिवस आधी नोंदणी
24 ऑगस्ट ते 11 सप्टेंबर 2025 या काळातील सर्व पुढील जाहीर Ro-Ro प्रवासासाठी नोंदणी प्रवासाच्या तारखेपूर्वी किमान तीन दिवस आधी, संध्याकाळी 5 वाजेपर्यंत करता येणार आहे. उदाहरणार्थ, जर Ro-Ro सेवा 1 सप्टेंबर रोजी असेल, तर त्या प्रवासाची नोंदणी 28 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 5 वाजता बंद होईल.
पुरेशी नोंदणी न झाल्यास?
जर कोणत्याही जाहीर Ro-Ro प्रवासासाठी आवश्यक तेवढी नोंदणी झाली नाही, तर त्या प्रवासाच्या नोंदणी बंद होण्याच्या दिवशी (म्हणजेच प्रवासाच्या तीन दिवस आधी) ग्राहकांना याची माहिती देण्यात येईल. अशा परिस्थितीत ती सेवा रद्द करण्यात येईल व प्रवाशांनी भरलेली नोंदणी फी पूर्णपणे परत केली जाईल.
प्रवाशांच्या सोयीसाठी लवचिकता
गणेशोत्सवाच्या काळात कोकणात गाड्यांसह जाणाऱ्यांसाठी Ro-Ro सेवा मोठा दिलासा ठरेल. त्यामुळे यावर्षी नोंदणी प्रक्रियेत दिलेली लवचिकता प्रवाशांसाठी अतिशय उपयुक्त ठरणार आहे. शेवटच्या क्षणापर्यंत नोंदणीची संधी मिळाल्याने भाविकांना प्रवासाचे नियोजन सुलभ होणार आहे.
