News

Ganeshotsav 2025 : फिरा फिकानेट- कांगितेन गणपती तुम्हाला माहीत आहेत का? भारताआधीही जपान-थायलंडमध्ये साजरा व्हायचा गणेशोत्सव!

History and culture of Ganesh festival: गणेशोत्सव हा आबाल वृद्धांचा आवडता सण. प्रचंड उर्जा आणि उत्साहाचा सण म्हणजे गणेशोत्सव. पण तुम्हाला माहीत आहे का, गणेशोत्सव हा भारतामध्ये पहिल्यांदा सुरु झाला नाही. आग्नेय आशियामध्ये गणपतीपूजन पहिल्यांदा सुरु झाले. भारतातील गणेशोत्सव सुरु होण्याआधी बौद्ध, जैन धर्मातही गणपतीबाप्पाची पूजा होत असे. भारतात गणेशोत्सव सुरु कसा सुरु झाला याची इंटरेस्टिंग स्टोरी बघूया…

मायथॉलॉजीचा अभ्यास करणारे गणरायाचे वर्णन करताना ‘सीमांपलीकडचा देव’ असे करतात. सर्व जाती, धर्माच्या सीमा ओलांडून गणरायाची स्थापना आणि पूजा केली जाते. हे केवळ आजच घडत आहे असे नाही तर गणरायाला भारत वगळता इतर अनेक देशांमध्ये पूजण्याची परंपरा काही शतके जुनी आहे.

भारत हा देश प्राचीन व्यापारात महत्त्वाची भूमिका बजावत होता, भारताचे व्यापारी संबंध जसे पाश्चिमात्य देशांशी होते, तसेच आग्नेय आशियाई देशांशी देखील होते. किंबहुना या सर्व देशांच्या संस्कृतींवर भारतीय संस्कृतीची छाप असल्याचे आपण पाहू शकतो. त्याचीच परिणती म्हणून भारतीय हिंदू, बौद्ध आणि जैन धर्मांचा प्रसार या देशांमध्ये झाल्याचा इतिहास आहे. त्यामुळेच आजही हे देश रामायण, महाभारत, गणेश पूजनाची परंपरा त्यांच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग असल्याचे मानतात. प्राचीन व्यापाराच्या निमित्तानेच गणेश पूजनाची परंपरा या देशांमध्ये पोहोचल्याचे अभ्यासक नमूद करतात.

आग्नेय आशियात पाचव्या शतकात गणेशाचे शिलालेख
‘भारतीय आणि आग्नेय आशियाई कला’ या विषयाचे प्राध्यापक रॉबर्ट एल. ब्राउन यांनी त्यांच्या गणेशावरील संशोधनात, आग्नेय आशियातील गणेशाचे सर्वात जुने शिलालेख आणि प्रतिमा इसवी सन ५ व्या आणि ६ व्या शतकातील असल्याचे नमूद केले आहे. कंबोडियामध्ये, गणेशाला अर्पण केलेली मंदिरे अस्तित्त्वात होती. किंबहुना ७ व्या शतकापासून गणेशाची या देशांमध्ये आराध्यदैवत म्हणून उपासना केली जात होती. म्हणजेच भारतामध्ये गाणपत्य संप्रदाय अधिक प्रसिद्ध आणि लोकप्रिय होण्याआधीच या देशांमध्ये गणेशाला आराध्य मानले गेले होते.

जपानमधील गणेशोत्सव

जपानमध्ये, गणपतीला ‘कांगितेन’ म्हणून संबोधले जाते, गणरायाचे हे रूप जपानी बौद्ध धर्माशी संबंधित आहे. जपानमध्ये गणेशाला वेगवेगळ्या रुपात दर्शविण्यात आले होते. या वेगवेगळ्या स्वरूपातील कांगितेन हे रूप विशेष प्रसिद्ध आहे. या रुपात दोन गणेश एकमेकांना आलिंगन देताना दर्शविले जातात. हे गजशीर असलेले नर आणि मादी प्रणयात एकमेकांना मिठी मारत असल्याचे चित्रित केलेले आहे.

इतर काही रूपांमध्ये चतुर्भुज गणेशाच्या हातात मुळा आणि गोड पदार्थ दाखविले जातात. जपानमध्ये कांगितेनचे पहिले स्वरूप ८ व्या-९ व्या शतकातील असल्याचे मानले जाते. गणेशाचे भारतीय अंकन सर्वात आधी चीनमध्ये गेले मग तेथून ते जपानमध्ये गेल्याचे मानले जाते. गणेशाचे हे रूप पुष्कळ सामर्थ्यवान आणि संपन्न असल्याचे जपानमध्ये मानले जाते. जपानमध्ये कांगितेनची पूजा सामान्यतः व्यापारी आणि अभिनेते यांच्यामध्ये अधिक लोकप्रिय आहे.

तिबेट आणि दीपंकर अतिश
तिबेट मध्ये बौद्ध धर्मातील गणेशाची ओळख ११ व्या शतकात भारतीय बौद्ध धर्मगुरू अतिश दीपंकर सृजन आणि गयाधर यांनी केली. तिबेटमधील गाणपत्य पंथाचे संस्थापक म्हणून ओळखल्या जाणार्‍या अतिश यांनी भारतातील तांत्रिक स्वामींनी लिहिलेल्या गणेशावरील अनेक भारतीय ग्रंथांचे तिबेटन भाषेत भाषांतर केले आहे. दुसरीकडे, गायधरा, हे काश्मीरमधील होते. त्यांनी तिबेटमधील गणेशपंथासाठी गणेशाशी संबंधित अनेक भारतीय ग्रंथांचे भाषांतर करून देण्याचे काम केले. तसेच गणेशाची उपासना आणि गणेशाची साधना तिबेटमध्ये लोकप्रिय केली.

तिबेटी लोकांनी गणेशाशी सलंग्न पंथ वाढविला, संबंधित कथनांचा प्रसार केला. १७ व्या शतकातील गणेशाशी संबंधित मिथकं, त्याच्या जन्माच्या विविध कथा आणि प्रसंग सांगतात. या कथांनुसार शिवाला उमा आणि गंगा या दोन पत्नी होत्या. उमा हिने दिलेल्या शापामुळे गंगेच्या नवजात मुलाने शीर गमावले. नंतर, गंगेला तिच्या मुलाचे शीर बदलण्यासाठी मृत शरीराचे शीर वापरण्याचा सल्ला दिला जातो आणि अशा प्रकारे गजमुख गणेश जन्माला येतो. गणेशावरील तिबेटी दंतकथा मूलत: भारतीय पुराणातील कथांसारख्याच आहेत.

थायलंडमध्ये बौद्ध गणेशाचा जन्म
गणेशाला थायलंडमध्ये ‘फिरा फिकानेट’ म्हणून संबोधले जाते. यशाची देवता आणि सर्व अडथळे दूर करणारा म्हणून त्याची पूजा केली जाते. थाई बौद्धांमध्ये नवीन व्यवसाय सुरू करताना किंवा लग्नाच्या प्रसंगी या देवतेची पूजा करणे सामान्य मानले जाते. कला आणि संस्कृतीशी निगडीत थायलंडच्या ललित कला विभागाच्या चिन्हाचा-लोगोचा एक भाग म्हणून गणेशाची प्रतिमा वापरली जाते. संपूर्ण थायलंडमध्ये गणेशाच्या मूर्ती आणि मंदिरे आढळतात, बँकॉकच्या रत्चाप्रसाँग शॉपिंग डिस्ट्रिक्टमध्ये असलेली गणेशाची प्रतिमा प्रसिद्ध आहे. भारतात गणेश चतुर्थी साजरी केली जाते त्याच वेळी थाई बौद्ध गणेशाचा जन्म साजरा करतात.

गणपतीच्या कोणत्या इंटरेस्टिंग स्टोरीज तुम्हाला वाचायला आवडतील हे आम्हाला कमेंट करून सांगा.. .

Team Jabari Khabari

Recent Posts

Pune Murder 2025: पुण्यात ‘खून का बदला खून’ आंदेकर v/s कोमकर

Pune Gangmurder Case2025: पुण्यातील नाना पेठ परिसरात मूळ असलेल्या आंदेकर टोळीचा इतिहास सुमारे ४० वर्षांहून…

2 hours ago

Crime Story: भुतामुळे उघडकीस आली लव्ह ट्रँगल हत्या!

Crime News : उत्तर प्रदेशातील मुस्कान रस्तोगी आणि इंदूरच्या सोनम रघुवंशीने त्यांच्या पतीला कट रचून…

3 hours ago

Who is Zohran Mamdani:न्यूयॉर्कच्या महापौरपदावर भारतीय वंशाच्या मुस्लीम व्यक्तीचा ठसा; कोण आहेत जोहरान ममदानी?

अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये २०२५ च्या महापौरसाठीच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत भारतीय वंशाचे जोहरान ममदानी यांनी…

21 hours ago

JJ Hospital Shootout:मुंबईला हादरवणारे हत्याकांड! ३२ वर्षांनी येणार सत्य बाहेर

१२ सप्टेंबर १९९२. मुंबईतील जे.जे. रुग्णालयात तो नेहमीसारखाच एक दिवस होता. डॉक्टर्स रुग्णांच्या तपासणीत व्यग्र…

21 hours ago

हिवाळ्यात राजकीय तापमान वाढणार! पहिल्या टप्प्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुका जाहीर

राज्य निवडणूक आयोगाने अखेर महाराष्ट्रातील नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने…

2 days ago

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वाजणार बिगुल! राज्य निवडणूक आयोगाची मोठी अपडेट

राज्यातील बहुप्रतीक्षित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा लवकरच होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून दुबार मतदारांवरून…

2 days ago