गणेशोत्सवाच्या काळात कोकणात जाणाऱ्यांची मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर प्रचंड गर्दी होते. या वाहतूककोंडीमुळे तासनतास नागरीक अडकून पडू नयेत म्हणून परिवहन मंडळाने उपाय काढला आहे. राष्ट्रीय महामार्गावरून जाणाऱ्या 16 टनांपेक्षा जास्त वजनाच्या वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. याबाबत पनवेल प्रादेशिक परिवहन अधिकारी (RTO) निलेश धोते यांनी माहिती दिली.
जड वाहनांना 23 ऑगस्ट रोजी पहाटे 12.01 वाजल्यापासून 28 ऑगस्ट रात्री 11 वाजेपर्यंत बंदी लागू करण्यात आली आहे. याशिवाय 31 ऑगस्ट व 2 सप्टेंबर रोजी सकाळी 8 ते रात्री 11 वाजेपर्यंत, तसेच 6 सप्टेंबर सकाळी 8 पासून 7 सप्टेंबर रात्री 8 वाजेपर्यंत ही बंदी कायम राहणार आहे.
यामध्ये दूध, इंधन, एलपीजी सिलेंडर, औषधे, लिक्विड मेडिकल ऑक्सिजन, अन्नधान्य, भाजीपाला यांसारख्या वाहतुकीला सूट देण्यात आली आहे. तसेच JNPT आणि जयगड बंदरांवरील आयात-निर्यात मालवाहतूक करणारी वाहने ही याला अपवाद ठरणार आहेत. आदेशांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कडक कारवाई केली जाणार असून, वाहतूक सुव्यवस्थित ठेवणे हेच प्रशासनाचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे परिवहन विभागाने स्पष्ट केले आहे.
दरर्वषी मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, वसईसह संपूर्ण मुंबई उपनगरातील हजारो भक्त गणेशोत्सवासाठी कोकण व गोव्यात जातात. त्यामुळे मुंबई-गोवा मार्गासह पुणे-कोकण रस्त्यावर मोठमोठ्या वाहनांमुळे प्रचंड ट्रॅफिर जॅम निर्माण होतो. यामुळेच यंदा हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
