Lifestyle

जगातील पहिले ‘रिक्लेमेशन’! जेव्हा भगवान परशुरामांनी समुद्राला मागे हटवून कोकण घडवले

कोकण म्हटलं की डोळ्यांसमोर येतात ते हिरवेगार डोंगर, निळाशार समुद्र आणि हापूस आंब्याचा सुगंध. पण या निसर्गसंपन्न भूमीच्या निर्मितीमागे एक अत्यंत रंजक आणि तितकाच संघर्षाचा इतिहास आहे. आजच्या आधुनिक परिभाषेत ज्याला आपण ‘रिक्लेमेशन’ (समुद्र हटवून जमीन मिळवणे) म्हणतो, त्याचे खरे आद्य प्रवर्तक म्हणजे भगवान परशुराम. या भूमीच्या निर्मितीची कथा सुरू होते एका महाभयंकर क्रोधातून आणि संपते एका शापित रहस्यात.

ततः शूर्पारकं देशं सागरस्तस्य निर्ममे । सहसा जामदस्यस्य सोऽपरान्तमहीतलम् ॥७७॥
महाभारत, शांतिपर्व, अ. ४९
जमद‌ग्निकुमार परशुरामांसाठी समुद्र मागे हटला. त्यामुळे शूर्पारक देश निर्माण झाला. त्याला अपरान्तभूमी असेही म्हणतात किंवा परशुरामक्षेत्र असेही म्हणतात.

वैतरणेपासून म्हणजे आताच्या पालघर जिल्ह्यापासून कन्याकुमारीपर्यंतचे हे परशुरामक्षेत्र आहे. भगवान परशुरामांनी आपले वडील महर्षी जमदग्नी यांची हत्या करणाऱ्या उन्मत्त सहस्त्रार्जुनाला व छोट्या-मोठ्या सत्तांध राजांना युध्दभूमीत पराभूत करून शस्त्र खाली ठेवले. जिंकलेली पृथ्वी त्यांनी सुजाण राज्यकर्त्यांच्या स्वाधीन करण्यासाठी कश्यप मुनींना अर्पण केली. दान केलेल्या भूमीत स्वतः रहाणे योग्य नाही म्हणून परशुरामांनी कोकणच्या किनारपट्टीवर असलेल्या अथांग सागराला थोडे मागे हटण्याची विनंती केली. सागराने ती विनंती मान्य केली नाही म्हणून परशुरामांनी बाण मारून समुद्र मागे हटविला. गुजराथपासून केरळपर्यंत नवा भूप्रदेश निर्माण झाला व परशुरामांनी तपश्चर्येसाठी महेंद्र पर्वताची निवड केली. तो पर्वत म्हणजेच चिपळूण जवळ असलेले श्री क्षेत्र परशुराम.

अग्रतः चतुरो वेदाः पृष्ठतः सशरं धनुः ।
इदं ब्राह्मम् इदं क्षात्रं शापादपि शरादपि ।।

श्रीविष्णूच्या या चिरंजीव अवताराने महेंद्र पर्वत म्हणजे कोकणातील आजचे परशुरामक्षेत्र तपश्चर्येसाठी निवडले. वाशिष्ठी नदीच्या काठावर चिपळूण-गुहागर येथे पहिली आर्य संस्कृती वसली. रोपटे उगवल्यावर पुन्हा ते उपटून दुस-या जागी लावल्यावर पीक मोठ्या प्रमाणात मिळते, ही किमया त्यांच्याच संकल्पनेतून पुढे आली. याच भूमीतील महेंद्र पर्वतावर परशुरामांनी आपली तपश्चर्या केली. हा महेंद्र पर्वत म्हणजे आताचे चिपळूण तालुक्यातील परशुराम मंदिर जेथे आहे, तो परिसर असल्याचे मानले जाते. इथे अनेक वर्ष तप केल्यानंतर मग ते तीर्थयात्रेला निघून गेले. परशुराम चिरंजीव आहेत त्यामुळे ते रोज सकाळी तीर्थयात्रेला जाऊन संध्याकाळी या ठिकाणी परत येतात अशी समजूत आहे.

परशुराम यांच्याबद्दल ब्रिटिश अभ्यासकांनी दिलेल्या दाखल्यांमधून थोडी वेगळी माहिती पुढे येते.

चिपळूण मधील परशुराम मंदिराबद्दलची एक आख्यायिका क्रॉफर्ड नावाच्या एका ब्रिटिश गव्हर्नरने आपल्या ‘लिजेंड्स ऑफ कोकण’ या पुस्तकात नमूद केली आहे. एकेकाळी या भागामध्ये नाग वंशीयांची दाट वस्ती होती. मात्र जंगलातील हिंस्त्र श्वापदे आणि समुद्राच्या अजस्त्र लाटा यामुळे हा समाज भयभीत होता. सततच्या या भीतीमुळे त्यांनी देवाचा धावा सुरू केला. त्यांची हाक ऐकून भगवान परशुरामांनी त्यांना अभय दिलं आणि त्यांच्यासाठी कायम इथेच वास्तव्य केलं.

इतकी संपन्नता असूनही कोकणच्या नशिबी ‘शापित भूमी’ असा शब्द का जोडला गेला?

एका कथेनुसार, परशुरामांनी हा प्रदेश रागाने समुद्राला हटवून निर्माण केला, त्यामुळे येथील माती तप्त आणि लाल झाली. जेव्हा आदिशक्तीचे या भूमीत आगमन झाले, तेव्हा या जमिनीची उष्णता पाहून त्या अस्वस्थ झाल्या आणि त्यांच्या मुखातून ‘जळो ते कोकण’ हे शब्द बाहेर पडले. मात्र, नंतर देवतांच्या विनंतीवरून त्यांनी ‘जळो पण पिको’ असा उःशाप दिला. याचा प्रत्यय आजही येतो; कोकणात शेती करण्यापूर्वी शेतकरी काही भाग जाळतात, त्याशिवाय तिथे चांगले पीक येत नाही. दुसरी कथा लोकमानसातील स्वभाववैशिष्ट्यांवर भाष्य करते. असे म्हणतात की, परशुरामांनी जाताना लोकांना संकटसमयी मदतीसाठी एक मंत्र दिला होता. मात्र, काही लोकांनी खरंच होतं का हे पाहण्यासाठी तो मंत्र उच्चारला. जेव्हा परशुराम प्रकट झाले आणि तिथे कोणतेही संकट नसल्याचे त्यांना समजले, तेव्हा त्यांनी रागाने शाप दिला, “तुम्ही कधीही उत्कर्षाचा पूर्ण उपभोग घेऊ शकणार नाही.” संपन्नता असूनही कोकणचे असलेले चित्र पाहता याची सातत्याने जाणीव होते. हे सत्त्व आजही या भूमीत पाहायला मिळते.

कोकण ही केवळ भूमी नसून भगवान परशुरामांच्या तपश्चर्येचे आणि कष्टाचे फळ आहे. जरी शापाच्या कथा जोडल्या गेल्या असल्या, तरी ‘जळो पण पिको’ या उक्तीप्रमाणे आजही ही माती जगाला हापूस, काजू आणि साहित्याची श्रीमंती देत आहे.

Team Jabari Khabari

Share
Published by
Team Jabari Khabari

Recent Posts

एका रेफ्यूजीने ऑल इंडिया रेडिओ ची धून बनवली होती.

भारताचा स्वातंत्र्यपूर्व काळ. तेव्हा फोन नव्हते, ना कुठलं सोशल मिडिया. रोजचा पेपर सकाळी तसाही उशिराच…

5 days ago

लग्न नको म्हणून रचला सिने स्टाईल प्लॅन; सापाची कात ठेवून प्रियकरासोबत काढला पळ

उत्तर प्रदेशातील औरैया जिल्ह्यात एक धक्कादायक आणि तितकाच फिल्मी प्रकार समोर आला आहे. लग्नापासून सुटका…

6 days ago

सामान्यांचे हजारो कोटी रुपये घेऊन महावितरणचा ‘व्हीलिंग चार्जेस’ घोटाळा

आपण दरमहा वीज बिल भरतो, पण त्यातील प्रत्येक आकड्याचा अर्थ आपल्याला माहित असतो का? वीज…

1 week ago

आसाम, बंगाल ते दक्षिण भारत विधानसभा निवडणुका २०२६… देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लढत

२०२६ जसं चालू झालं, तसं एकूणच देशाच्या राजकारणाच्या दृष्टीने रोमांचक लढत घेऊन आलं. मुंबई महानगरपालिका…

1 week ago

Reko Diq Project – तांबे आणि सोन्याच्या जागतिक बाजारपेठेवर कब्जा मिळवण्यासाठी अमेरिकेची खेळी

आज जगातील सर्वच बलाढ्य देश आपल्या सोन्याच्या साठ्यात वाढ करण्यासाठी धडपडत असल्याचे चित्र आहे. आर्थिक…

1 week ago

मणिपूर: एका विजनवासाचा अंत की संघर्षाच्या नव्या अध्यायाची सुरुवात?

मणिपूर, भारताच्या प्रसिद्ध सेव्हन सिस्टर्स पैकी एक भौगोलिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या प्रगत राज्य. जिथे एकेकाळी निसर्गाचे…

1 week ago