अलिकडच्या काळात घटस्फोट ही जरी एक सामान्य घटना असली तरी घटस्फोटीत महिलेकडे बघण्याचा दृष्टीकोन मात्र बदललेला नाहिय. पूर्वीच्या पिढ्या कितीही त्रास झाला तरी नातेसंबंध टिकवून ठेवण्यावर भर देत असत. परंतू आताची पिढी आहे ते स्वीकारून पुढे जाण्याकरीता आग्रही असल्याचे दिसून येते. घटस्फोट या बाबतीत प्रत्येकाचा दृष्टीकोन वेगवेगळा असला तरी या शब्दाभोवती अजूनही काही गोष्टी निषिद्ध आहेत, प्रामुख्याने महिलांसाठी.
समाजामध्ये अनेकदा महिलांना त्यांच्या अयशस्वी लग्नाबद्दल विचारले जाते. घटस्फोटीत महिला असे म्हटले की लोकांचा तिच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलतो. अनेकदा त्यांना नको असलेली सहानुभूती लादण्याचा प्रयत्न केला जातो. या खोलवर रूजलेल्या विचारांना आव्हान देत, केरळमधील महिलेने एका अनोख्या कॅम्पचे आयोजन केले. मे, 2025 मध्ये कोझिकोडमधील कंटेंट क्रिएटर राफिया अली हिने ऐतिहासिक आणि धाडसी पाऊल उचलत घटस्फोटित, विभक्त आणि विधवा महिलांसाठी या कॅम्पचे आयोजन केले होते.
या कॅम्पचे नावं ब्रेक फ्री स्टोरीज असे देण्यात आले होते. हे दोन दिवसाचे शिबिर निसर्गाच्या सान्निध्यात भरवण्यात आल. या कॅम्पमध्ये एर्नाकुलमच्या 17 महिलांनी भाग घेतला. केरळमधील हे पहिले घटस्फोटीत शिबिर असल्याने या महिलांसाठी हे आधारभूत आणि बिनधास्त व्यासपीठं ठरले. येथे महिलांनी एकत्र येऊन गप्पागोष्टी, सामूहिक जेवण, गाणी, नृत्य, त्याचबरोबर काही खेळांचा आनंद घेतला. यावेळी त्यांनी कोणताच आडपडदा न ठेवत आपआपले अनुभव सांगितले.
या कॅम्पची आयोजक 30 वर्षीय राफिया अली ही स्वत: एका अयशस्वी विवाहातून बाहेर पडली होती. तिने अनुभवलेल्या गोष्टींबद्दल तिने सोशल मीडियावर स्वत:ची गोष्ट शेअर केली. तिच्या या पोस्टला 600 हून अधिक महिलांनी प्रतिसाद दिला. या पोस्टमुळे समाजात आपण एकटेनसून आपल्यासारख्या अनेक महिला असल्याची जाणिव तिला झाली. यानंतर सहानुभूती नको, सन्मान हवा असे तिने ठरवले. यातूनच ब्रेक फ्री स्टोरीज संकल्पनेत आली. घटस्फोट हे आयुष्यातील अपयश नसून एक नवी सुरूवात असल्याचे राफियाने म्हटले आहे.
कॅम्पमध्ये सहभागी झालेल्या महिलांनी आपली कहाणी शेअर करत या कॅम्पमुळे आपल्याला पुन्हा हसू आणि बळ मिळाल्याचे सांगितले. अनेक महिलांनी एवढ्या वर्षांनी कोणताही अपराधीपणा न वाटता मनमोकळं हसता आल्याचे सांगितले. गाणी, कथा, मनमोकळ्या गप्पा, अनुभव यामुळे हा कॅम्प एकप्रकारे या महिलांसाठी उपचारकेंद्र ठरला.
राफियाचा हा प्रयत्न यशस्वी झाल्याने तिने पुन्हा जून 2025 दुसऱ्या कॅम्पचे आयोजन केले होते. यामध्ये बोटिंग, स्थानिक पर्यटन आणि कायदेशीर मार्गदर्शन सत्रांचाही समावेश केला होता. आता हा कॅम्प महिला सक्षमीकरणाकरीता प्रयत्न करत आहेत. यामध्ये स्व-संरक्षण, आर्थिक साक्षरता, करिअर मार्गदर्शन, आणि सिंगल मदर्स, महिला उद्योजक याबद्दल देखील मार्गदर्शन करण्यात येणार आहे.