Disha Patni : उत्तर प्रदेशातील बरेली येथे बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी हिच्या घरावर गोळीबार झाला आहे. दुचाकीवरून आलेल्या दोन गुंडांनी एकापाठोपाठ दोन राउंड फायर केले. त्यानंतर ते पळून गेले. गोळीबार झाला तेव्हा दिशाची बहीण आणि माजी लष्करी अधिकारी खुशबू पटानी, वडील निवृत्त डीएसपी जगदीश पटानी, आई पद्मा पटानी घरात उपस्थित होते. गोळीबाराचा आवाज ऐकून सर्वजण घाबरले. दिशा पटानी मुंबईत होती. जगदीशने तात्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांना घराबाहेरून दोन रिकामी काडतुसे सापडली. घराबाहेर पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
रोहित गोदरा आणि गोल्डी ब्रार टोळीने गोळीबाराची जबाबदारी घेतली आहे. फेसबुक पोस्टमध्ये लिहिले होते- संत प्रेमानंद महाराज आणि कथावाचक अनिरुद्धाचार्य महाराज यांच्यावरील कमेंट्सवरून संताप व्यक्त करून गोळीबार करण्यात आला. हा फक्त एक ट्रेलर आहे. पुढच्या वेळी असे कृत्य पुन्हा झाले, तर कोणीही जिवंत राहणार नाही.
”खुशबू पटानीच्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला, असं जगदीश पटानी यांनी म्हटलंय. “माझ्या मुलीच्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला. आम्ही सनातन धर्म मानतो. आम्ही आचार्य, गुरूजी, साधु-संतांचा आदर करतो. कोणी जर खुशबूच्या वक्तव्याचा विपर्यास करून ते चुकीच्या पद्धतीने दाखवून असं करत असेल तर हा आमच्याविरोधातला कट आहे,” असं जगदीश पटानी म्हणाले.
एसएसपी बरेली म्हणाले की, शुक्रवारी पहाटे ३ वाजता गोळीबार झाला. तपास गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला आहे. जवळपासचे सीसीटीव्ही स्कॅन केले जात आहेत. पोलिसांनी गँगस्टर गोल्डी ब्रार आणि त्याच्या नेटवर्कबाबत अलर्ट जारी केला आहे.
