भारत हा विविधतेने नटलेला देश. प्रत्येक राज्याची स्वतःची संस्कृती, भाषा आणि परंपरा आहे. म्हणूनच जेव्हा प्रकाशाचा सण दिवाळी येतो, तेव्हा देशाच्या प्रत्येक कोपऱ्यात तो वेगळ्या रंगात आणि भावनेत साजरा केला जातो. दिव्यांच्या प्रकाशाने उजळलेली घरे, गोडधोड पदार्थांचा सुगंध, नातेवाईकांची भेट आणि भक्तिभावाने केलेली पूजा – हे दृश्य भारतभर सारखेच असले तरी प्रत्येक प्रांतातील साजरी करण्याची पद्धत निराळी असते.
Diwali 2025: पुण्यातील महत्त्वाच्या दिवाळी पहाट कुठे होणार आहेत ? वाचा इथे
Diwali 2025:ख्रिस्मस मॅगझिन ते दिवाळी अंक: लंडनपासून सुरु झाला मराठी दिवाळी अंकाचा रंजक प्रवास
महाराष्ट्रात दिवाळीची सुरुवात वसु बारसपासून होते. या दिवशी गायींची पूजा केली जाते, कारण गाईला मातेसमान मानले जाते. त्यानंतर धनत्रयोदशी येते, ज्यादिवशी लोक भगवान धन्वंतरींची पूजा करून आरोग्य आणि समृद्धीची प्रार्थना करतात. नरकचतुर्दशीच्या सकाळी अभ्यंग स्नान करण्याची परंपरा आजही जपली जाते. लक्ष्मीपूजनाच्या रात्री घरोघरी देवी लक्ष्मीची आराधना केली जाते, आणि पती-पत्नीच्या स्नेहासाठी पाडवा साजरा होतो. शेवटचा दिवस ‘भाऊबीज’ – भाऊ-बहीणीच्या प्रेमाचा प्रतीक सण. दिवाळीनंतर ‘तुळशी विवाह’ होतो आणि विवाहाच्या शुभ मुहूर्ताला सुरुवात होते.
उत्तर भारतातील हिंदी भाषिक राज्यांमध्ये दिवाळीची रंगत वेगळीच दिसते. येथे घरांची आणि व्यावसायिक प्रतिष्ठानांची मोठ्या थाटात साफसफाई व रंगरंगोटी केली जाते. लक्ष्मी-गणेशाची पूजा करून दिव्यांची रांग लावली जाते. मिठाई, भेटवस्तू, शुभेच्छांचा वर्षाव होत असतो. या भागात दिवाळीचा संदर्भ भगवान श्रीरामांनी रावणावर विजय मिळवून अयोध्येत परतण्याच्या प्रसंगाशी जोडलेला आहे. वाराणसीतील गंगा घाट आणि अयोध्येतील सरयू नदीच्या काठावर लाखो दिव्यांनी सजलेले दृश्य मन मोहवते. वाराणसीत ‘देव दीपावली’ या नावाने हा प्रकाशोत्सव साजरा होतो, तर अयोध्येत दीपोत्सवाच्या वेळी आकाशही उजळून निघते.
अमृतसर येथे भव्यदिव्य प्रकारे दिवाळी साजरी होते. अमृतसरमध्ये शीख धर्माचे सहावे गुरु, गुरु हरगोविंद [हरगोबिंद] हे जेव्हा १६१९ साली त्यांचा कारावास संपवून परतले तेव्हा तिथे सर्वात पहिली दिवाळी साजरी केली गेली.
PF धारकांसाठी आनंदाची बातमी! आता १०० टक्के पैसे काढता येणार
Eiffel tower:जगप्रसिद्ध आयफेल टॉवर पाडणार?
पश्चिम बंगालमध्ये मात्र दिवाळी म्हणजे देवी कालीची पूजा. येथे या दिवशी ‘काली पूजा’ किंवा ‘श्यामा पूजा’ केली जाते. देवी कालीला जासवंदाच्या फुलांनी सजवून तिच्या आराधनेत भक्त तल्लीन होतात. मिठाई, तांदूळ, डाळी आणि मासे यांचा नैवेद्य दाखवला जातो. याच रात्री बंगालमध्ये ‘भूत चतुर्दशी’ पाळली जाते, जिथे १४ दिवे लावून नकारात्मक शक्तींना दूर ठेवण्याची परंपरा आहे. कोलकात्यातील कालीघाट, बेलूर मठ आणि दक्षिणेश्वर ही ठिकाणे या काळात भाविकांनी गजबजलेली असतात.
ओडिशातील दिवाळीची झलकसुद्धा वैशिष्ट्यपूर्ण आहे. येथे लोक ‘कौरिया काठी’ नावाची विधी पाळतात. ही पूर्वजांना स्मरण करण्याची परंपरा आहे. लोक तागाच्या काड्या जाळून आपल्या पूर्वजांना बोलावतात आणि त्यांचा आशीर्वाद घेतात. त्याचबरोबर लक्ष्मी, गणेश आणि कालीदेवीची पूजा केली जाते. श्रद्धा, अध्यात्म आणि नातेसंबंध यांची सांगड घालणारी ही दिवाळी ओडिशातील लोकांसाठी अत्यंत पवित्र मानली जाते.
भारतातील प्राचीन हिंदू शहरांपैकी एक असलेल्या वाराणसी शहरामध्ये अत्यंत अनोख्या पद्धतीने दिवाळी साजरी होते. संपूर्ण गंगा नदीच्या घाटावर पणत्यांची आरास केली जाते. पणत्यांच्या प्रकाशामध्ये उजळून निघालेला गंगेच्या घाटाचं आणि गंगा नदीचं हे दृश्य अत्यंत विलोभनीय असे असते. दिवाळीदरम्यान किंवा खास दिवाळीसाठी तुम्ही वाराणसीमध्ये असाल तर तुम्हाला प्रचंड अध्यात्मिक वातावरण अनुभवता येईल. दिवाळी झाल्यानंतर दोन आठवड्यानंतर पौर्णिमेला येणारी देवदिवाळी वाराणसीमध्ये मोठ्या प्रमाणावर साजरी केली जाते.
गुजरातमध्ये दिवाळी म्हणजे नववर्षाचा आरंभ. येथे हा सण पाच दिवसांचा असतो – वाघ बारस, धनत्रयोदशी, काली चौदस, दिवाळी आणि शेवटी भाऊबीज. लक्ष्मीपूजनानंतर दुसऱ्या दिवशी ‘बेस्टू बारस’ म्हणून गुजराती नववर्ष साजरे केले जाते. या दिवशी व्यापारी आपले खाते बदलतात आणि नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात करतात. रांगोळ्या, फटाके आणि मिठाईच्या सुगंधाने संपूर्ण गुजरात झगमगून जाते.
गोव्यातील दिवाळीची रंगत पूर्णपणे वेगळी आहे. येथे भगवान श्रीकृष्णाने राक्षस नरकासुराचा वध केला, त्याच्या स्मरणार्थ हा सण साजरा केला जातो. दिवाळीच्या आदल्या दिवशी लोक नरकासुराचे मोठे पुतळे बनवून त्यांचे दहन करतात. गोव्याच्या रस्त्यांवर रंग, प्रकाश आणि संगीताने भरलेली रात्र अनुभवण्यासारखी असते. हा विधी दुष्टतेवर विजय आणि चांगुलपणाचा संदेश देतो.
दक्षिण भारतातील तामिळनाडूमध्ये दिवाळी म्हणजे परंपरा आणि आरोग्याचा संगम. येथे लोक पहाटे तिळाच्या तेलाने आंघोळ करतात, नवीन कपडे परिधान करतात आणि गोडधोड पदार्थांची देवाणघेवाण करतात. ‘लेजियम’ नावाचा पारंपारिक पदार्थ खाण्याचीही प्रथा आहे. मंदिरे दिव्यांनी उजळवली जातात आणि उत्सव रात्री उशिरापर्यंत चालतो.
देशभरात दिवाळीचे हे विविध रंग आणि परंपरा जरी भिन्न असल्या, तरी या सणाचा आत्मा एकच आहे – अंधारावर प्रकाशाचा, असत्यावर सत्याचा, आणि दु:खावर आनंदाचा विजय. प्रत्येक राज्यात या सणाचा आनंद आपल्या खास संस्कृतीतून व्यक्त होतो. अयोध्येतील दीपोत्सव असो, वाराणसीचा देवदिवाळी सोहळा असो, गोव्याचा नरकासुरवध असो की महाराष्ट्राचा लक्ष्मीपूजनाचा थाट – प्रत्येक ठिकाणी दिवाळी म्हणजे नव्या सुरुवातीचा आणि आशेचा सण आहे.
