दिवाळी अथवा दीपावली (Diwali 2025) हा प्रामुख्याने हिंदू, तसेच दक्षिण आशिया व आग्नेय आशियातील अन्य धर्मीय समाजांत काही प्रमाणात साजरा केला जाणारा उत्सव आहे. भारत, गयाना, त्रिनिदाद व टोबॅगो, फिजी, मलेशिया, म्यानमार, मॉरिशस, श्रीलंका, सिंगापूर व सुरिनाम या देशांमध्ये दिवाळीनिमित्त सार्वजनिक सुट्टी असते.
Diwali 2025: फटाक्यांचा शोध; तोही किचनमध्ये ! वाचा पहिल्या फटाक्याची भन्नाट स्टोरी
उपलब्ध पुराव्यांनुसार दिवाळी हा सण किमान तीन हजार वर्षे जुना आहे. पण त्यावेळी त्याचे स्वरूप आजच्यापेक्षा खूपच भिन्न होते. प्राचीन काळी हा यक्षांचा उत्सव मानला जायचा. दीपावलीचे मुळचे नाव यक्षरात्री असे होते हे हेमचंद्राने नोंदवले आहे, तसेच वात्स्यायनाच्या कामसूत्रातही नोंदलेले आहे. नील्मत पुराणात या सणास दीपमाला असे म्हटले आहे. कनोजाचा राजा हर्षवर्धन याने नागानंद नाटकात या सणाला दीपप्रतिपदुत्सव असे नाव दिले आहे. अंधाराला चिरून प्रकाशाचे अस्तित्व निर्माण करणारा दीप मांगल्याचे प्रतीक मानला जातो. याच्या प्रकाशाने आपल्या जीवनातील अंधकार दूर व्हावा म्हणून हा दीपोत्सव साजरा केला जातो.
निसर्गाने पावसाळ्यात भरभरून दिलेल्या समृद्धीच्या आनंद उत्सवाचा, कृतज्ञतेचा हा सोहळा असतो. या दिवशी सायंकाळी दारात रांगोळ्या काढून पणत्या लावतात, घरांच्या दारात आकाशदिवे लावतात. महाराष्ट्रातील काही ठिकाणी लहान मुले या काळात मातीचा किल्ला तयार करतात. त्यावर मातीची खेळणी मांडतात. धान्य पेरतात. या मागची परंपरा कशी व केव्हा सुरु झाली याची नोंद नाही, पण लहान मुलांच्या हौसेचा भाग म्हणून याकडे पाहता येते. या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रेरणा मुलांच्या मनात जागी रहायला मदत होते.
यासंदर्भात काही पौराणिक कथाही सांगितल्या जातात.
पौराणिक मान्यतेनुसार सतयुगात पहिली दिवाळी साजरी केली जात असे. कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला म्हणजेच धनत्रयोदशीला देवांचे वैद्य धन्वंतरी समुद्रमंथनातून अमृत पात्रासह प्रकट झाले. धन्वंतरी प्रकट झाल्यामुळे धनत्रयोदशी साजरी होऊ लागली. त्यांच्या नंतर, संपत्तीची देवी लक्ष्मी प्रकट झाली आणि दिव्यांच्या उत्सवाने त्यांचे स्वागत झाले.
दिवाळीत पांडवांच्या घरी परतल्याबद्दलही एक कथा आहे. पांडवांनाही वनवास भोगावा लागला होता, त्यानंतर पांडव घरी परतले आणि या आनंदात संपूर्ण शहर उजळून निघाले आणि तेव्हापासून दिवाळी सुरू झाली.
भगवान श्रीकृष्णाने आपली पत्नी सत्यभामा हिच्या मदतीने नरकासुराचा वध केला होता. नरका सूरला एका स्त्रीच्या हातून मारल्याचा शाप होता. त्या दिवशी कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथी होती. नरका सूरच्या दहशतीतून व अत्याचारापासून मुक्ती मिळाल्याच्या आनंदात लोकांनी दीपोत्सव साजरा केला. दुसऱ्या दिवशी दिवाळी साजरी झाली.
इसवी सन पूर्व ५०६४ मध्ये लंकेचा राजा रावणाचा वध करून जेव्हा भगवान श्रीराम आपली पत्नी सीता आणि भाऊ लक्ष्मण यांच्यासह अयोध्येत परतले तेव्हा संपूर्ण अयोध्या नगरी दिव्यांनी उजळून निघाली होती, असे रामायणात सांगितले आहे. 14 वर्षांच्या वनवासानंतर भगवान राम अयोध्येत आल्यावर दिवाळी साजरी करण्यात आली. प्रत्येक शहरात आणि गावात दिवे लावले गेले. तेव्हापासून दिवाळीचा हा सण अंधारावर विजयाचा सण बनला आणि दरवर्षी साजरा केला जाऊ लागला.
