“आई झाल्याचा आनंद तिच्या चेहऱ्यावर नुकताच झळकत होता… पण काही तासांतच तिच्या डोळ्यांतला प्रकाश कायमचा मावळला.”
पुण्यासारख्या प्रगत शहरात, आणि दीनानाथ मंगेशकरसारख्या नावाजलेल्या रुग्णालयात, केवळ पैशांअभावी एका गर्भवती महिलेला जीव गमावावा लागतो – ही बाब संपूर्ण आरोग्य व्यवस्थेची नाळ हालवून टाकणारी आहे. ‘पैसा की प्राण?’ हा प्रश्न पुन्हा एकदा समाजासमोर आ वासून उभा ठाकला आहे.
तनिषा भिसे… एक तरुण, सशक्त गर्भवती महिला, जिचं स्वप्न होतं आई होण्याचं. मात्र, रुग्णालयाच्या मुजोर व्यवस्थेमुळे आणि 10 लाखांच्या डिपॉझिटच्या हट्टामुळे तिच्या स्वप्नांचा आणि आयुष्याचा शेवट झाला. ज्या रुग्णालयात ती जीवाच्या आकांतात पोहोचली, तिथे माणुसकीपेक्षा पैसा महत्त्वाचा ठरला – आणि दोन चिमुकल्यांना जन्म देऊन ती कायमची निघून गेली.
पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात घडलेली ही घटना फक्त एका महिलेचा मृत्यू नाही, तर संपूर्ण आरोग्य व्यवस्थेवरचा कठोर प्रश्नचिन्ह आहे. ‘पैशांपेक्षा माणुसकी मोठी आहे की नाही?’ असा सवाल आज पुणे शहर आणि संपूर्ण महाराष्ट्र विचारतोय.
भाजप आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहायक सुशांत भिसे यांची पत्नी तनिषा उर्फ ईश्वरी भिसे यांना प्रसूती वेदना सुरू झाल्यावर दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. मात्र, हॉस्पिटल प्रशासनाने दाखल करण्याआधी 10 लाख रुपये जमा करण्याची अट ठेवली. सुशांत यांनी अडीच लाख रुपये तातडीने देण्याची तयारी दर्शवली, तरीही हॉस्पिटलने उपचार सुरू करण्यास नकार दिला.
या दरम्यान, वेळ वाया गेला. प्रसूती वेदना वाढत गेल्या. योग्य उपचार मिळाले असते तर कदाचित आज तनिषा जिवंत असती. परंतु हॉस्पिटलच्या पैशांच्या अट्टाहासामुळे ती खासगी वाहनाने सूर्या हॉस्पिटलकडे रवाना झाली. तिथे जुळ्या मुलींना जन्म दिल्यानंतर तिची तब्येत बिघडली. तिला पुढे मणिपाल हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं, पण तोपर्यंत उशीर झाला होता… आणि तनिषा भिसे यांचा मृत्यू झाला.
या घटनेचा सर्वाधिक हृदयद्रावक भाग म्हणजे, दोन चिमुकल्या मुली जन्मत:च आपल्या आईपासून वंचित झाल्या. एका पित्याच्या डोळ्यांदेखत त्याच्या पत्नीचा असा मृत्यू होणं हे असह्य आहे.
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाकडून सुशांत भिसे यांना दिलेली 10 लाखांची रिसीटही समोर आली असून, ती समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. त्यामुळे संतप्त नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि अनेक राजकीय नेते रुग्णालय प्रशासनावर टीकेची झोड उठवत आहेत. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षातून देखील हस्तक्षेप करूनही रुग्णालयाने निर्णय बदलला नाही, ही बाब विशेष चिंतेची आहे.
सुशांत भिसे यांचा थेट आरोप आहे की, “जर वेळेत उपचार मिळाले असते, तर माझी पत्नी आज जिवंत असती.” हे शब्द प्रत्येक वाचकाच्या काळजाला चटका लावणारे आहेत.
या घटनेनंतर समाजातील विविध स्तरांतून विचारले जाणारे प्रश्न:
• रुग्णालयांसाठी प्राधान्य माणुसकी आहे की पैसा?
• कायद्यानुसार आपत्कालीन स्थितीत कोणतेही रुग्णालय रुग्ण नाकारू शकते का?
• अशा घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारचे धोरण काय आहे?
पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात गर्भवती महिलेला नाकारण्यात आले, कारण तीचे कुटुंबीय 10 लाख रुपये भरू शकले नाहीत. यामुळे तिचा मृत्यू झाला, आणि दोन जुळ्या मुलींनी जन्मत:च आपली आई गमावली. या घटनेने पुणे शहर हादरले आहे आणि आरोग्य व्यवस्थेतील माणुसकीच्या अभावावर पुन्हा एकदा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.