दिल्लीतील लाल किल्ला परिसरात सोमवारी सायंकाळी भीषण स्फोट झाला. लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक 1 जवळ उभ्या असलेल्या एका कारमध्ये अचानक स्फोट झाल्याने परिसरात मोठी घबराट पसरली. या स्फोटानंतर आसपास उभ्या असलेल्या आणखी तीन गाड्यांनीही पेट घेतला. ही घटना सायंकाळी सुमारे 6 वाजून 45 मिनिटांनी घडली.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि दिल्ली पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. दिल्ली अग्निशमन विभागाच्या माहितीनुसार, सुमारे 6:55 वाजता स्फोटाची कॉल मिळाल्यानंतर सात अग्निशमन दलाच्या गाड्या आणि 15 कॅट ॲम्ब्युलन्स तात्काळ घटनास्थळी पाठवण्यात आल्या. काही वेळातच अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवले.
या घटनेत दोन ते तीन जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. स्फोटाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. प्राथमिक तपासानुसार, वाहनातील काही तांत्रिक बिघाड किंवा शॉर्टसर्किटमुळे ही दुर्घटना घडली असावी, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. उच्च सुरक्षा क्षेत्रात ही घटना घडल्याने सुरक्षा यंत्रणाही सतर्क झाल्या आहेत. पोलिस आणि फॉरेन्सिक पथकांनी घटनास्थळाचा ताबा घेत पुढील तपास सुरू केला आहे.
