दिल्लीमध्ये १० नोव्हेंबर २०२५ ला घडलेल्या कार स्फोटाने देश हादरला. या स्फोटात १३ जणांचा मृत्यू झाला, तर २५ हून अधिक नागरिक जखमी झाले. लाल किल्ल्याच्या जवळील बाजारपेठेत जोरदार स्फोट झाला, आणि अजूनही त्या ठिकाणी मृतदेहांचे अवयव आढळून येतायत. प्रकरणाच्या तपासासाठी NIA ने ‘स्पेशल 10’ अधिकाऱ्यांची टीम तयार केली आहे आणि या विशेष पथकाचं नेतृत्व मराठी आयपीएस अधिकारी विजय साखरे यांच्याकडे सोपवण्यात आलं आहे.
ह्या दहशतवादी कटाला ‘व्हाईट कॉलर’ मॉड्युल असे नाव देण्यात आले. या मॉड्युलमागील मुख्य दहशतवादी उमर नबी असल्याचे समोर आलं. १० नोव्हेंबरला झालेल्या स्फोटापूर्वी पोलिसांनी फरिदाबाद येथून तब्बल २९०० किलो स्फोटक जप्त केली होती. या स्फोटप्रकरणी ‘जैश-ए-मोहम्मद’ दहशतवादी संघटनेचा हात असल्याचे उघड झाले. हे मॉड्युल लाल किल्ल्याबरोबर दिल्ली आणि एनसीआरमधील इतर पाच ठिकाणी स्फोट घडवण्याच्या तयारीत होते. या कटाचा मूळ हेतू बाबरी मशीद पाडली गेल्याचा ६ डिसेंबर १९९२ बदला घेणे हा होता.
या प्रकरणात उल्लेखनीय बाब म्हणजे, ३२ गाड्यांमध्ये बॉम्ब आणि स्फोटके बसवून देशभरात ३२ ठिकाणी स्फोट घडवून आणण्याचा कट रचण्यात आला होता. स्फोट घडवून आणण्याच्या कामासाठी दहशतवाद्यांनी सुमारे ३० लाख रुपये जमा केले होते. हे पैसे हवालाच्या माध्यमातून उमरला मिळाले. २६००० किलो स्फोटक केवळ तीन लाख रुपयांना खरेदी केली गेली. हरियाणातील नूह आणि गुरुग्राम येथून ही स्फोटके आणण्यात आली होती. या दहशतवादी कटामध्ये डॉ. मुझम्मील, डॉ. आदिल, डॉ. शाहीन आणि उमर या सर्वांचा सक्रिय सहभाग होता.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ६ डिसेंबर व ७ डिसेंबर या दिवशी विविध ठिकाणी स्फोट घडवण्याची योजना दहशतवाद्यांनी आखली होती. हे सगळे स्फोट दिल्लीसह एनसीआरवरील अतिशय महत्त्वाच्या ठिकाणी घडवायचे होते.
या घटनेमुळे दिल्ली आणि एनसीआर मधील सुरक्षा व्यवस्था पुन्हा तपासली जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अनेक गंभीर गोष्टी समोर येत आहेत. स्फोटक सापडणे, आंतरराष्ट्रीय पैशांची देवाणघेवाण, ओळख सुरक्षित ठेवण्यासाठी ‘व्हाईट कॉलर’द्वारे कट – या सर्वाचा समन्वय धक्कादायक आहे. देशाच्या सुरक्षेला आव्हान देणाऱ्या कटकारस्थानांबद्दल जनजागृती आणि दक्षता ठेवण्याची आवश्यकता या घटनेच्या निमित्ताने पुन्हा अधोरेखित झाली आहे.
