Delhi Car Blast connection with Pulwama :लाल किल्ल्याजवळील मेट्रो स्टेशन गेट क्रमांक १ जवळ उभ्या असलेल्या एका कारमध्ये झालेल्या या स्फोटात ९ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, अनेकांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा अपघात नसून, एक नियोजित दहशतवादी हल्ला असल्याचा दाट संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे.सोमवारी संध्याकाळच्या वेळी लाल किल्ला मेट्रो स्टेशन जवळील सुभाष मार्ग ट्रॅफिक सिग्नलवर एका Hyundai i20 कारमध्ये हा शक्तिशाली स्फोट झाला.या घटनेमुळे संपूर्ण देशात, विशेषतः महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला असून, सुरक्षा व्यवस्था मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आली आहे.
स्फोटग्रस्त कारच्या आसपासच्या सहा कार, दोन ई-रिक्षा आणि एका ऑटोरिक्षाला आग लागली, ज्यात ९ जणांचा मृत्यू झाला.स्फोटाची भीषणता इतकी होती की, जखमींचे अवयव दूरवर फेकले गेले होते.प्राथमिक तपासामध्ये या स्फोटाचे थेट पुलवामा (जम्मू-काश्मीर) शी कनेक्शन असल्याचे धागेदोरे मिळाले आहेत. स्फोटासाठी वापरलेल्या i20 कारची मालकी आणि अनेक संशयितांचे कनेक्शन पुलवामापर्यंत पोहोचले आहे.
स्फोट झालेल्या कारचा चालक डॉ. मोहम्मद उमर हा ‘जैश-ए-मोहम्मद’ या दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याचा संशय आहे. तथापि, उमरच्या कुटुंबीयांनी हा दावा फेटाळला आहे, त्यांचा मुलगा प्लंबिंगचे काम करत असल्याचे त्यांनी सांगितले.
स्फोटात वापरलेली i20 कार अनेक वेळा विकली गेली होती. मूळ मालकाने गुरुग्राममध्ये ती विकली, आणि बनावट कागदपत्रांचा वापर करून ती कार अखेरीस पुलवामा येथील तारिक नावाच्या व्यक्तीपर्यंत पोहोचल्याचे तपासात समोर आले आहे. तारिक, तसेच त्याचे साथीदारआमिर रशीद आणि उमर रशीद यांना पुलवामातील अवंतीपोरा पोलीस स्टेशन येथे अटक केली आहे.
या कारमध्ये तीन लोक होते, आणि कार अनेक मालकांच्या हातून गेल्याची पद्धत पाहता, तपास यंत्रणा हा एक आत्मघाती हल्ल्याचा प्रयत्न होता का, या दिशेने तपास करत आहेत.काश्मीर पोलिसांनी हरियाणा पोलिसांच्या मदतीने फरीदाबाद येथील एका अपार्टमेंटमधून मोठी कारवाई केली. या प्रकरणात डॉ. मुजम्मिल अहमद गनई आणि डॉ. आदिल अहमद राथर या डॉक्टरांना अटक करण्यात आली होती.त्याच्याकडून जवळपास २९०० किलो आयईडी बनवण्याचे साहित्य, ज्यात सुमारे ३६० किलो संशयित अमोनियम नायट्रेट, डेटोनेटर्स, वायर्स आणि इतर स्फोटक घटक जप्त करण्यात आले होते.
याशिवाय, त्यांच्याकडून एक अल्ट सॉल्ट रायफल आणि पिस्तूल देखील जप्त करण्यात आले होते.स्फोटात अमोनियम नायट्रेट आणि इंधन तेलाचा वापर झाल्याचा प्राथमिक अंदाज तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे.तपास यंत्रणांना संशय आहे की, कारमधील स्फोटके मध्य दिल्लीतील इतर गर्दीच्या ठिकाणी स्फोट घडवण्यासाठी नेली जात होती. मोहम्मद उमर याने लाल किल्ल्याजवळील मेट्रो स्टेशनच्या पार्किंगमधून कार काढून तो मध्य दिल्लीच्या दिशेने जात असतानाच हा स्फोट घडला.
स्फोटाचा तपास आता NIA (राष्ट्रीय तपास यंत्रणा) कडे सोपवला जाण्याची शक्यता आहे.
दिल्ली पोलीस, NIA, NSG आणि FSL चे पथक कसून तपास करत आहेत.
देशात कुठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सुरक्षा संस्थांनी संपूर्ण देशभरात, विशेषतः मोठी शहरे आणि संवेदनशील ठिकाणी हाय अलर्ट जारी केला आहे.
हा स्फोट एका मोठ्या, आंतरराज्यीय दहशतवादी कटाचा भाग होता का, या दिशेने तपास सुरू आहे. पुलवामा कनेक्शन आणि जप्त करण्यात आलेला स्फोटकांचा मोठा साठा पाहता, हा हल्ला पुलवामा हल्ल्यासारखा मोठा विध्वंस घडवण्याच्या तयारीत होता का, याची शक्यता तपास यंत्रणा पडताळून पाहत आहेत.
