जपानमध्ये पंतप्रधान मोदी यांना मिळाली इच्छापूर्ती करणारी बाहुली! कोण आहे ही दरूमा

News Political News

What is the Daruma doll? परदेशात प्रवासाच्या आठवणी जपण्यासाठी अनेकजण एखादं स्मृतिचिन्ह, तेथील आठवण घरी आणतातच आणतात. कधी ते फ्रिज मॅग्नेट असतं, कधी की-चेन, तर कधी एखादी आकर्षक पण छोटीशी वस्तू. मोठ्या नेत्यांनाही स्मृतिचिन्हांच्या रूपात अशाच भेटवस्तू दिल्या जातात. याचचं उदाहरण म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींची जपान भेट. जपानमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींना शोरीनझान दरुमा-जी मंदिराच्या मुख्य पुजाऱ्यांनी म्हणजे सेइशी हिरोसे यांनी एक दरुमा बाहुली भेट दिली. ही बाहुली जपानमध्ये सर्वत्र दिसते आणि ती त्या देशातील सर्वात प्रसिद्ध स्मृतिचिन्हांपैकी एक मानली जाते.
दरुमा बाहुली काय आहे?

जपानमध्ये दरुमा बाहुली ही सुदैव आणि भविष्यातील समृद्धीचं प्रतीक मानली जाते. म्हणूनच या बाहुल्या जपानी दुकाने, रेस्टॉरंट्समधील शेल्फ आणि घरांमध्ये सर्वत्र दिसून येतात.

बोधीधर्म आणि बाहुली
गोलसर आकार आणि चेहऱ्यावर रागीट भाव असलेली ही बाहुली प्रत्यक्षात बोधिधर्म (जपानी भाषेत दरुमा) यांचं प्रतीक आहे. बोधिधर्म हे इ.स.५ व्या शतकातील भिक्षू होते. त्यांनी झेन बौद्ध धर्माची स्थापना केली. असं मानलं जातं की, बोधिधर्म यांनी तब्बल नऊ वर्षे स्थिर बसून ध्यान केलं आणि त्यामुळे त्यांच्या हातापायांची हालचाल थांबून ते अनंतात विलीन झाले. त्यामुळेच दरुमा बाहुली केवळ डोके आणि धड अशा स्वरूपात, हातपायांशिवाय तयार केली जाते.

दरुमा बाहुलींचा उगम
दरुमा बाहुल्यांचा उगम १७व्या शतकात जपानमधील गुन्मा प्रीफेक्चरमधील ताकासाकी शहरात झाला. परंपरेनुसार, ताकासाकीतील शेतकरी या बाहुल्या तयार करून त्या भिक्षूंनी आशीर्वादस्वरूप द्याव्यात म्हणून देत असत. या बाहुल्या पेपर-मॅश (papier-mâché) पासून तयार केल्या जात आणि अशा प्रकारे तयार केल्या जात की, त्या खाली पडल्या तरी पुन्हा सरळ उभ्या राहत. हे वैशिष्ट्य बौद्ध धर्मातील तत्त्व “नानाकोरोबी या ओकी”चे प्रतीक मानले जाते, ज्याचा अर्थ सात वेळा पडलात तरी, आठव्यांदा पुन्हा उभं राहावं असा आहे.

इच्छापूर्तीसाठी दरुमा बाहुली कशी वापरावी?
दरुमा बाहुली ही साधी शुभचिन्हासारखी नसते. ती वापरण्याची एक ठरलेली पद्धत आहे. तुम्ही एखादी इच्छा ठरवली की, तुम्हाला बाहुलीच्या एका डोळ्यावर रंग भरायचा असतो. याने बाहुलीला आत्मा प्राप्त होतो, असा अर्थ घेतला जातो. त्यानंतर त्या बाहुलीच्या प्रतिकात्मक सुदैवाच्या बळावर तुम्ही आपली इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करता.

मुळात असं मानलं जात होतं की, बाहुलीचा प्रभाव एक वर्षापुरताच टिकतो. त्यानंतर बाहुली जाळून तिच्यातील देवतेला मुक्त करावं लागतं. यासाठी जपानमधील अनेक मंदिरांमध्ये दरुमा कुयो किंवा डोंडोयाकी नावाचा विधी होतो. यात हजारो लोक आपापल्या बाहुल्या घेऊन येतात, त्या पुजल्या जातात आणि नंतर सामूहिकरित्या जाळल्या जातात.
आता तुम्ही कधी जपानला गेलात तर ही बाहुली नक्की आणा !

Leave a Reply