भारतामध्ये चहाप्रेमींप्रमाणेच कॉफीचे ही असंख्य चाहते आहेत. अनेकांच्या दिवसाची सुरूवात कॉफी शिवाय होतच नाही. चहा विरूद्ध कॉफी यावर कायम चर्चा रंगत असल्या तरी, देशभरात कॉफीच्या सेवनामध्ये लक्षणीय वाढ झाल्याचं दिसून आलं आहे. इंस्टंट एनर्जीसाठी कॉफी ही जगभरातील लोकांचे गो-टू ड्रिंक बनले आहे. कॉफीमध्ये अनेक प्रकार आहेत, अमेरिकानो, लाते, कॅपचिनो, मोका आणि असे अनेक प्रकार बाजारात उपलब्ध आहेत. कुणाला ती साखर आणि दूध घातलेली आवडते, तर कुणाला ती बिनसाखरेची आणि दूधाशिवाय आवडते. कॉफी केवळ पेय म्हणूनच नाही तर ती आरोग्यासाठी देखील फायदेशीर मानली जाते. स्मरणशक्ती वाढवणे, एकाग्रता वाढवणे अशा प्रकारच्या फायद्यांमुळे तज्ञ नेहमीच कॉफी पिण्याचा सल्ला देतात. मात्र या कॉफीमध्ये काही प्रमाणात झुरळ किंवा किटक असल्याचे सांगितल्यास तुम्ही त्याच उत्साहाने कॉफी पिण्यासाठी तयार व्हाल का? धक्का बसला ना? इंटरनेटवर व्हायरल होणाऱ्या व्हिडोओंमागे नेमकं काय सत्य आहे, हे जाणून घेऊया.
अमेरिकेच्या Food And Drug Administration यांनी मान्य केले आहे की, अन्नपदार्थ आणि पेयांमध्ये काही प्रमाणात किडे असू शकतात. कारण पदार्थांमधून ते पूर्णपणे काढून टाकणे अवघड असते, विशेषत प्री-ग्राऊंड कॉफीमध्ये. काही वेळा कॉफीच्या झुडूपांवर कीटक असतात. फळांसोबत हे कीटक देखील येतात. हे कीटक आकाराने लहान असल्याने त्यांना वेगळे करणे कठीण जाते. त्यामुळे कीटक देखील कॉफीच्या फळांसोबत भाजले जातात. शिवाय कॉफी जिथे साठवली जाते, तिथल्या गोदामांमध्ये अंधार आणि ओलसरपणा असल्याने व कॉफीच्या उग्र वासामुळे झुरळे, भुंगे होतात.
त्यामुळे जेव्हा बियांची पावडर करण्यात येते, तेव्हा या किड्यांचे तुकडे, त्यांची अंडी किंवा इतर सुक्ष्म घटक त्यात सहज मिसळले जातात. FDA च्या मते, अशा प्रकारचा दूषितपणा 10 टक्क्यांपर्यंत काही परिस्थितींमध्ये स्वीकार्य आहे, कारण ते टाळणे कठीण असते. जेथे कॉफी मोठ्या प्रमाणात तयार केली जाते आणि साठवली जाते, तिथे हा धोका असतो. त्यामुळे प्रीमिक्स कॉफीमध्ये कॉफीच्या बिंयापेक्षा कीटकांचे प्रमाण असण्याची शक्यता जास्त असते.
कॉफी काळजीपूर्वक निवडा
सदर बातमी अमेरिकेतून पसरली असली तरी भारतातही याची शक्यता नाकारता येत नाही. मग आता कॉफी पिण्यावर बंधन येणार का? तर नाही. सर्वात चांगला पर्याय म्हणजे विश्वसनीय कॉफी ब्रँडची कॉफी निवडणे, जे स्वच्छता आणि गुणवत्तेचे पालन करतात. अथवा सेंद्रिय किंवा स्थानिक पातळीवर मिळणारी कॉफीही वापरू शकता, कारण त्यामध्ये गुणवत्ता नियंत्रण अधिक चांगले असते. जर तुम्हाला आणखी खात्री हवी असेल, तर कॉफी बिन्स विकत आणून कॉफी क्रशर मध्ये क्रश करून मग वापरू शकता, म्हणजे आपण काय पितो याची खात्री होईल.
कॉफीत झुरळे असल्याचा शोध कसा लागला?
अमेरिकेत 1980 च्या दशकात हा मुद्दा योगायोगाने समोर आला. news.com.au च्या अहवालानुसार, एका जीवशास्त्र प्राध्यपकाला रोज ताजी कॉफी पिण्याची सवय होती. या कॉफी करीता हे प्राध्यापक रोज लांब प्रवास करायचे, यामुळे त्यांचे सहकारी आश्चर्याने विचारत असत की, एका कॉफीसाठी तुम्ही एवढा लांब प्रवास का करता? तेव्हा त्या प्राध्यापकांनी त्यांना प्री-ग्राउंड कॉफीची तीव्र अॅलर्जी असल्याचे सांगितले. गमंत म्हणजे, त्यांना झुरळांमुळे अशाच प्रकारची अॅलर्जी होत होती. यामुळे असा अंदाज बांधला गेला की, प्री-ग्राउंड कॉफीमध्ये झुरळांचे सूक्ष्म तुकडे मिसळले जात असावेत, जे उत्पादन प्रक्रियेत नकळत येत असावेत.
