चीनचा “वॉटर बॉम्ब”; ब्रम्हपुत्रेवरून भारत-चीन संघर्षाचा नवा अध्याय

News Political News

चीन आणि भारतातील संबंध कायमच तणावपूर्ण राहिलेले आहेत. विशेषत: लडाख भागातील सीमावाद. आता एका नव्या कारणामुळे दोन्ही देशांमधील तणाव वाढण्याची शक्यता आहे. चीनने ब्रम्हपुत्रा नदीवर जगातील सर्वात मोठे धरण बांधत असल्याची घोषणा केली आहे. या कामाची सुरूवात शनिवारी चीनचे पंतप्रधान ली केकियांग यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आली. जवळपास 12 लाख कोटी रूपये खर्चून हे धरण बांधण्यात येत आहे. या धरणामुळे मोठ्या प्रमाणावर जीवितहानी होण्याची शक्यता असल्याने भारताचा या प्रकल्पाला विरोध आहे. परंतू हा विरोध झिडकारून चीनने बांधकाम सुरू केले आहे, त्यामुळे दोन्ही देशातील वाद चिघळणार असल्याची शक्यता तज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.

ब्रम्हपुत्रा नदी ही भारताच्या ईशान्येकडील भागात आहे. ती तिबेटमध्ये यारलुंग त्सांगपो या नावाने उगम पावते. अरूणाचल प्रदेश, आसाममार्गे वाहत बांग्लादेशात वाहते. ही नदी केवळ पर्यावर्णीय दृष्टीनेच नव्हे तर सामाजिक आणि आर्थिक दृष्टिकोनातूनही महत्वाची आहे. परंतू अलिकडेच चीनने ब्रम्हपुत्रेवर जलविद्युत प्रकल्प उभारण्यास सुरूवात केल्याने भारत आणि बांग्लादेशात चितेंची लाट उसळली आहे. हा प्रकल्प भारतासाठी वॉटर बॉम्ब ठरू शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

चीनचा जलविद्युत प्रकल्प
चीनच्या या प्रकल्पातून सुमारे 60 हजार मेगावॅट इतकी वीज निर्मिती होणार असल्याचा दावा केला जात आहे. या प्रकल्पात पाच जलविद्युत केंद्रे असतील. चीनच्या सरकारी वृत्तसंस्था शिन्हुआने दिलेल्या वृत्तानुसार धरणातून निर्माण होणारी वीज प्रामुख्याने इतर देशांमध्ये पाठवली जाणार आहे. चीनच्या 14 व्या पंचवार्षिक योजनेत या प्रकल्पाचा समावेश असून तो त्यांच्या उर्जा सुरक्षिततेचा भाग मानला जात आहे.

चीनचा हा प्रकल्प भारतासाठी “वॉटर बॉम्ब”
भारताची प्रमुख चिंता म्हणजे पाण्याच्या प्रवाहात बदल. चीनने जर या नदीवर बंधारे आणि जलाशये उभारली, तर त्याचा थेट परिणाम भारतात येणाऱ्या पाण्याच्या प्रवाहावर होऊ शकतो. विशेषत: ब्रम्हपुत्रेसारख्या पावसाच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या नदीचा प्रवाह अडवला गेला, तर अरूणाचल प्रदेश आणि आसामसारख्या राज्यांत पूर, दुष्काळ, शेती व जलसंपत्ती व्यवस्थापन यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. यामुळे चीनच्या या धोरणाला काही तज्ञांनी वॉटर बॉम्ब डिप्लोमसी असे नाव दिले आहे. जर युद्धजन्य किंवा तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाल्यास, चीन या पाण्याचा वापर शस्त्र म्हणून करू शकतो. उदा. अचानक पाण्याचा निचरा करून पूर परिस्थिती निर्माण करणे किंवा पाण्याचा प्रवाह थांबवून दुष्काळ घडवून आणणे. या शक्यता भारतासाठी अत्यंत धोकादायक मानल्या जात आहेत.

ब्रम्हपुत्रा नदीचा परिसर जैवविधतेने समृद्ध आह. चीनच्या प्रकल्पामुळे नदीच्या नैसर्गिक प्रवाहात बदल होऊन मच्छीपालन, शेती, आणि पाण्याच्या नैसर्गिक चक्रात अडथळे येऊ शकतात. त्यामुळे हजारो लोकांचे रोजगार आणि जीवनशैली धोक्यात येऊ शकते. त्याचबरोबर भूगर्भातील कंपने आणि हिमालयीन भागात भूस्खलन होऊ शकते.

Leave a Reply