चमार स्टुडिओ : एका जातीच्या नावाला जगभरात सन्मान मिळवून देणारा सुधीर राजभर यांचा प्रवास

News

डिसेंबर 2024 मध्ये अमेरिकेतील ‘डिझाईन मायामी’ या आंतरराष्ट्रीय डिझाईन शोमध्ये एक फोटो जगभरात व्हायरल झाला. पॉप सुपरस्टार रिहाना एका ठळक लाल खुर्चीवर बसून फोटोशूट करत होती. पण चर्चेचा विषय फक्त रिहाना नव्हती. चर्चेचा केंद्रबिंदू बनला तो खुर्चीचा डिझाइन आणि त्यामागे असलेलं नाव – “चमार स्टुडिओ”. ‘चमार’ — भारतात अनेकांसाठी हा शब्द अजूनही जातीवाचक शब्द असून अपमानास्पद समजला जातो. पण हाच शब्द ब्रँडच्या रुपात जागतिक व्यासपीठावर पोहोचेल, असं कुणी स्वप्नातही कल्पना केली नसेल. पण हे स्वप्न वास्तवात उतरवण्याचं काम केलं आहे एका संवेदनशील कलाकार सुधीर राजभर यांनी.

जातिव्यवस्थेला उत्तर देणारी कलाकृती
उत्तर प्रदेशातील जौनपूर जिल्ह्यातील सामान्य कुटुंबात जन्मलेले सुधीर राजभर यांचं बालपण मुंबईत गेलं. वसईमधील विकासनी संस्थेत त्यांनी चित्रकलेचं शिक्षण घेतलं. लहानपणापासून चित्रकलेची आवड असलेले सुधीर, पुढे काही प्रस्थापित कलाकारांसोबत काम करू लागले. पण इथेही ते समाजातील वर्गभेदाला सामोरे गेले. “कामाचं कौतुक व्हायचं, पण माझं नाव कुठेही नसायचं. फक्त कारण एवढंच – मी कोण आहे, कुठून आलो आहे.” सुधीर यांनी पाहिलं की, इंग्रजी न येणं, महागडे कपडे न घालणं किंवा विशिष्ट वर्गात न येणं यामुळे आपल्या कलेचं मोल कमी होतं. गावाकडे गेल्यावर अजूनही लोक ‘चांभार’ म्हणून पाहतात, ज्याचा उच्चारही अपमानास्पद असतो.

“चमार” – एक अपमानजनक शब्द की एक अभिमानास्पद ओळख?
सुधीर यांनी ठरवलं – हा शब्दच बदलायचा. त्याच्या अर्थाला नवा चेहरा द्यायचा. लोकांच्या डोक्यात रुजलेली ही मर्यादा कलात्मकतेच्या माध्यमातून मोडायची. 2018 साली त्यांनी सुरू केला – “चमार स्टुडिओ” – एक असा फॅशन ब्रँड, जो भारतातील पारंपरिक कारागिरांना, विशेषतः दलित कारागिरांना, सन्मान, व्यासपीठ आणि ओळख देतो.

जागतिक बाजारपेठेचा नवा पर्याय
भारतामध्ये बीफ बॅन झाल्यानंतर लेदर व्यवसायाला मोठा फटका बसला. त्या काळात सुधीर यांना एक कल्पना सुचली – रिसायकल रबरपासून लेदरचा पर्याय तयार करण्याची. ते सांगतात, “टायर-ट्यूबचा कचरा आम्ही प्रोसेस करून त्यातून अशा शीट्स तयार करतो, ज्या चामड्याच्या जागी वापरल्या जाऊ शकतात. त्यातून बनवलेल्या वस्तू 100% हँडमेड असतात. यामुळे कारागिरांचाही ताण कमी होतो.” या पर्यायी साहित्यामुळे उत्पादनांची किंमतही नियंत्रित राहते आणि पर्यावरणपूरक दृष्टिकोन जपला जातो. चामड्याच्या वस्तूंमध्ये असणारा उग्र वास, प्रदूषण आणि प्रक्रिया टाळता येते.

उत्पादनं आणि मूल्य
चमार स्टुडिओ अंतर्गत महिला पर्स, बॅग्ज, शूज, चप्पल, खुर्च्या अशा अनेक वस्तू तयार केल्या जातात. या उत्पादनांची किंमत 6000 ते 30,000 रुपयांपर्यंत आहे. पण खरी किंमत ही वस्तूंची नाही, तर त्या मागच्या संवेदनेची, विचारांची आणि क्रांतीची आहे.

सामाजिक बांधिलकी आणि कारागिरांचा सन्मान
सुधीर सांगतात, “कामाच्या सुरुवातीलाच आम्ही कारागिरांना 10% रक्कम देतो. विक्रीतून मिळालेल्या उत्पन्नातील 50% निधी ‘चमार फाऊंडेशन’मध्ये जातो. त्यातून गरजू कारागिरांना मदत केली जाते.” हा एक असा ब्रँड आहे, जो बाजारासाठी नव्हे तर समाजाच्या मनोवृत्तीमध्ये बदल घडवण्यासाठी निर्माण झाला आहे.

राजकीय आणि आंतरराष्ट्रीय मान्यता
सुधीर यांच्या स्टुडिओला नुकतीच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भेट दिली. त्यांनी सुधीरच्या संकल्पनेचं कौतुक करत सोशल मीडियावरही प्रतिक्रिया दिली. जगभरातील विविध देशांतून कलाकार चमार स्टुडिओमध्ये शिकण्यासाठी येत आहेत. पण भारतात अजूनही लोक पहिल्यांदा नाव न पाहता – जात पाहतात.

सुधीर यांचं निरीक्षण खरं ठरत आहे, त्यांचं असं म्हणणं आहे की, “जर इथल्या लोकांनी माझी जात न पाहता माझं काम पाहिलं, तर मी त्यांचा खूप ऋणी राहीन.”

‘चमार हवेली’ – मोकळेपणाचा एक प्रकल्प
सुधीर सध्या राजस्थानमध्ये ‘चमार हवेली’ नावाच्या प्रकल्पावर काम करत आहेत. ही एक अशी कार्यशाळा असेल जिथे कलाकार कोणत्याही प्रकारच्या कलेमध्ये सहभागी होऊ शकतील. जात, वर्ग किंवा कलेची परंपरागत चौकट इथे बाधक नसेल. “भारतात कलाकारांवर मर्यादा लादल्या जातात. शिल्पकाराने शिल्पच घडवावं, चित्रकाराने चित्रच काढावं. पण कलाकार म्हणजे फक्त एक शैली नव्हे. तो एक विचार आहे, एक मुक्त उडणारा पक्षी आहे.”

‘चमार स्टुडिओ’ ही एक चळवळ आहे – ज्यात नाव बदलण्यापेक्षा दृष्टीकोन बदलण्यावर भर आहे. जिथे ‘जात’ केवळ एक ओळख न राहता – सन्मान, आत्मविश्वास आणि क्रिएटिव्हिटीचं प्रतीक बनतं. आज सुधीर राजभर यांच्या या ब्रँडने कलाकार, कारागीर, डिझायनर, आणि विचारवंत यांच्यासाठी एक नवा मार्ग मोकळा केला आहे. त्यांच्या कामाची दखल युरोपमध्ये, अमेरिका आणि जगभर घेतली जाते. पण खऱ्या अर्थाने ते यशस्वी तेव्हाच ठरतील – जेव्हा भारतातील प्रत्येक माणूस ‘चमार’ या शब्दाकडे बघताना त्यामागे कला, प्रतिष्ठा आणि संघर्ष पाहील – कलंक नाही.

Leave a Reply