‘ब्रेन रॉट’ – सोशल मीडियामुळे तुमचा मेंदू कमजोर तर होत नाहीये ना?
आजच्या डिजिटल युगात सोशल मीडिया हे आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहे. परंतु, अनेकदा आपण नको इतका वेळ रील्स, मीम्स आणि बिनकामाच्या कंटेंटमध्ये घालवतो. हिच सवय आपल्या जीवावर बेतू शकते, हे तुम्हाला माहिती आहे का? हिच सवय मानसिक आणि बौद्धिक क्षमतेस हळूहळू कमकुवत करतं, ज्याला इंग्रजीत ‘ब्रेन रॉट’ (Brain Rot) असं म्हटलं जातं. चला तर मग याविषयी अधिक माहिती मिळवूया.
ब्रेन रॉट म्हणजे काय?
‘ब्रेन रॉट’ (Brain Rot) हा शब्द हल्ली सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर प्रचलित झाला आहे. तो अशा मानसिक स्थितीला दर्शवतो जिथे माणूस निरुपयोगी ऑनलाईन कंटेंटमध्ये इतका गुंततो की त्याचा मानसिक आणि बौद्धिक क्षमतेवर परिणाम होतो. ऑक्सफर्ड प्रेस डिक्शनरीने 2023-24 मध्ये हा शब्द प्रचलित झाल्याचे मान्य केले असून, त्याच्या वापरात तब्बल 230% वाढ झाली आहे.
ब्रेन रॉट कसा होतो?
सोशल मीडियावर असंख्य रील्स, मीम्स आणि शॉर्ट व्हिडिओज पाहण्याची आपली सवय हळूहळू आपला वेळ आणि मेंदूचे आरोग्य नष्ट करू शकते. यामागील मुख्य कारण म्हणजे सोशल मीडियाचे अल्गोरिदम, जे आपल्याला सतत नवीन आणि मनोरंजक कंटेंट पाहण्यास प्रवृत्त करतात.
- रील्स पाहताना वेळेचे भान राहत नाही.
- “अजून एकच व्हिडिओ” म्हणता म्हणता तास जातात.
- सतत नवनवीन कंटेंटमुळे एकाग्रता कमी होते.
- वास्तविक आयुष्यातील जबाबदाऱ्या मागे पडतात.
मानसशास्त्रज्ञ अँड्र्यू प्रझिबिल्स्की यांच्या मते, “ब्रेन रॉट हा शब्द माणसाच्या ऑनलाइन जगातील अतिव्यसन आणि त्याच्या दुष्परिणामांबद्दलची अस्वस्थता दर्शवतो.”
ब्रेन रॉट शब्दाचा इतिहास
ब्रेन रॉट हा शब्द सोशल मीडियावर लोकप्रिय झाला असला तरी त्याचा उल्लेख 1854 मध्ये जगप्रसिद्ध लेखक हेन्री डेव्हिड थोरो यांनी त्यांच्या ‘वॉल्डन’ (Walden) पुस्तकात केला होता. त्यांनी इंग्लंडमध्ये बटाटे सडू नयेत म्हणून केलेल्या प्रयत्नांचा उल्लेख करत म्हटले होते – “मानवी मेंदू सडण्याची जी प्रक्रिया सुरू झाली आहे, तिला थांबवण्यासाठी काही उपाय केले जाणार आहेत का?” हाच विचार पुढे आधुनिक तंत्रज्ञान आणि सोशल मीडियाच्या संदर्भात लागू होतो.
ब्रेन रॉटचे मानसिक आणि शारीरिक दुष्परिणाम
१) एकाग्रता आणि स्मरणशक्तीवर परिणाम – सोशल मीडियावरील शॉर्ट-फॉर्म कंटेंटमुळे आपली ध्यान केंद्रित करण्याची क्षमता (Focus) कमी होते. आपण एखाद्या गोष्टीत लवकर रस गमावतो आणि दीर्घकालीन लक्ष केंद्रित करणे कठीण होते.
२) निर्णयक्षमतेवर परिणाम – सतत माहितीच्या ओघात राहिल्यामुळे आपल्या मेंदूवर अतिरिक्त ताण येतो. यामुळे तर्कशुद्ध निर्णय घेण्याची क्षमता घटते.
३) मानसिक आरोग्यावर परिणाम – चिंता आणि नैराश्य – सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे FOMO (Fear of Missing Out) आणि Dopamine Overload होते. यामुळे सतत आनंद शोधण्याची इच्छा निर्माण होते आणि वास्तवात आयुष्य कंटाळवाणे वाटू लागते.
४) शारीरिक आरोग्यावर दुष्परिणाम – स्क्रीनसमोर जास्त वेळ घालवल्यामुळे डोळ्यांना त्रास होतो. झोपेचे चक्र (Sleep Cycle) बिघडते. इतकेच नाही तर, मेंदूला थकवा जाणवतो, त्यामुळे मेंदूची कार्यक्षमता कमी होते.
ब्रेन रॉट टाळण्यासाठी उपाय
१) ‘स्क्रीन टाइम’ नियंत्रित करा –दररोज किती वेळ सोशल मीडियावर घालवायचा हे ठरवा. iOS आणि Android मध्ये Screen Time सेटिंग्सचा वापर करा.
२) डिजिटल डिटॉक्स करा – आठवड्यातून एक दिवस तरी सोशल मीडिया पूर्णपणे टाळा.
३) बौद्धिक आणि मानसिकदृष्ट्या समृद्ध करणाऱ्या गोष्टी करा – वाचन करा, नवीन कौशल्ये शिका, मैदानी खेळ खेळा, सतत शॉर्ट व्हिडिओ पाहण्याऐवजी माहितीपूर्ण डॉक्युमेंटरी किंवा पॉडकास्ट ऐका.
४) झोप आणि आहार याकडे लक्ष द्या – झोप पूर्ण घ्या (7-8 तास), मेंदूला पोषण मिळेल असा आहार घ्या (Omega-3, Vitamins B & D).
५) सोशल मीडियाच्या अल्गोरिदमला समजून घ्या –– सोशल मीडियाच्या सवयींचा अभ्यास करा. कोणते व्हिडिओ आणि पोस्ट तुम्हाला जास्त गुंतवतात, याकडे लक्ष द्या.
जगभरातील सोशल मीडिया कायदे आणि ब्रेन रॉट
- भारत – 18 वर्षाखालील मुलांना सोशल मिडिया वापरावर निर्बंध, माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 69A अंतर्गत, भारत सरकारने राष्ट्रीय सुरक्षा आणि सार्वभौमत्वाच्या दृष्टीने धोकादायक ठरलेल्या 59 मोबाईल अॅप्सवर जून 2020 मध्ये बंदी घातली.
- ऑस्ट्रेलिया – 16 वर्षाखालील मुलांसाठी सोशल मीडिया वापरावर कडक निर्बंध.
- युरोपियन युनियन – सोशल मीडियाच्या अल्गोरिदमवर नियंत्रण ठेवण्यासाठी नवे कायदे.
- चीन – मुलांसाठी दररोज 40 मिनिटांपेक्षा जास्त वेळ स्क्रीन टाईमवर बंदी.
तुमच्या डिजिटल सवयी तपासा!
- तुम्ही सोशल मीडियावर किती वेळ घालवता?
- तुम्ही ब्रेन रॉट टाळण्यासाठी कोणते उपाय करता?
- तुमचा अनुभव कमेंटमध्ये शेअर करा!