आज आपल्या देशात शिक्षण हे ज्ञान देण्याचे साधन न राहता एक व्यवसाय बनत चालले आहे. विद्यार्जन म्हणजे केवळ गुण मिळविणे किंवा करिअर घडविणे एवढ्यावरच सिमित झाले आहे. अशा परिस्थितीत संस्कार, मूल्ये आणि आपल्या परंपरेची ओळख विद्यार्थ्यांपर्यंत कशी पोहोचणार? जर मुलांना योग्य ज्ञानच मिळाले नाही, तर त्यांच्या मनात संस्कारांची जागा कशी निर्माण होणार? याच कारणामुळे आपला देश आणि आपला हिंदू धर्म मागे पडत असल्याची खंत वाटते.
आपल्या प्रथा-परंपरा, रितीरिवाज, आणि सनातन धर्माचे असंख्य पैलू, जर पुढील पिढीपर्यंत पोहोचले नाहीत तर त्यांची ओळख आपोआप क्षीण होईल. म्हणूनच धार्मिक शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणे ही काळाची गरज आहे. प्रत्येक भारतीय कुटुंबात हिंदू धर्माचे मूलभूत ज्ञान पोहोचायला हवे. ज्या प्रकारे इतर धर्मांमध्ये धार्मिक शिक्षण अनिवार्य असते, तसेच हिंदू धर्माच्या बाबतीत का नसावे? हा प्रश्न अनेकांच्या मनात उपस्थित होतोच ना?
यासाठी केंद्र सरकार, विविध राज्यांतील सामाजिक संस्था, पत्रकार, समाजसेवक, साहित्यिक, कलाकार या सर्वांनी गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. आपल्याला आपल्या प्राचीन संस्कृतीचे आणि धर्माचे ज्ञान नसेल, तर आपली वैचारिक आणि सांस्कृतिक उन्नती कशी होणार?
आपली शास्त्रं आपल्याला जगण्याची दिशा दाखवतात. मग प्राथमिक शिक्षणासोबत सनातन धर्माचा अभ्यास का करू नये? या ध्येयाने एखाद्या समर्पित व्यक्तीने पुढाकार घेऊन लोकांसमोर हा विचार प्रभावीपणे मांडायला हवा. देशातील प्रत्येक भागात धार्मिक शिक्षणाचे वर्ग सुरू व्हावेत. दररोज किमान दोन तास तरी विद्यार्थ्यांना हिंदू धर्माचे मूळ तत्त्वज्ञान शिकण्याची संधी मिळायला हवी.
आजच्या काळात क्षुल्लक किंवा निरर्थक गोष्टींना लोक सहज आकर्षित होतात, पण कोणी चांगले विचार मांडले तर त्याकडे दुर्लक्ष होते. हेही आपले अज्ञानच आहे. जर आपल्याला धर्माचे योग्य ज्ञान मिळाले असते, तर भविष्यात कोणत्याही चुकीच्या निर्णयाकडे जाण्याची वेळ येणार नाही.
म्हणून जे काही गमावले आहे ते गंगेला मिळाले समजून, आता तरी देशातील शाळांमध्ये हिंदुत्वाचे धडे शिकवण्याबाबत गंभीरपणे विचार झाला पाहिजे. आमचा हा विचार इतरांपर्यंतही पोहोचवू या आणि देशाला समग्र सनातन ज्ञान, संस्कार आणि मूल्यांनी समृद्ध करूया!
कारण
धर्मो रक्षति रक्षितः
अर्थात तुम्ही धर्माचे रक्षण करा, धर्म तुमचे रक्षण करील!
चला… हिंदुत्वाचे नवे धडे पुन्हा गिरवू या!
जय श्रीराम!
