“अहो तुमचं वय ८० झालं, ८५ झालं तुम्ही कधी थांबणार आहात की नाही ?” हे शब्द होते ६५ वर्षांचे अजित पवार यांचे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर झालेल्या पहिल्या मेळाव्यात त्यांनी आपले काका, गुरु असे सर्व काही असलेल्या शरद पवारांचे वय काढत त्यांच्यावर हल्लाबोल केला होता. हे आठवायचे कारण म्हणजे आज पुन्हा एकदा अजित पवार यांच्यासमोर एका ८५ वर्षांच्या नेत्याने त्यांच्याच होम पीचवर तगडे आव्हान उभे केले असून अजितदादांना चांगलाच घाम काढला आहे. आणि त्या नेत्याचे नाव आहे, चंद्रराव तावरे. असं म्हटलं जातं की राजकारणामध्ये वय, शिक्षण, अनुभव याची फारशी गरज पडत नाही. लोकांनी तुमच्या पारड्यात एकदा मतदान टाकलं की झालं. सध्या अशाच एका निवडणुकीची राज्यभर नव्हे तर देशभर चर्चा रंगली आहे. अगदी इंग्रजी वृत्तपत्रांनी देखील या निवडणुकीची दखल घेतली आहे. आणि अर्थात ही निवडणूक आहे ती बारामती विधानसभा मतदारसंघातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याची.
तसं बघायला गेलं तर महाराष्ट्र हे सहकार क्षेत्राची पंढरी म्हणून ओळखलं जातं. त्यातही पश्चिम महाराष्ट्रामध्ये अनेक साखर कारखाने, दूध संघ, जिल्हा बँक, सोसायटी यांच्या निवडणूका होत असतात. अगदी एक पक्षातील दोन दिग्गज देखील या निवडणुकांमध्ये आमने सामने असतात. पण याची फार चर्चा होत नाही. पण या निवडणुकीत खरी रंगत आणली ती राज्याचे उपमुख्यमंत्री व बारामती विधानसभा मतदारसंघाचे आमदार अजित पवार यांनी. अजित पवार यांनी या निवडणुकीसाठी ‘ब’ गटातून अर्ज दाखल केला असून त्यांनी दस्तुरखुद्द स्वत:चे नाव चेअरमनपदासाठी जाहीर केले आहे. तब्बल ४१ वर्षांनंतर अजित पवार यांनी कारखान्याच्या निवडणुकीमध्ये पुनरागमन केले असून याआधी १९८४ साली ते इंदापूर येथील छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी विराजमान असणाऱ्या व्यक्तीने एका साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी आपली प्रतिष्ठा पणाला लावली असून यावेळेसही त्यांच्यासमोर एक ८५ वर्षांचा कसलेला पुढारी उभा आहे.
गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये बारामती लोकसभा मतदारसंघातून अजित पवारांच्या सुविद्य पत्नी सुनेत्रा पवार या उभ्या होत्या. तर त्यांच्या विरोधामध्ये सुप्रिया सुळे. पण खरी लढत होती ती अजित पवार विरुद्ध शरद पवार. त्यावेळी शरद पवार यांच्या गटाकडून ‘८५ वर्षांचा योद्धा’ मैदानात आला आहे, असा प्रचार करण्यात आला होता. आणि चक्क बारामतीमधून त्या निवडणुकीत सुप्रिया सुळे यांना मताधिक्य मिळाले होते. आता यावेळेस देखील या कारखान्याच्या निवडणुकीमध्ये अजित पवारांच्या समोर ८५ वर्षांच्या चंद्रराव तावरे यांनी तगडे आव्हान उभे केले आहे. यासोबतच शरद पवार यांचे एक पॅनेल असून आणखी एक स्वतंत्र पॅनेल आहे. पण खरी निवडणूक मात्र अजित पवार व तावरे यांच्यात असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
अजित पवार यांनी या निवडणुकीमध्ये विधानसभेसारखा प्रचार केला. अनेक सभा घेतल्या. १-१ तासांची भाषणे केली. आणि याच वेळी बोलताना त्यांनी चंद्रराव तावरे यांच्या वयाचा उल्लेख केला. “त्यांना पायजमा घालता येत नाही. पायजमा सोडून ते लुंगीवर आले”, अशी शेलकी भाषा त्यांनी प्रचारात वापरली. यामुळे पुन्हा एकदा वयाचा मुद्दा अधोरेखीत झाला. कारण गत लोकसभा निवडणुकीतही अजित पवार यांनी शरद पवार यांच्या वयाचा उल्लेख वारंवार केला होता. त्यामुळे ६५ वर्षांचे असलेले अजित पवार हे आपण तुलनेने तरुण आहोत व कार्यक्षम आहोत, असे सांगू इच्छित आहेत का असा प्रश्न विरोधकांकडून उपस्थित केला जात आहे.
चंद्रराव तावरे बारामती परिसराच्या सहकार क्षेत्रातील मोठे नाव. विधानसभा व लोकसभा निवडणुकीमध्ये या भागात कायम पवारांचा वरचष्मा राहिला पण सहकाराच्या निवडणुकांमध्ये अनेकवेळा तावरे यांनी पवारांना धूळ चारली आहे. माळेगावचा कारखाना हा बारामती विधानसभा क्षेत्रातील एक प्रमुख कारखाना आहे. १९ हजार सभासदांनी २२ जून रोजी या निवडणुकीसाठी मतदान केले आहे. १९ हजार गुणिले ५ असा साधा हिशेब जरी केला तरी ९५ हजार मतदारांवर ही निवडणूक प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे प्रभाव पाडणार आहे. त्यातच शरद पवारांच्या पॅनेलकडून अजित पवारांचे पुतणे युगेंद्र पवार हे देखील नेतृत्व करत आहेत. युगेंद्र पवार यांनी विधानसभेची निवडणूक अजितदादांच्या विरोधात लढवली होती. त्यामुळे आपले प्रभावक्षेत्र सुटू नये यासाठी अजितदादांनी या निवडणुकीमध्ये जिवाची बाजी लावली असल्याचे दिसत आहे.
तसेच या निवडणुकीत विरोधकांकडून अजित पवारांवर एक गंभीर आरोप करण्यात आला आहे. अजितदादांचे जवळपास १० ते १२ साखर कारखाने आहेत. आजपर्यंतच्या इतिहासामध्ये तावरे गटाची सत्ता असताना त्यांनी उच्चांकी ३६०० रुपये भाव हा ऊसाला दिला होता. पुन्हा एकदा तावरे गटाची सत्ता जर आली तर ते उच्चांकी भाव देतील व अजितदादांवर देखील जास्त भाव देण्याचा दबाव राहील. विरोधकांच्या आरोपानुसार अजितदादांचा वर्षाकाठी ९० लाख टन ऊस गाळप होतो. त्यामुळे २०० रुपये जरी जास्त भाव धरला तरी खूप मोठा आर्थिक तोटा अजित पवारांना बसू शकतो. म्हणून त्यांनी या निवडणुकीत आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे, असे त्यांचे विरोधक म्हणत आहेत.
एकंदरीतच साध्या कारखान्याच्या निवडणुकीने राज्यभराचे लक्ष वेधले आहे. अजित पवार हे आपली जमीन राखणार की त्यांना या जमिनीतील धूळ चाखावी लागणार याचा निर्णय १९ हजार सभासदांवर अवलंबून असून २४ जून रोजी याचा निकाल स्पष्ट होईल. जे काही व्हायचे ते २४ तारखेला आपल्याला कळेलच. पण या निवडणुकीतून एक गोष्ट पुन्हा एकदा सिद्ध झाली की राजकारणामध्ये तुमचे वय कधीही आडवे येत नाही.
तुमच्या मागे जोपर्यंत जनता आहे तोपर्यंत तुमचे राजकारणातील अस्तित्व कोणीही संपवू शकत नाही.