Aishwarya Ray-Abhishek Bachchan
Aishwarya Rai, Abhishek Bachchan move Delhi HC: डिजिटल जगात प्रतिष्ठा आणि ओळख जपणं किती कठीण आहे, याचं उत्तम उदाहरण म्हणजे ऐश्वर्या राय बच्चन यांची नुकतीच दाखल केलेली याचिका. बॉलिवूडची ही सौंदर्यसम्राज्ञी केवळ रुपेरी पडद्यावरच नाही तर आता न्यायालयीन लढाईतही चर्चेत आली आहे. काही अनधिकृत वेबसाइट्स तिचं नाव, फोटो आणि ओळख वापरून ऑनलाईन फसवणूक करत असल्याचं समोर आल्यानंतर ऐश्वर्याने थेट दिल्ली उच्च न्यायालयाचे दार ठोठावले.
विशेष म्हणजे, तिच्या पाठीमागे अवघ्या दोन दिवसांतच अभिषेक बच्चन यांनीही अशीच याचिका दाखल केली आहे.
काही अनधिकृत वेबसाइट्स तिच्या नावाचा, फोटोचा आणि ओळखीचा परवानगीशिवाय गैरवापर करत आहेत, हे लक्षात आल्यामुळे तिने दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली. ही याचिका aishwaryaworld.com आणि अशा इतर उल्लंघन करणाऱ्या वेबसाइट्सविरुद्ध दाखल करून घेण्यात आली आहे. ऐश्वर्याने याचिकेत म्हटले आहे की, अशा प्रकारे सेलिब्रिटींच्या फोटोंचा किंवा ओळखीचा वापर ऑनलाईन फसवणुकीसाठी मोठ्या प्रमाणावर करण्याचा ट्रेण्डच सध्या अस्तित्त्वात आला आहे. यात सेलिब्रिटींच्या नावाखाली लोकांकडून गैरमार्गाने पैसा उकळला जातो. या वेबसाइट्स सेलिब्रिटींच्या नावाशी संबंधित असल्याचा खोटा आभास निर्माण करतात, त्यांच्या फोटोंचा वापर करतात, वस्तूंची विक्री करतात आणि अगदी फसवणूक करणाऱ्या योजनांमध्येही त्यांचा फोटो व त्यांची ओळख वापरतात, असा दावा तिच्या याचिकेत करण्यात आला आहे.
दरम्यान, हा मुद्दा दिल्ली उच्च न्यायालयात न्यायमूर्ती तेजस कारिया यांच्या खंडपीठासमोर आला. या याचिकेवर होणारी सुनावणी जानेवारीपर्यंत तहकूब करण्यात आली आहे. असं असलं तरी, याचिकेसंदर्भातील हक्कांचं संरक्षण करण्यासाठी अंतरिम स्थगिती आदेश जारी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. न्यायमूर्ती कारिया सुनावणीप्रसंगी म्हणाले की, “या याचिकेशी संबंधित १५१ URLs विरुद्ध कारवाई करावी लागेल. प्रतिवादींविरुद्ध न्यायालय आदेश देईल, कारण याचिकाकर्तीच्या मागण्या व्यापक आहेत. मात्र प्रत्येकासाठी वेगळे स्थगिती आदेश दिले जातील.” याचा अर्थ असा की, उल्लंघन करणाऱ्या वेबसाइट्सना ब्लॉक करण्याचे आदेश आणि बेकायदेशीर मजकूर हटवण्याचे निर्देश न्यायालयातर्फे दिले जाऊ शकतात.
या आदेशाला भारतात Ashok Kumar Orders का म्हणतात?
भारतात John Doe Orders ला स्थानिक पातळीवर “Ashok Kumar Orders” असं म्हटलं जातं. John Doe ही अमेरिकेत/ इंग्रजी कायद्यात वापरली जाणारी संज्ञा (fictitious name) आहे. भारतात या नावाला स्थानिक पर्याय द्यायला न्यायालयीन पद्धतीत Ashok Kumar हे नाव वापरलं जातं. म्हणजेच एखाद्या व्यक्तीची खरी ओळख माहीत नसली तरी त्याच्यावर आदेश लागू करायचा असेल, तर न्यायालय त्या अज्ञात प्रतिवादीला Ashok Kumar म्हणून संबोधतं. “Ashok Kumar Orders” मधला अशोक कुमार या नावाचा अभिनेता अशोक कुमार (दादामुनी) किंवा तत्सम कुठल्याही विशिष्ट व्यक्तीशी संबंध नाही.
AI आधारित डीपफेक्स
एआयच्या मदतीने ऐश्वर्या रायच्या चेहऱ्याचा वापर करून अश्लील बनावट फोटो आणि व्हिडीओ तयार करण्यात आले आहेत. तिचं रूप सुपरइम्पोज करून तयार केलेल्या अश्लील प्रतिमा, तसेच खोटे चॅट मेसेजेसचे स्क्रीनशॉट्स आणि फेरफार केलेले फोटो न्यायालयात सादर करण्यात आले. याकरिता “अपमानास्पद, बदनामीकारक आणि तिच्या वैयक्तिक सन्मानावर थेट हल्ला” असे न्यायालयाने म्हटले आहे. त्यांच्या कायदेशीर टीमने युक्तिवाद केला की, एआय-आधारित डीपफेक्स हे सेलिब्रिटींसाठी गंभीर आणि झपाट्याने वाढत चाललेले संकट आहे, त्यामुळे त्यांच्या प्रतिष्ठेला धक्का बसतो आणि आर्थिक नुकसानही होते.
सेलिब्रेटींसाठी आता ‘अनुच्छेद २१’
सेलिब्रिटींना कायमच अशा समस्यांना सामना करावा लागतो. अलीकडेच दिल्ली उच्च न्यायालयाने अमिताभ बच्चन, अनिल कपूर आणि जॅकी श्रॉफ यांनाही यासारखेच संरक्षण दिले आहे. भारतामध्ये व्यक्तिमत्त्व हक्कांबाबत स्वतंत्र कायदा नसला तरी, सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयांनी संविधानातील अनुच्छेद २१ अंतर्गत प्रतिष्ठा आणि गोपनीयतेच्या अधिकाराचा एक भाग म्हणून हे हक्क मान्य केले आहेत. सेलिब्रिटी आपले नाव, आवाज आणि स्वाक्षरी ट्रेड मार्क्स ॲक्ट, १९९९ अंतर्गत नोंदवून अतिरिक्त कायदेशीर सुरक्षाही मिळवू शकतात.
ऐश्वर्याच्या पाठोपाठ दोन दिवसातच अभिषेक बच्चनेही दिल्ली उच्च न्यायालयाचे दार ठोठावल्याने व्यक्तिमत्त्व हक्कांच्या संरक्षणाचा मुद्दा चांगलाच चर्चेत आला आहे.
Pune Gangmurder Case2025: पुण्यातील नाना पेठ परिसरात मूळ असलेल्या आंदेकर टोळीचा इतिहास सुमारे ४० वर्षांहून…
Crime News : उत्तर प्रदेशातील मुस्कान रस्तोगी आणि इंदूरच्या सोनम रघुवंशीने त्यांच्या पतीला कट रचून…
अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये २०२५ च्या महापौरसाठीच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत भारतीय वंशाचे जोहरान ममदानी यांनी…
१२ सप्टेंबर १९९२. मुंबईतील जे.जे. रुग्णालयात तो नेहमीसारखाच एक दिवस होता. डॉक्टर्स रुग्णांच्या तपासणीत व्यग्र…
राज्य निवडणूक आयोगाने अखेर महाराष्ट्रातील नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने…
राज्यातील बहुप्रतीक्षित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा लवकरच होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून दुबार मतदारांवरून…