अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा येथील एका दुकानाला लागलेल्या आगीमध्ये एकाच कुंटुंबातील दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. आगीत मृत्यूमुखी पडलेले कुटुंब फर्निचर दुकानाच्या वरच्या मजल्यावर राहत होते. दुकानातील फर्निचरने भीषण पेट घेतल्याने ते आगीच्या कचाट्यात सापडले.
नेवासा फाटा येथे रविवारी रात्री उशिरा मयूर रासणे यांच्या फर्निचर दुकानाला भीषण आग लागली. दुकानाच्यावरचं मयूर रासणे आपल्या कुटुंबासमवेत वास्तव्यास होते. या अपघातात स्वत: मयूर रासणे (वय-45), त्यांची पत्नी पायल रासणे(वय-38), व दोन मुले अंश रासणे(वय-10) आणि चैतन्य रासणे(वय-7) यांच्यासमवेत एका वृद्ध महिलेचा आगीत होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, आगीचे कारण शॉर्ट सर्किट असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र अद्याप अधिकृतपणे कोणतीही माहिती मिळालेली नाही. घटनास्थळी उपस्थित असलेल्या प्रत्यक्षदर्शींच्या मते, आग इतकी तीव्र होती की, कुणाची मदत पोहचण्याआधीच दुकानातील आगीने भीषण पेट घेतला होता. अग्निशमन दलाच्या गाड्या पोहचण्याआधी आगीने संपूर्ण दुकानाला आणि घराला व्यापले होते. अग्निशमन दलाच्या गाड्या पोहचल्यानंतर ही अनेक तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आली, मात्र तो पर्यंत खूप उशीर झाला होता.
