सचिन पिळगावकर हे मराठी चित्रपटसृष्टीतील एक सर्वांगीण कलाकार म्हणून ओळखले जातात. बालकलाकार म्हणून त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली आणि पुढे दिग्दर्शक, लेखक, निर्माता आणि गायक अशा विविध भूमिकांमध्ये त्यांनी आपली छाप पाडली. त्यांनी मुलाखतींमध्ये अनेकदा चित्रपटातील अथवा चित्रपटाशी निगडीत अनेक किस्से सांगितले आहेत. त्यांचे किस्सा सांगणारे व्हिडीओ अनेकदा सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत.
अलीकडेच एका रेडिओ चॅनलला दिलेल्या मुलाखतीतील त्यांचा किस्सा सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने चर्चेचा विषय ठरत आहे. सदर किस्सा 1963 सालात प्रदर्शित झालेल्या “हा माझा मार्ग एकला” चित्रपटासंदर्भात आहे. राजा परांजपे दिग्दर्शित या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केलं होत. या चित्रपटादरम्यान सचिन पिळगावकर सात वर्षाचे होते. यावेळी “सुप्रसिद्ध अभिनेते संजीव कुमार हे माझा चित्रपट “हा माझा मार्ग एकला” पाहण्यासाठी गेले होते. त्यानंतर त्यांचा सहकारी विशूराजा यांना सचिन कुठे राहतो माहित आहे का असे विचारले. तेव्हा त्यांनी हो असे सांगितले. संजीव कुमार माझ्या घरी येण्यापूर्वी त्यांनी एका स्टेशनरी बाहेर त्यांची गाडी थांबवली. तिथून त्यांनी ऑटोग्राफ बूक आणि पेन विकत घेतले. त्यानंतर ते आमच्या घरी आले, माझ्या वडिलांनी दरवाजा उघडला. ते मला म्हणाले, मी आताच तुझा चित्रपट पाहून आलोय. मी आत्तापर्यंत कधीच कुणाचा ऑटोग्राफ घेतलेला नाही. पण मी आता ऑटोग्राफ घेऊ इच्छितो त्यामुळे तू मला ऑटोग्राफ दे असे म्हणत त्यांनी माझ्या पुढे ऑटोग्राफ बुक दिली. त्यांतर मी त्यावर डिअर हरीभाई विथ लव – सचिन असे लिहिल्याचे सचिन पिळगावकर यांनी सांगितले.
वयाच्या अवघ्या सातव्या वर्षी केलेले काम पाहून ते एवढे प्रभावित झाले की त्यांनी थेट सचिन पिळगावकरांच्या घरी जाऊन त्यांचा ऑटोग्राफ घेतला. हा किस्सा ऐकल्यानंतर सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पाऊस पडत आहे. पिळगावकरांच्या अशा व्हिडीओ नंतर अनेकदा ते व्हायरल होतात. तसेच या व्हिडीओनंतर ही पुन्हा एकदा सोशल मीडियावर त्यांचीच चर्चा आहे. शोले सिनेमातील गब्बर भूमिकेनंतर या व्हिडीओमुळे ट्रोलर्सना उधाण आले आहे. एका वापरकर्त्याने, दरवेळी मुलाखतीसाठी बसताना गीतेवर हात ठेवून जे सांगेन ते खरे सांगेन अशी शप्पथ घेऊनच बसवा, असे लिहिले आहे. तर एकाने आता संत्या 1000 मतांनी पिछाडीवर असे लिहिले आहे.