Foreing Funding, हिंसाचार की केंद्राची हिटलरशाही; वांगचुक यांच्या अटकेची इनसाईड स्टोरी!

News Political News Trending

“सक्सेस के पीछे मत भागो, एक्सेलन्स का पीछा करो, कामयामी झक मार के तुम्हारे पीछे आयेगी…”

३ इडियट्स सिनेमामधील रँचोचा हा संवाद आपल्या सगळ्यांना भावला. त्याची बोलण्याची पद्धत, सगळ्यात गोष्टीत सहभागी असून देखील त्यातून अलिप्त राहण्याची सवय ही त्याची जमेची बाजू. हा सिनेमा बघून आपल्यालाही असं वाटायला लागलं की, मला देखील रँचो व्हावचंय. पण ज्या व्यक्तीपासून हे कॅरेक्टर प्रेरित होतं ते नाव म्हणजे, सोनम वांगचुक! याच रिअल रँचोला राष्ट्रीय सुरक्षा कायद्याच्या अंतर्गत अटक करण्यात आली असून सध्या जोधपूर येथील जेलमध्ये त्यांना ठेवण्यात आलंय. नेमकं असं काय घडलं की या वांगचुक यांना एवढ्या मोठ्या गुन्ह्याखाली अटक करण्यात आली? त्यांचा हातून अशी कोणती मोठी चूक झाली? या सर्व घटनेची माहिती आपण जाणून घेऊया.

सोनम वांगचुक फक्त लडाख नव्हे तर देशभरामधील मोठं नाव. देश – विदेशात त्यांची आजवर अनेक भाषणं झाली आहेत. ३ इडियट्समुळे भारतातील घराघरात त्यांचे नाव पोहोचले. पण लेह-लडाख हा प्रदेश केंद्रशासित झाला आणि त्यानंतर त्याला स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळावा यासाठी त्यांचे आंदोलन सुरु झाले. १० सप्टेंबरपासून त्यांच्या या आंदोलनाला सुरुवात झाली होती.

१. लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा द्यावा.
२. संविधानातील सहाव्या अनुसूचीखाली संवैधानिक संरक्षण द्यावं.
३. लेह आणि कारगिलला स्वतंत्र लोकसभा मतदारसंघ घोषित करावा.
४. सरकारी नोकऱ्यांमध्ये स्थानिकांना प्राधान्य द्यावं.

संपूर्ण आंदोलनादरम्यान वांगचुक यांच्या या प्रमुख चार मागण्या होत्या. परंतू २४ सप्टेंबर रोजी या आंदोलनाला हिंसक वळण प्राप्त झालं. या आंदोलकांनी भाजपच्या कार्यालयाला आग लावली. या उग्र आंदोलनात चार जणांचा मृत्यू झाला तर ७०-८० लोक जखमी झाले.

या हिंसक घटनेनंतर केंद्र सरकार ॲक्शन मोडवर आले व त्यांनी वांगचुक यांच्या SECMOL आणि HIAL या संस्थांचा परकीय निधी (FCRA) परवाना रद्द केला. त्यांना होणाऱ्या फॉरेन फंडिंगमध्ये कथित अनियमितता आणि कायदेशीर उल्लंघनाचा आरोप लावला गेला असून, सीबीआयने चौकशीला सुरुवात केली आहे.

तसेच या संपूर्ण हिंसाचाराला केंद्र सरकारने वांगचुक यांना जबाबदार धरले आहे. त्यांच्या मते, वांगचुक यांच्या हिंसक भाषणाने या आंदोलनाने उग्र स्वरुप धारण केले. या सर्व घटनेवर केंद्र सरकारने एक निवेदन जारी केले आहे. “काही व्यक्तींच्या स्वार्थी राजकारणामुळे आणि सोनम वांगचुक यांच्या वैयक्तिक महत्त्वाकांक्षेमुळे लडाख आणि तेथील तरुणांना मोठी किंमत मोजावी लागत आहे,” असा आरोप केंद्र सरकारनं यातून केला आहे.

एवढेच नाही तर, “सोनम वांगचुक यांनी भडक वक्तव्यं करून जमावाला भडकवले आणि जेव्हा हिंसा सुरू झाली तेव्हा त्यांनी उपोषण सोडून ॲम्ब्युलन्सने आपल्या गावाकडे प्रयाण केले. त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा कोणताही प्रयत्न केला नाही. केंद्र सरकार लडाखच्या जनतेच्या आकांक्षांना पुरेसं घटनात्मक संरक्षण देण्यासाठी कटिबद्ध आहे,” असेही यात निवेदनात म्हटले आहे.

या सर्व आरोपांवर वांगचुक यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. “हे काही आश्चर्यकारक नाही. सरकार माझा आवाज बंद करू इच्छिते. बुधवारी जे काही घडले त्याची जबाबदारी माझ्यावर टाकली जात आहे,” असे त्यांनी म्हटले. यानंतर सोशल मीडियावर वांगचुक यांच्या पाकिस्तान दौऱ्यवारुन देखील प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्यावर देखील वांगचुक यांनी स्पष्टीकरण दिले आहे. “मी यावर्षी जानेवारीमध्ये पाकिस्तान दौऱ्यावर गेलो होतो. संयुक्त राष्ट्राच्या पर्यावरण विषयक एका कार्यक्रमासाठी. त्या कार्यक्रमात मी मोदी साहेबांच्या पर्यावरण विषयक चांगल्या उपक्रमांची स्तुतीही केली होती. हा अत्यंत मर्यादित कार्यक्रम होता आणि त्यात मी एकटाच नव्हतो, भारताचे आणखी सहा तज्ज्ञही उपस्थित होते. हा माझा काही गुप्त दौरा नव्हता,” असे त्यांनी सांगितले.

या सर्व प्रकारानंतर सोशल मीडियावर वांगचुक यांच्या समर्थनार्थ तर विरोधात अश्या दोन्ही बाजुंनी लोक प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. अनेकांच्या मते ही केंद्र सरकारची हिटलरशाही असून यातून केंद्र सरकार आंदोलकांचा आवाज दाबत आहे. तर दुसरीकडे, देशामध्ये अराजकता माजवण्याचा प्रयत्न वांगचुक यांनी केला. त्यांनी तरुणांची माथी भडकावण्याचे काम केले असेही बोलले जात आहे. या सगळ्यामध्ये वांगचुक यांनी देखील या घटनेला “जेन झी क्रांती” म्हणून संबोधले. यावरुन देखील वांगचुक यांना लक्ष्य केले जात आहे. कारण नुकतेच नेपाळमध्ये जेन झी युवकांनी हिंसक आंदोलन करत तेथील संसदेला आग लावली तसेच नागरिकांच्या जीव देखील या आंदोलनात गेला. यापूर्वी श्रीलंका व बांग्लादेशमध्ये देखील अशीच परिस्थिती उद्भवली होती. त्यामुळे वांगचुक हे देखील लडाखमध्ये अशीच परिस्थिती निर्माण करु इच्छित होते, असा आरोप त्यांच्यावर करण्यात येतोय.

पण या सगळ्याच्या मुळाशी लडाखमधील तरुणाईच्या रोजगाराचा प्रश्न आहे, हे आपण विसरुन चालणार नाही. त्यामुळे सरकारने वेळीच यामध्ये हस्तक्षेप करुन निसर्गाने समृद्ध असलेला लेह-लडाख पुन्हा शांत करावा, व तेथील नागरिकांना सुख-शांती लाभेल अशी धोरणं आखावी. जेणेकरुन भविष्यात अशी आंदोलने करण्याची गरज तेथील तरुणाईला भासणार नाही.

Leave a Reply