राज्याच्या माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे संपूर्ण महाराष्ट्रभर जिल्हाधिकारी कार्यालयांना 4066 नवीन आधार किट्स उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याअंतर्गत, आज सह्याद्री अतिथीगृह येथे मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे आणि रायगड येथील व्हीएलईंना (Village Level Entrepreneurs) नवीन आधार किट्सचे माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते वितरण करण्यात आले.
ही किट्स विशेषतः नवीन आधार कार्ड काढणे, आधार कार्ड नूतनीकरण करणे आणि पत्ता बदलण्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहेत. यामुळे नागरिकांना त्यांच्या जवळच्या ई-सेवा केंद्रांमध्ये अधिक वेगाने आणि सुरळीत आधार सेवांचा लाभ घेता येईल.
आधार संच वितरण सोहळा
- 4066 नवीन आधार किट्सचे राज्यभर वाटप होणार
- मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील व्हीएलईंना प्राथमिक टप्प्यात किट्सचे वितरण
- ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिकांना अधिक वेगवान आणि विश्वासार्ह आधार सेवा
माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार यांची महत्त्वपूर्ण भूमिका
या वितरण सोहळ्याला राज्याचे माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी उपस्थिती लावली आणि आधार सेवांच्या विस्तारासंदर्भात महत्त्वाचे मुद्दे मांडले. त्यांनी सांगितले की, “2014 मध्ये उपलब्ध करून दिलेल्या 3,873 आधार किट्सपैकी 1,315 किट्स कालबाह्य झाल्या होत्या आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून 2,567 नव्या किट्सची मागणी करण्यात आली होती. ही गरज लक्षात घेऊन सरकारने 4066 नवीन किट्सच्या वाटपाचा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे नागरिकांना आधार सेवा अधिक प्रभावीपणे उपलब्ध होणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार आज मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे आणि रायगड या चार जिल्ह्यातील व्हीएलईंना (Village Level Entrepreneurs) आधार किटचे वाटप करण्यात करीत योजनेचा शुभारंभ करण्यात आला.
कोणत्या जिल्ह्यात किती आधार किट दिले जाणार?
आधार सेवा अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्हानिहाय किती आधार किट द्यायचे हा आकडा देखील माहिती तंत्रज्ञान विभागाने जाहीर केला आहे. नव्याने किट उपलब्ध करून देण्यात येत असलेल्या जिल्ह्यांमध्ये अहिल्यानगरला 34 अकोला 78, अमरावती 109, छत्रपती संभाजीनगर 134, बीड 58, भंडारदरा 23, बुलढाणा 124, चंद्रपूर 74, धुळे 113, गडचिरोली 44, गोंदिया 48, हिंगोली 88, जळगाव 167 ,जालना 104, कोल्हापूर 188, लातूर 271, मुंबई शहर 103, मुंबई उपनगर 122, नागपूर 91, नांदेड 112, नंदुरबार 90, नाशिक 49, उस्मानाबाद 73 आणि पालघर जिल्हाधिकाऱ्यांना 153, परभणी 55, पुणे 338, रायगड 63, रत्नागिरी 59, सांगली 130, सातारा 132, सिंधुदुर्ग 160, सोलापूर 146, ठाणे 400, वर्धा 50, वाशिम 100, यवतमाळ 83 किट उपलब्ध होणार आहेत. असे माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी जाहीर केले होते. आज याच योजनेचा शुभारंभ करण्यात आला.
नागरिकांसाठी वाढलेली सुविधा
नवीन आधार किट्समुळे राज्यभर आधार सेवा केंद्रांची संख्या वाढणार असून आधार नोंदणी, आधार अद्ययावत करणे आणि इतर सेवांची प्रक्रिया सुलभ व वेगवान होईल. विशेषतः ग्रामीण भागातील नागरिकांसाठी ही सुविधा महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
नवीन तंत्रज्ञान आणि पारदर्शकता
UIDAI च्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार, नवीन आधार किट्स अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित असून बायोमेट्रिक अचूकता आणि प्रक्रिया वेग वाढवण्यावर भर दिला जात आहे. तसेच, या प्रणालींमुळे सेवा केंद्रांवरील भार कमी होणार आहे आणि नागरिकांना अधिक जलद सेवा मिळणार आहे.