दसऱ्यादिवशी दहनाऐवजी केली जाते रावणाची पूजा; महाराष्ट्रातील एका गावाची 300 वर्ष जुनी परंपरा

Lifestyle News

दसरा म्हणजे असत्यावर सत्याचा विजय. प्रभू रामाने रावणाचा वध करून धर्माचे रक्षण केले, ही कथा आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत. दसऱ्याच्या दिवशी रावणाची प्रतिमा उभी करून त्याला जाळण्यात येते आणि रामाचा विजय म्हणजेच सत्याचा विजय जल्लोषात साजरा केला जातो.

मात्र महाराष्ट्रात असे एक गाव आहे जिथे रावण दहना ऐवजी पूजा केली जाते. हो बरोबर ऐकलेत… अकोला जिल्ह्यातील सांगोळा गावातील गावकरी एकत्र येऊन दरवर्षी दसऱ्या दिवशी रावणाची पूजा केली जाते.

अकोला शहरापासून साधारण 45 किलोमीटर अंतरावर सांगोळा गाव आहे. येथे जवळपास 300 वर्षांपूर्वी दहा तोंडी रावणाची काळा पाषाणातील भव्य मूर्तीची स्थापना केली गेली होती. हातात तलवार व शस्त्रे घेऊन उभा असलेला हा दशानन गावाचे वैशिष्ट्य आहे.

गावकऱ्यांनी सांगितलेल्या आख्यायिकेनुसार, शिल्पकाराकडून ग्रामदेवतेचं शिल्प घडवल जात होत. परंतू त्याच्या करवी रावणाचे शिल्प घडले गेले. दैवी संकेत मानून गावकऱ्यांनी हे शिल्प गावात आणण्याचे ठरवले. गावात आणताना वेशीवरच बैल अचानक थांबले व पुढे जाईनासे झाले. त्यामुळे गावकऱ्यांनी त्याच ठिकाणी नारळ फोडून शिल्पाची स्थापना केली. तेव्हा पासून या शिल्पाची पूजा केली जाऊ लागली.

पुजाऱ्याकडून दररोज शिल्पाची पूजा केली जाते. तर दसऱ्या दिवशी संपूर्ण गाव एकत्र येऊन विधिवत पूजा करतो. गावकऱ्यांच्या मते, रावण पूर्णपणे दुष्ट नव्हता. तो शंकराचा निस्सिम भक्त म्हणून ओळखला जायचा. त्याचबरोबर तो पराक्रमी योद्धा आणि विद्वान राजा होता. त्यांच्या पूर्वजांनी जपलेली ही पंरपरा आजही गावकरी श्रद्धेने पुढे नेत आहेत.

गावकऱ्यांच्या मते दसऱ्या दिवशी दहन करावं ते रावणाच्या वाईट विचारांच, रावणाचं नव्हे. रावणाला फक्त खलनायक म्हणून पाहणं योग्य नाही. त्यामुळे सांगोळ्यात दसऱ्या दिवशी रावणदहना ऐवजी पूजा केली जाते.

Leave a Reply