कर्जत, बदलापूर, अंबरनाथ, खोपोली आणि नेरळ यांसारख्या शहारांचा वेगाने विकास होत असून, या परिसराला आता ‘चौथी मुंबई’ म्हणून ओळख मिळू लागली आहे. या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात गृह प्रकल्प उभे राहत आहेत. मात्र मुंबईला जाण्यासाठी सध्या कल्याण-ठाणे हा एकमेव मार्ग असल्याने प्रवाशांची प्रचंड गर्दी वाढत चालली आहे. कल्याण डोंबिवली आणि ठाणे स्थानकांवरील प्रवासी भारामुळे प्रवास करताना लोकांची तारेवरची कसरत होत आहे.
या समस्येवर तोडगा काढण्यासाठी बदलापूर (कासगाव) – पनवेल मार्गे नवी मुंबई(कामोठे) असा सुमारे 34 किलोमीटर लांबीचा नवा रेल्वे मार्ग उभारण्याची योजना करण्यात आली आहे. या मार्गामुळे बदलापूर, कर्जत, अंबरनाथ परिसरातील प्रवाशांना थेट नवी मुंबई गाठणे सोपे होईल आणि कल्याण ठाणे मार्गिकांवरील ताण मोठ्या प्रमाणात कमी होईल.
बदलापूरचे माजी नगराध्यक्ष राम पातकर यांनी केंद्रीय रस्ते व दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे या प्रस्तावित मार्गासाठी सहकार्य करण्याची मागणी केली होती. नितीन गडकरी यांनी या मागणीचे महत्व लक्षात घेऊन रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र लिहिले. या पत्राची दखल घेत रेल्वे प्रशासनाने तातडीने कार्यवाही सुरू केली. रेल्वे मंत्रालच्या निर्देशानुसार, बांधकाम आणि सर्वेक्षण विभागाने मागील वर्षापासूनच सर्वेक्षण सुरू केले आहे. कासगाव येथे नवीन रेल्वे स्थानक उभारण्याचे नियोजनही करण्यात आले आहे.
या मार्गामुळे गर्दीचे विकेंद्रीकरण होईल आणि प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल. याशिवाय, कल्याण-कळवा मार्गे वाशी रेल्वे सुरू करता येईल.
