अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे भारतावर सातत्याने आर्थिक दबाव आणण्याच्या प्रयत्नात आहेत. भारताच्या निर्यातीवर आधीच 25 % टॅरिफ लागू असताना, आता पुन्हा 25% अधिक आयात शुल्क लागू करण्याची घोषणा केली आहे. म्हणजेच अनेक भारतीय उत्पादनांवरील शुल्क आता थेट 50% पर्यंत पोहोचणार आहे. हे आयात शुल्क 27 ऑगस्टपासून लागू करण्यात येणार आहे. यामुळे भारतीय उद्योगजगतात संकटाची झळ जाणवायला सुरूवात झाली आहे. मात्र महिंद्रा समुहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी याला “संधी” म्हटले आहे.
आनंद महिंद्रा यांनी याबद्दल सकारात्मक दृष्टीकोन ठेवून या टॅरिफ संकटाला संधी म्हटले आहे. त्यांनी सोशल मीडियावर एक सविस्तर पोस्ट लिहीत म्हटले आहे की, भारताने सध्याच्या जागतिक आर्थिक हालचालींकडे फक्त चिंता नव्हे तर संधीच्या नजरेनेही पाहिलं पाहिजे. आंतरराष्ट्रीय बदल ही केवळ धोक्याची घंटा नसून विकासासाठीची संधी असते. असे अनपेक्षित बदल भविष्यात भारतासाठी फायदेशीर ठरू शकतात, जसे की 1991 च्या परकीय चलन संकटाने आर्थिक उदारीकरणाचा मार्ग मोकळा केला होता. जर आपण योग्य वेळेत योग्य निर्णय घेतले, तर हे टॅरिफ संकट भारताच्या आत्मनिर्भरतेचा टप्पा ठरू शकते.
महिंद्रांचे भारतीयांसाठी मार्गदर्शक सल्ले
1. व्यवसाय सुलभ करणे
आनंद महिंद्रा यांनी सुचवले आहे की भारताने ‘Single Window Clearance’ म्हणजेच एकल खिडकी प्रणाली स्थापन करावी. गुंतवणूकदारांना विविध परवानग्या, मंजुरी आणि प्रक्रियांमध्ये अडकवण्याऐवजी एकाच व्यासपीठावर सर्व प्रक्रिया उपलब्ध करून देण्यात याव्या, ज्यामुळे एकाच ठिकाणी सर्व गुंतवणूक परवानग्या मिळतील. तसेच काही राज्यांनी एकत्र येऊन हे मॉडेल राबवल्यास भारत एक विश्वासार्ह गुंतवणूक गंतव्य बनू शकतो.
2. पर्यटनाला प्रोत्साहन
महिंद्रा यांच्या मते, पर्यटन हे भारताचे सर्वात दुर्लक्षित पण परकीय चलन मिळवणारे महत्वाचे क्षेत्र आहे. मात्र हे फार कमी प्रमाणात वापरले जाणारे परकीय चलन आणि रोजगार निर्मिती क्षमता असलेले क्षेत्र आहे. या क्षेत्राला गती दिल्यास रोजगारनिर्मिती, स्थानिक व्यवसायाला चालना मिळेल आणि आर्थिक समतोल साधण्यास मदत होईल. यासाठी पायाभूत सुविधा म्हणजेच इन्फ्रास्ट्रक्चर, डिजिटल माहिती, स्थानिक गाइड्स आणि व्हिसा या प्रक्रियांवर प्रोत्साहन देण्यावर भर द्यावा लागेल.
जागतिक उदाहरणांमधून शिकण्याची संधी
महिंद्रा यांनी त्यांच्या पोस्टमध्ये जगातील बदलत्या ट्रेंड बद्दल देखील सांगितले आहे. फ्रान्स आणि जर्मनी सारख्या युरोपियन राष्ट्रांनी आपला संरक्षण खर्च वाढवला आहे. ही गुंतवणूक केवळ सुरक्षेसाठी नसून, स्थानिक उद्योगांना चालना देण्याचा एक मार्ग आहे. याशिवाय जर्मनीने आपली पारंपारिक कठोर आर्थिक धोरणं शिथिल केली आहेत, ज्यामुळे युरोपातील प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये पुनरूज्जीवन वाढीची शक्यता निर्माण झाली आहे. या उदाहरणांमधून स्पष्ट होते की, जागतिक संकटांमध्येही काही देशांनी धोरणात्मक बदल करून स्वत:च्या विकासासाठी नवी दारे उघडली आहेत आणि महिंद्रा यांच्या मते, भारताने देखील अशीच सकारात्मक भूमिका स्वीकारून देशाच्या प्रगतीवर अधिक भर द्यावी.
