जय जवान पथक प्रो गोविंदातून बाहेर? नेमकं काय घडलं… वाचा सविस्तर 

News Trending

दहीहंडी दिवशी दहा थरांचा विक्रम रचून केवळ महाराष्ट्रचं नव्हे तर संपूर्ण देशात आपली ओळख निर्माण करणारे जय जवान पथक सगळ्यांच्याच माहितीत आहे. हंडी फोडताना पथकाची शिस्त आणि प्रत्येक थरात दिसणारे साम्य यामुळे या पथकाची चर्चा सर्वदूर पोहोचली आहे. मात्र या पथकाला यावर्षी प्रो-गोविंदा लीगमध्ये संधी नाकारण्यात आली आहे. यामुळे पथकाकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

5 जुलै रोजी ठाकरे बंधूंनी आयोजित केलेल्या विजयी मेळाव्यात जय जवान गोविंदा पथक सहभागी झाले होते. पथकाने वरळी डोम परिसरात ठाकरेंना सलामी दिली होती. तसेच राज ठाकरे यांच्या मीरारोड मधील मोर्चा दरम्यान देखील पथकाने सलामी दिली होती. त्यामुळे त्यांना प्रो गोविंदासाठी प्रवेश डावलल्याचा संशय पथकाचे अध्यक्ष संदीप ढवळे यांनी व्यक्त केला. विजयी मेळाव्यात सलामी देणं पथकाला नडलं की काय, अशा चर्चांना उधाण आले आहे. 

नेमकं काय घडलं?

प्रो गोविंदा स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ऑनलाइन अर्ज भरावा लागतो. मात्र यंदा जय जवान पथकाने 3 मिनिटे  उशिराने अर्ज दाखल केल्याने त्यांना अपात्र ठरवत त्यांचा अर्ज नाकारण्यात आला आहे.  या घटनेनंतर प्रो-गोविंदा लीगचे आयोजक पूर्वेश सरनाईक यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ही निवड प्रक्रिया पूर्णपणे नियमांनुसार करण्यात आली आहे. ज्या 32 संघानी पहिली नोंदणी केली, त्यांना संधी देण्यात आली आहे. त्यामुळे राजकीय वैमनस्क्यातून प्रवेश नाकारण्यात आला असल्याचे आरोप निराधार आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply