बिरदेव सिद्धप्पा ढोणे यांची कथा ही केवळ UPSC परीक्षेत मिळवलेल्या यशाची नाही, तर ती आहे एका मेंढपाळाच्या मुलाने आपल्या जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर आयुष्याला दिलेल्या नव्या वळणाची तसेच यातून समाजासाठी दिलेल्या प्रेरणादायी संदेशाची.
मेंढपाळीपासून IPS अधिकारीपर्यंतचा प्रवास
कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील यमगे या लहानशा गावात बिरदेव ढोणे यांचा जन्म झाला. त्यांचे कुटुंब पारंपरिक मेंढपाळ व्यवसायात गुंतलेले होते, आणि आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. लहानपणापासूनच बिरदेव मेंढ्या चारताना डोंगर-दऱ्यांमध्ये पुस्तक घेऊन अभ्यास करत. घरात वीज नव्हती, अभ्यासासाठी योग्य जागा नव्हती, तरीही त्यांनी शिक्षणाची ओढ कायम ठेवली. दहावीत ९६% आणि बारावीत ८९% गुण मिळवत त्यांनी आपली गुणवत्ता सिद्ध केली. त्यानंतर बिरदेवने पुण्यातील COEP (College of Engineering Pune) मधून सिव्हिल इंजिनीअरिंगची पदवी प्राप्त केली. अभियांत्रिकी पूर्ण केल्यानंतर त्यांनी UPSC परीक्षेची तयारी सुरू केली. दिल्लीतील उच्च खर्च आणि स्पर्धात्मक वातावरणात त्यांनी दोन प्रयत्न केले, परंतु यश मिळाले नाही. तरीही हार न मानता, तिसऱ्या प्रयत्नात त्यांनी अखिल भारतीय 551 वा क्रमांक मिळवला.
“बुके नको, बुक द्या!” – एक सामाजिक आवाहन
UPSC परीक्षेत यश मिळवल्यानंतर बिरदेव ढोणे यांनी “बुके नको, बुक द्या!” असे आवाहन करून समाजात शिक्षणाच्या महत्त्वावर लक्ष केंद्रित केले. त्यांच्या या विचारशील उपक्रमाला समाजातील विविध स्तरातून प्रतिसाद मिळत आहे. बिरदेव ढोणे यांच्या या सामाजिक संदेशाला बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरचा प्रियकर शिखर पहारिया यांनी १००० पुस्तके भेट देऊन पाठिंबा दिला आहे.
शिखर पहारियाने दिला आवाहनाला प्रतिसाद
शिखर पहारिया हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांचे नातू असून, ते एक व्यावसायिक आहेत. त्यांनी लंडनमधील वाधावन ग्लोबल कॅपिटलमध्ये इन्व्हेस्टमेंट अॅनालिस्ट म्हणून काम केले आहे . शिखर आणि जान्हवी कपूर हे लहानपणापासूनचे मित्र असून, त्यांचे संबंध वेळोवेळी चर्चेत आले आहेत. बिरदेवच्या आवाहनाला प्रतिसाद देत शिखर पहारियाने अनांचे लक्ष वेधून घेतले आहे. बिरदेव सध्या त्यांच्या संघर्षमय परिस्थितून IPS बनण्याच्या प्रवासात यशस्वी ठरले आहेत. त्यांनी समाजासाठी प्रेरणादायी काम केले आहे. त्यामुळे त्यांच्या या प्ररेणादायी प्रवासाची सोशल मिडियावर चर्चा होत आहे. तसेच त्यांना समाजाला केलेल्या आवाहनाची देखील चर्चा होत आहे.
शिखर पहारियाने बिरदेव ढोणेला पाठवलेली १००० पुस्तके हे दर्शवतात की बिरदेवच्या यशाचे शिखरला कौतुक आहे. तसेच त्यांना समाजाला जे आवाहन केले ते अत्यंत समर्पक आणि अनेकांनी यातून प्रेरणा घ्यावी असेच आहे.