चित्रपताका २०२५ : महाराष्ट्र शासनाचा पहिला आंतरराष्ट्रीय दर्जाचा मराठी चित्रपट महोत्सव!

News

कधी वाटलं होतं का, की मराठी चित्रपटांचा स्वतंत्र महोत्सव मुंबईत होईल – तोही आंतरराष्ट्रीय दर्जाचा? होय! ते स्वप्न आता सत्यात उतरलं आहे. महाराष्ट्र शासनाच्या पुढाकाराने आणि संपूर्ण चित्रसृष्टीच्या पाठिंब्याने मराठी चित्रपटासाठीचं एक भव्य व्यासपीठ – ‘चित्रपताका २०२५’ – प्रथमच आपल्या सगळ्यांसमोर उभं राहतंय! २१ ते २४ एप्रिल २०२५ या कालावधीत मुंबईतील पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीमध्ये मराठी चित्रसृष्टीचा सण साजरा होणार आहे – तोही नावाजलेल्या चित्रपटांपासून ते नव्या प्रयोगशील कलाकृतींपर्यंत! चित्रकार, लेखक, दिग्दर्शक, निर्माता, तंत्रज्ञ, पत्रकार, प्रेक्षक… सगळ्यांना एकत्र आणणारा आणि मराठी चित्रपटांना जागतिक व्यासपीठावर झेप घेण्याची संधी देणारा हा महोत्सव म्हणजेच ‘चित्रपताका २०२५’!

महोत्सवाचे उदघाटन आणि प्रमुख उपस्थिती
महोत्सवाचे औपचारिक उद्घाटन मा. मुख्यमंत्री, मा. उपमुख्यमंत्री आणि पद्मश्री अशोक सराफ यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असून या महोत्सवाचे संचालक पुरुषोत्तम बेर्डे आहेत असे सांस्कृतिक कार्य मंत्री अ‍ॅड. आशिष शेलार यांनी मांध्यमांशी बोलताना सांगितले.

‘चित्रपताका’ – नाव आणि बोधचिन्हाची संकल्पना
या चित्रपट महोत्सवासाठी ‘चित्रपताका’ हे नाव अत्यंत विचारपूर्वक निवडण्यात आले आहे.
“चित्रपताका म्हणजे – मराठी चित्रपटसृष्टीचे प्रतिनिधित्व करणारी अभिमानाची पताका!”
बोधचिन्हामध्ये सिनेसृष्टीची ढालस्वरूप रीळ आणि अटकेपार घेऊन जाणारा मावळा दाखवण्यात आला आहे. तो मावळा म्हणजेच मराठी चित्रकर्मी – लेखक, दिग्दर्शक, निर्माता, कलाकार, तंत्रज्ञ, संगीतकार… आणि प्रेक्षकही! हे बोधचिन्ह मराठी चित्रपट सृष्टीच्या घोडदौडीचे प्रतीक ठरते.

चित्रपट महोत्सवाची वैशिष्ट्ये व फिल्म्सची निवड

  • ४१ आशयघन मराठी चित्रपटांचे प्रदर्शन
  • विविध प्रकारांतील चित्रपट:
  • सामाजिक, ग्रामीण, ऐतिहासिक
  • स्त्री विषयक, पर्यावरणावर आधारित
  • बालचित्रपट, विनोदी, ऍक्शन, व्यावसायिक यशस्वी चित्रपट
  • राष्ट्रीय, राज्य पुरस्कार विजेते चित्रपट, तसेच ‘अ’ दर्जा मिळालेले शासकीय अर्थसहाय्य योजनेतील चित्रपट यांचा समावेश
  • मागील ५ वर्षांतील उत्कृष्ट सेन्सॉर प्राप्त चित्रपटांची निवड
  • तज्ज्ञ समितीच्या माध्यमातून चित्रपटांची कसून निवड करण्यात आली आहे. समिती सदस्य: श्री. पुरुषोत्तम बेर्डे, डॉ. संतोष पाठारे, सौ. सुकन्या कुलकर्णी, श्री. समीर आठल्ये

परिसंवाद, मुलाखती आणि कार्यशाळा
चित्रप्रदर्शनाबरोबरच सिनेमा क्षेत्रातील अभ्यासपूर्ण संवादासाठी:
• ५ परिसंवाद, २ मुलाखती
• २ कार्यशाळा, त्यात विशेषतः सिने पत्रकारांसाठी विशेष वर्कशॉप

उल्लेखनीय उपस्थिती – मराठी चित्रसृष्टीतील मातब्बर कलाकार
या महोत्सवाला महेश मांजरेकर, सुबोध भावे, सोनाली कुलकर्णी, वर्षा उसगावकर, प्रवीण तरडे, किशोर कदम, आदिनाथ कोठारे, अभिजित पानसे, विजय पटकर, मंगेश देसाई, केदार शिंदे, कौशल इनामदार, राजेश मापुस्कर, विजू माने, निर्मिती सावंत, दिगपाल लांजेकर, आणि इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
समारोप सोहळ्यासाठी:
प्रसिद्ध दिग्दर्शक सचिन पिळगांवकर आणि महेश कोठारे यांची प्रमुख उपस्थित राहणार आहे.

प्रमुख स्थळांची सजावट आणि वापर
संपूर्ण महोत्सवासाठी पु. ल. देशपांडे अकादमीच्या खालील वास्तूंमध्ये कार्यक्रम होतील:
• रविंद्र नाट्य मंदिर
• लघुनाट्यगृह
• प्रायोगिक रंगमंच
• दोन कलादालनं
• कलाप्रदर्शन हॉल
• कलांगण

नोंदणी प्रक्रिया आणि प्रवेश
हा महोत्सव सर्वांसाठी विनामूल्य आहे. नोंदणीसाठी लवकरच ऑनलाइन रजिस्ट्रेशन सुरू होणार आहे. तसेच कार्यक्रम स्थळी ऑफलाइन नोंदणीचीही सुविधा उपलब्ध असेल.

‘चित्रपताका २०२५’ हा केवळ एक चित्रपट महोत्सव नाही, तर ही आहे मराठी चित्रसृष्टीच्या आत्मविश्वासाची, कलात्मकतेची आणि जिद्दीची झलक. ही पताका आहे आपल्या मातृभाषेतील कलेला जागतिक व्यासपीठावर नेणारी! मराठी सिनेसृष्टीच्या सर्व घटकांना एकत्र आणत, जुन्या आठवणींना उजाळा देत आणि नव्या कलाकृतींना संधी देत, हा महोत्सव मराठी चित्रपटसृष्टीसाठी मैलाचा दगड ठरणार आहे. राज्यातील आणि परदेशातील प्रेक्षकांना मराठी चित्रपटांची कलात्मकता, सामाजिक जाणिवा आणि दिग्दर्शनशैली यांचा अनुभव देण्याची ही एक सुवर्णसंधी आहे. मराठी चित्रपट जगभर पोहोचावा – अटकेपार झेंडा फडकावा!” याच उद्देशाने ‘चित्रपताका २०२५’ सज्ज आहे!

Leave a Reply