ग्रामीण भागात प्रत्येकाच्या मनात आजही अमावस्येबद्दल एक वेगळी धास्ती असते. शहरात कदाचित अमावस्येला काहीच महत्त्व नसेल, पण गावाकडच्या परंपरा, गोष्टी आणि अनुभव हे काहीतरी वेगळंच सांगत असतात. गावकऱ्यांच्या मते अमावस्येच्या रात्री अदृश्य शक्ती जाग्या होतात. अदृश्य शक्ती म्हणजे निरनिराळी भुतं. (वेताळ, ब्रम्हग्रह, समंध, देवचार, मुंजा, खवीस, चेटूक, गि-हा, चेटकीन, झोटिंग, वीर, वायंग्या, बावा, म्हसोबा, जखिन, लावसट, हडळ, भानामति, चकवा इ.) त्यांच्या मार्गात येणाऱ्यांना या अदृश्य शक्ती जाच करतात, पछाडतात. काही वेळा अशा गोष्टींवर ऐकून विश्वास बसत नाही, तर त्याचा अनुभव घ्यावा लागतो.
अशीच कोकणातील गणेश नावाच्या माणसाच्या आयुष्यात घडलेली एक सत्य घटना आहे.
थरारक प्रवास, गोठले श्वास!
ती अमावस्येची संध्याकाळ होती. गणेश आपल्या कुटुंबासह पिंपळवाडीतून बाळूभाऊंच्या रिक्षाने बाजूच्या गावात निघाला होता. त्याच्या गावाच्या सीमेवर एक भलेमोठे पिंपळाचे झाड होते. ते झाड “झपाटलेलं” झाड असे गावकऱ्यांचे मत होते. पण ही गोष्ट गणेशला ठाऊक नव्हती. संध्याकाळ पसरली की त्या झाडाजवळ जो थांबतो, तो १००% पछाडणार हे सत्य गावकऱ्यांच्या ओठांवर होते. अशात अंधार पडताच गणेशचा रिक्षाने प्रवास सुरु होता. आणि अचानक सीमेवर पोहोचताच त्यांची रिक्षा बंद पडते. अगदी बरोबर पिंपळाच्या झाडाबरोबर!
अंधार, शांतता आणि अनामिक भीती…
रिक्षा बंद पडताच बाळूभाऊ कारण देतात “रिक्षा जुनी आहे, म्हणून बंद पडते अधूनमधून.” काळोखात अचानक रिक्षा बंद पडल्याने त्याचं कुटुंब घाबरून जातं, त्यावेळी गणेश त्यांची समजूत घालतो. पण गायत्रीच्या मनात भीतीची पाल चुकचुकते. छोट्या मुलांना घाम फुटतो. अशात रिक्षावाला बाळू मात्र रिक्षा सुरु करण्याचे केविलवाणे प्रयत्न करीत असतो. पण काही केल्या रिक्षा चालू होत नसते. एवढ्यात गायत्री देवाचे नामस्मरण करते आणि काहीच वेळाने रिक्षा पुन्हा सुरू होते.
निव्वळ योगायोग की भानामती?
पुढे सालखाते गावातील आपला नियोजित कार्यक्रम संपवून सर्वजण परत यायला निघतात. रात्र अधिक गडद झालेली असते. त्या अंधारात रिक्षा भरधाव सुरु असते, अगदी पिंपळाचे झाड येईपर्यंत… आणि पुन्हा त्याच ठिकाणी… पिंपळाच्या झाडाशी… रिक्षा पुन्हा अचानक बंद पडते. या वेळी हा योगायोग नाही, असं त्यांना स्पष्ट होतं. गायत्रीचे मन धास्तावते, मुलांच्या सुरक्षिततेची काळजी वाढते. दरम्यान देवाला अनेकदा साकडे घातल्यावर १५ मिनिटांच्या प्रयत्नांनी रिक्षा सुरू होते, आणि कसाबसा प्रवास पार पडतो.
घरात पोहोचल्यानंतरही त्यांच्या मनात उद्भवलेली भीती संपत नाही. अचानक गणेशची लेक रात्रभर विचित्र वागू लागते. पुढे ती वरचेवर तशीच वागत असते. त्यामुळे गणेशच्या मनात एकच प्रश्न येतो, नेमकं त्या रात्री तिथं काय घडलं असेल?
सहा महिन्यांनंतर उलगडा
गावातील एका लग्नात तात्या कुंभार, देव-देवस्की ही सगळी अंधश्रद्धा असते असे मानणाऱ्या गणेशला एक जुनी दंतकथा सांगतात. कधीकाळी एका माहेरवाशीणीने त्या पिंपळाखाली आत्महत्या केली होती. तिचा आत्मा तिथेच अडकून राहिला. आजही काही लोकांना तिची प्रचिती येते. आणि विशेष म्हणजे अमावस्येला त्या रस्त्यावर बाळूभाऊंची रिक्षा हमखास बंद पडते, असं अनेकांनी अनुभवलं होतं.
आणि सर्वांत भयंकर सत्य म्हणजे तात्यांच्या सांगण्यानुसार, बाळूभाऊंच्या आईलाच त्या आत्म्याने झपाटलं होतं… आणि तिचा जीव घेतला होता. हे ऐकताच गणेश हादरतो. त्याच्या पायाखालची जमीन सरकते. एवढ्यात तात्या त्याला विचारतात… “आता यालाही तुम्ही मुंबईकर अंधश्रद्धा म्हणणार का?” पण त्यावर गणेश मात्र निरुत्तर होतो.
चुकभूल माफी
पुढे तात्यांच्या सांगण्यानुसार गणेश त्या झाडाजवळ चुकभूल माफीचा नारळ देऊन येतो. आजही तो त्या ठिकाणी एकट्याने जाण्याची हिंमत करत नाही. आणि नारळ दिल्यापासून त्याच्या मुलगीचे रात्रीचे विचित्र वागणे बंद होते.
विश्वास, भीती आणि परंपरा
कथा खरी असो वा नसो…
पण काही अनुभव शब्दांच्या पलीकडचे असतात. कधी-कधी गावातील रुढी, परंपरा, जादूटोणे… या फक्त अंधश्रद्धाच नाही, तर पिढ्यानपिढ्या आलेल्या अनुभवांचे सार उलगडतात. अमावस्येची ती रात्र आजही गणेशच्या मनात जिवंत आहे.
सध्याच्या आधुनिक युगातील सुशिक्षित माणसं अमावस्या, भुतं-खेतं… या सर्व अंधश्रद्धा आहेत असे मानतात. मग गणेशच्या गोष्टीला काय म्हणाल योगायोग की अंधश्रद्धा? मोठमोठे डॉक्टर, लेखक, विचारवंत, सिनेमावाले हे सर्वजणसुद्धा ठेवतात ना या गोष्टींवर विश्वास…? मग तुम्हाला ही भोंदूगिरी किंवा अंधश्रद्धा का वाटावी रे? असे ठणकावून विचारल्यावर गणेशाकडे द्यायला उत्तरच नव्हते. तो केवळ मुकाट्याने ऐकून घेत होता. त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवायचा की नाही, या पेचात तो पडला होता. ती अमावस्येची मंतरलेली रात्र त्याच्या मनातून जात नव्हती.
