नाशिककरांसाठी खुशखबर आहे. नाशिकमध्ये घर खरेदीची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. ‘म्हाडा’च्या नाशिक मंडळातर्फे शहरातील विविध भागांमधील 402घरांसाठी नवी लॉटरी जाहीर करण्यात आली आहे. ही घरे आगाऊ अंशदान तत्त्वावर विकली जाणार असून त्यांची किंमत 14,94,023 रूपये ते 36,75,023 रूपये इतकी निश्चित करण्यात आली आहे. फक्त 14 लाखांत नाशिकमध्ये घर मिळण्याची संधी मिळत असल्याने या लॉटरीकडे नागरिकांचे लक्ष वेधले आहे.
वांद्रे येथील म्हाडा मुख्यालयात या लॉटरीसाठी ऑनलाइन अर्ज नोंदणीची सुरुवात उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांच्या हस्ते करण्यात आली. त्यांनी सांगितले की, 2025 मध्ये नाशिक मंडळाने तीन लॉटरींद्वारे आधीच 846 घरे विक्रीसाठी उपलब्ध करून दिली असून, ही चौथी लॉटरी जास्तीतजास्त नागरिकांना परवडणारी घरे उपलब्ध करून देण्यासाठी आयोजित केली आहे. त्यांनी स्पष्ट केले की, आगाऊ अंशदान म्हणजे ज्या घरांसाठी लॉटरी घेतली जात आहे ती घरे अद्याप बांधकामाधीन असून, विजेत्यांना घराची किंमत पाच टप्प्यांमध्ये भरण्याची सुविधा देखील उपलब्ध करून दिली आहे.
या लॉटरीमध्ये लिग (अल्प उत्पन्न गट) आणि मिग (मध्यम उत्पन्न गट) या दोन गटांसाठी घरे उपलब्ध आहेत. अल्प उत्पन्न गटासाठी एकूण 293 घरे देण्यात आली असून, त्यामध्ये चुंचाळे (138), पाथर्डी (30), मखमलाबाद (48) आणि आडगाव (77) यांचा समावेश आहे. तर मध्यम उत्पन्न गटासाठी सातपूर (40), पाथर्डी (35) आणि आडगाव (34) अशा मिळून 109 घरांचा समावेश आहे.
अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रांमध्ये अर्जदाराने 1 एप्रिल 2024 ते 31 मार्च 2025 या कालावधीतील उत्पन्नाचा पुरावा सादर करणे बंधनकारक आहे. उत्पन्नाचा पुरावा म्हणून अर्जदाराचे आयकर विवरणपत्र (ITR) किंवा तहसील कार्यालयाकडून मिळालेले उत्पन्न प्रमाणपत्र यापैकी एक कागदपत्र ग्राह्य धरले जाणार आहे. सर्व अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन असल्याने नागरिकांना अर्ज करणे अधिक सोयीचे होणार आहे.
नाशिकमधील चुंचाळे, पाथर्डी, मखमलाबाद, आडगाव आणि सातपूर या वाढत्या मागणी असलेल्या भागांमध्ये बजेटमध्ये घर घेण्याची ही उत्तम संधी असल्याने, MHADAची ही लॉटरी नागरिकांसाठी विशेष आकर्षण ठरत आहे.
