२५ नोव्हेंबर २०२५ हा दिवस भारतीयांसाठी सुवर्णक्षण ठरला. हिंदूंसाठी आस्था असणाऱ्या राम मंदिराचा ‘धर्मध्वजारोहण’ सोहळा आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संपन्न झाला. देशभरातून निवडलेल्या सुमारे ८,००० विशिष्ट मान्यवरांना या सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आले होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक पू. मोहन भागवत आणि उत्तरप्रदेश चे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यावेळी उपस्थित होते.
काळाराम मंदिराचे पुजारी, महंत सुधीर दास यांनी आजच्या शुभ मुहूर्ताचे विशेष महत्त्व सांगितले. मार्गशीर्ष शुद्ध पंचमी, ज्यादिवशी प्रभू श्रीराम आणि माता सीता यांचा पवित्र विवाह झाला, तसेच प्रभू रामचंद्र आणि हनुमानाचा जन्म मंगळवारी झाल्याचा उल्लेख आढळतो. या योगांमुळे ‘अभिजीत’ हा सर्वोत्तम मुहूर्त ध्वजारोहणासाठी निवडण्यात आला.
ध्वजावरील पवित्र प्रतीके
या सुवर्ण ध्वजावर असलेली प्रत्येक प्रतिमा रामायणातील अध्यात्म, परंपरा आणि वारसा यांचे प्रतिनिधित्व करते:
कोविदार (कांचनार) वृक्ष: अयोध्येच्या रघुवंशाचे राजचिन्ह आणि वनस्पती.
सूर्य: प्रभू श्रीराम सूर्यवंशी असल्याचे दर्शवणारे तेजस्वी चिन्ह.
ॐ (ओंकार): ब्रह्मा, विष्णू आणि महेशाचे प्रतिनिधित्व करणारे आध्यात्मिक प्रतीक.
रक्षण चिन्ह: हा ध्वज हनुमंतरायांना अर्पण केला. कारण, अयोध्येच्या रक्षणाची परंपरागत जबाबदारी त्यांच्यावर विश्वासाने सोपवली आहे.
ही संपूर्ण घटना भारतीय संस्कृती, श्रद्धा आणि वास्तुकला यांचे अद्वितीय संगम दर्शवणारा एक सुवर्ण अध्याय ठरली आहे.
