स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वाजणार बिगुल! राज्य निवडणूक आयोगाची मोठी अपडेट

News

राज्यातील बहुप्रतीक्षित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा लवकरच होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून दुबार मतदारांवरून राज्यात वातावरण तापले आहे. मतदार यादीतील घोळांबाबत विरोधकांनी काही दिवसांपूर्वीच निवडणूक आयोगची भेट घेऊन दाद मागितली होती. मनसे आणि महाविकास आघाडीने याबाबत मोर्चाही काढला होता. त्यामुळे आज निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर विरोधकांची काय भूमिका असेल, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

राज्यातील 289 नगरपालिका, 32 जिल्हा परिषद, 331 पंचायत समिती आणि 29 महापालिकेच्या निवडणुकांच्या प्रतीक्षेत सगळेच राजकीय पक्ष आणि मतदार होते. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, मुदत संपलेल्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 जानेवारी 2026 पूर्वी घेणे बंधनकारक आहे. या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने तयारीचा वेग वाढवला असून, 4 नोव्हेंबर रोजी, मंगळवारी निवडणूकांच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

राज्य निवडणूक आयोगाचे प्रमुख मुख्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे, आज संध्याकाळी चार वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तारखांची अधिकृत घोषणा होण्याची दाट शक्यता आहे. विश्वसनीय सूत्रांनुसार, या पत्रकार परिषदेनंतर राज्यात तात्काळ आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन टप्प्यांत पार पडणार असल्याचे सांगितले जात आहे.
पहिला टप्पा – राज्यातील 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणुका.
दुसरा टप्पा – 32 जिल्हा परिषदा आणि 336 पंचायत समित्या
तिसरा टप्पा – 29 महापालिकांच्या निवडणुका.

पहिल्या टप्प्यातील मतदान नोव्हेंबर महिन्यात होणार असल्याची शक्यता आहे. पहिल्या टप्प्यासाठी सुमारे 21 दिवसांचा कालावधी, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांसाठी 30 ते 35 दिवसांचा तर महापालिकांसाठी 25 ते 30 दिवसांचा निवडणूक कार्यक्रम जाहिर होणार आहे. या कार्यक्रमात अधिसूचना प्रसिद्ध करून अर्ज भरण्यापासून मतदान आणि निकाल जाहीर होईपर्यंतचा संपूर्ण कालावधी समाविष्ट असेल.

राज्यातील राजकीय वातावरण आधीच तापलेले असताना, निवडणुकांचा बिगुल वाजल्यास आगामी दिवसांत राजकारण तापण्याची शक्यता आहे. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र होणार असून, स्थानिक स्तरावर कार्यकर्त्यांच्या हालचालींना वेग येणार आहे. भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस(शरद पवार गट व अजित पवार गट), तर शिवसेना (उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे) सगळेच निवडणुकांसाठी सगळेच कस लावून उभे ठाकणार आहेत. राज्यातील सर्वांच्या नजरा आजच्या पत्रकार परिषदेकडे लागल्या असून, निवडणुकीच्या घोषणेनंतर महाराष्ट्रातील राजकीय रणभूमी सज्ज होणार आहे.

Leave a Reply